ब्लॉगर / अशोक सुतार
८६००३१६७९८
ऑगस्ट २०१८ मध्ये स्वीडनच्या संसदेच्या बाहेर हवामान बदलाच्या प्रश्नासाठी स्कूल स्ट्राइक करणारी, हवामान बदलासाठी जागतिक नेत्यांना प्रश्न विचारणारी ग्रेटा पुन्हा चर्चेत आली आहे. स्वीडिश सरकारने तिच्या सन्मानार्थ ‘व्हॅल्यूएबल नेचर’ अर्थात ‘मौल्यवान निसर्ग’ या विषयावर पोस्टाच्या पाच स्टॅम्पची एक मालिका केली असून त्यात ग्रेटालाही स्थान देण्यात आले आहे. निसर्गाचे जतन करणाऱ्या चळवळीत असलेल्या ग्रेटाच्या योगदानाचा स्वीडन सरकारने सन्मान केला आहे.
------------------------------------------------
पर्यावरणासाठी जगात अनेक लोक काम करत आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पॅरीस करारावर सही करण्याचा म्हणजेच आंतरराष्ट्रीय हवामान बदलाच्या चळवळीत भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जगासमोर पर्यावरणाचा प्रश्न मांडून तो सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला टाइम मॅगझीनने २०१९ या वर्षी 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवले होते. १९२७ पासून पुरस्कार देण्याच्या परंपरेत ग्रेटा थुनबर्ग ही सर्वांत लहान व्यक्ती ठरली होती. त्यावेळी तिचे वय १५ होते. तर ग्रेटा थनबर्गच्या हवामान बदलाच्या चळवळीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी शाळकरी वयातच हवामान बदलाच्या प्रश्नासाठी सर्वस्व पणाला लावणारी ग्रेटा थनबर्ग ही पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शाळकरी मुलामुलींची, तरुण- तरुणींची आदर्श आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये स्वीडनच्या संसदेच्या बाहेर हवामान बदलाच्या प्रश्नासाठी स्कूल स्ट्राइक करणारी, हवामान बदलासाठी जागतिक नेत्यांना प्रश्न विचारणारी ग्रेटा पुन्हा चर्चेत आली आहे. स्वीडिश सरकारने तिच्या सन्मानार्थ ‘व्हॅल्यूएबल नेचर’ अर्थात ‘मौल्यवान निसर्ग’ या विषयावर पोस्टाच्या पाच स्टॅम्पची एक मालिका केली असून त्यात ग्रेटालाही स्थान देण्यात आले आहे. निसर्गाचे जतन करणाऱ्या चळवळीत असलेल्या ग्रेटाच्या योगदानाचा स्वीडन सरकारने सन्मान केला आहे. दि. ३ जानेवारी २००३ रोजी ग्रेटा थनबर्गचा जन्म झाला. आता तिचे वय १८ आहे. जर हवामान बदल रोखण्यासाठी आपण काहीच केले नाही तर त्यातून युद्ध, संघर्ष आणि निर्वासितांच्या समस्या उभ्या राहणार आहेत. ग्रेटाने यासाठी लोकचळवळ उभी केली. स्वीडनच्या संसदेसमोर ग्रेटाने वयाच्या १४ व्या वर्षी आंदोलन केले होते. त्यानंतर तिने दर शुक्रवारी सातत्याने आंदोलने केली. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये तिने हवामान बदलावर तिची भूमिका मांडली. या आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तिची दखल घेतली. ग्रेटाच्या आंदोलनाला ‘फ्रायडेज फॉर द फ्युचर’ असे नाव मिळाले असून तिचे आंदोलन विविध देशांत पोहोचले. जर्मनी, बेल्जियम, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये ही आंदोलने झाली. ग्रेताने