Wednesday, 8 April 2020

आरोग्य आणि आर्थिक आघाडी सांभाळा



आरोग्य आणि आर्थिक आघाडी सांभाळा

Ashok Sutar
अशोक सुतार /8600316798





Covid-19 (corona virous)







देशात कोरोना विषाणूमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र याबाबतीत आघाडीवर असल्याचे दिसते. जगभरात कोरोनामुळे 83 हजार लोक मरण पावले आहेत. तर भारतात 149 मरण पावले. आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 63 जण कोरोनामुळे मरण पावले. रुग्णांचा आकडाही वाढत आहे. सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू असूनही देशातील रुग्णांची संख्या वाढत आहे हे विशेष होय. देशातील अर्थव्यवस्था कोरोनामुळे डबघाईला येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेष्ठ नेते शरद पवार यांची नुकतीच चर्चा झाली. देशातील अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी काय उपाय योजले पाहिजेत, यावर चर्चा झाली.  शरद पवार यांनी याबाबत पंतप्रधानांना काही उपाय सुचवले आहेत. शरद पवार हे अनुभवी, ज्येष्ठ नेते आहेत. ते वेळोवेळी पंतप्रधानांशी चर्चा करून राष्ट्रीय प्रश्नांवर सल्ला देतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही उचित निर्णय घेतले तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडणार नाही. कारण सद्यस्थितीत जगातील अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्स या बड्या देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे भारतात अर्थव्यवस्था योग्य पद्धतीने ठेवणे नियंत्रणात आणणे महत्त्वाचे आहे.                                                                                                                                                      कोरोना या विषाणूजन्य आजारपणामुळे देशात मरण पावलेल्यांची संख्या 149 आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला. नागरिकही लॉकडाऊनला सहकार्य करत आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या, उद्योग, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठा, खाजगी कामे, बांधकामे पूर्णतः बंद आहेत. अशा अवस्थेत जास्तीत जास्त फटका मजूर वर्गाला बसला आहे. मजूर वर्ग काबाडकष्ट करून जीवन जगतो, पोटाची खळगी भागवण्यासाठी मजुरांना अनेक राज्यात स्थलांतर करावे लागते. परंतु बाहेरील राज्यातून आलेल्या मजुरांवर काम बंद असल्यामुळे उपासमारीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे जगायचे कसे, खायचे काय, घरभाडे कसे भरायचे हा मोठा प्रश्न मजुरांसमोर पडला. त्यामुळे मजुरांनी झुंडीने मोकळ्या रस्त्यावरून चालत हजारो मैलांची पायपीट करत आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये महिला-पुरुष, मुले,वृद्ध यांचा समावेश होता. दिवसभर चालणे आणि पोटाला काही मिळणे यामुळे मजूर थकले. मजुरांची मोठी परवा झाली. अशा मजुरांना सरकारने अन्न,पाणी, निवाऱ्याची सोय करून काही आर्थिक मदत करणे महत्वाचे आहे.                                                                                                                      तसेच केंद्र सरकार नवीन संसद भवन बांधण्याच्या विचारत आहे. परंतु देशावर आलेले कोरोनाचे संकट पाहता संसद भवन बांधण्याची ही योग्य वेळ नसल्याचे शरद पवार यांनी पंतप्रधानांना सुचवले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे काम नंतर करण्याची अपेक्षा आहे. कारण यामुळे देशावर अतिरिक्त खर्चाचा ताण येऊ शकतो. याऐवजी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नवीन मेडिकल किट, हातमोजे, मास्क, नवीन मशिनरी सरकारने निर्माण केल्या पाहिजेत. कारण कोरोनाचा दुसरा टप्पा तर काही ठिकाणी तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या व्यवस्थेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत जाते व वैद्यकीय यंत्रणेवर ताण येऊ शकतो. आपण अर्थसंकल्पात आरोग्य सेवेवर नाममात्र पैसा खर्च करतो आणि संरक्षण व्यवस्थेवर अमाप खर्च करत आहोत. हे कुठेतरी थांबले पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याला जास्त महत्व देणे गरजेचे आहे. नागरिक सुखी,आरोग्यमय असतील तर देशात प्रगती होऊ शकते. देशावर कोरोना विषाणूमुळे आर्थिक संकट कोसळले आहे. सर्वच देशांत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे देशातील अतिरिक्त खर्चावर निर्बंध घातले पाहिजेत. केंद्र सरकारने याबाबत गंभीर भूमिका घेण्याची गरज वाटते. जे मजूर दुसऱ्या राज्यात जाताना सापडले आहेत, त्यांच्यासाठी निवारा, त्यांना अन्न, पाणी देणे शासनाची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात हि परिस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्यरीत्या सांभाळली आहे. केंद्र सरकारच्या तिजोरीतील काही अतिरिक्त निधी लोकांच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी वापराने  प्राथमिकता आहे. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यानी सुचवले आहे कि, लॉकडाऊन वाढवावा, यासाठी केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने काही राज्यांतील संचारबंदी काही नियम ठेवून उठवावी. त्यामुळे जनजीवन पूर्ववत करावे. त्यानंतर त्या राज्यांत काय बदल झाले आहेत याची पाहणी करून सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.                                                                                                                   देशात लॉकडाऊनच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना दि. पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता मेणबत्ती व दिवे लावण्यास सांगितले होते. या दरम्यान काही अतिउत्साही लोकांनी फटाके फोडले तर काही जणांनी शोभेची दारू उडवली. नागरीक प्रत्येक गोष्टीत सण साजरे कारू पाहत आहेत. यापूर्वी पंतप्रधानांनी घंटी वाजवण्यास सांगितले होते. त्यावेळीही अतिउत्साही लोकांनी एकत्र येऊन रस्त्यावर नृत्य केले होते. लोकांनी सोशल डिस्टंसिंग पळाले नाही. यात पंतप्रधानांची काही चूक नाही. परंतु लोक काही चुका करत आहेत. कोरोना रोग सर्वत्र पसरला असून लोकांनी एक मीटर अंतरावर राहून सर्व व्यवहार करायचा आहे. परंतु लोकांच्या लक्षात ते येत नसल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन वाढवावा लागेल काय, याबद्दल आता केंद्र सरकार विचार करीत आहे. दि. १४ एप्रिलला लॉकडाऊन संपणार अशी घोषणा केंद्र सरकारने केली होती. लॉकडाऊन संपल्यानंतर लोकांनी सार्वजनिक जागांवर गर्दी करू नये, यासाठी सरकारजवळ कोणत्या उपाययोजना आहेत ? सध्या अनेक ठिकाणी सामाजिक मंडळे, सामाजिक संस्था, धर्मादाय संस्था अनाथ, गरीब लोकांना अन्न पुरवठा करत आहेत. लोकसहभागातून सरकार लोकांपर्यंत कोणकोणत्या सुविधा पोहोचवणार, याचे नियोजन लॉकडाऊन संपण्यापूर्वी करणे गरजेचे आहे.कोरोना हे आता जागतिक संकट निर्माण झाले आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत १२ हजार लोक कोरोनामुले मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे शेअर बाजार, अर्थव्यवस्था कोसळली आहे. अमेरिका आता भारताकडे आरोग्यासाठी याचना करीत आहे. जागांमधील सर्व देशांत भारत हा एकाच देश असा आहे की, या देशातील आरोग्य व्यवस्था, गृहखाते इमानेइतबारे काम करीत आहे. सर्वसामान्यांचे हीत पाहिले जात आहे. अजूनही मोठ्या राष्ट्रांना कोरोनाचे गांभीर्य जाणवलेले नाही. भारतातील केंद्र सरकारने ज्येष्ठ नेत्यांच्या सूचनांचे पालन करावे, अतिरिक्त खर्च कमी करावेत आणि आरोग्याला प्राधान्य द्यावे. कोरोनाशी लढण्यास नागरिक समर्थ आहेत. ते नक्कीच सरकारला या संकटात साथ देतील, असा विश्वास आहे. 


No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर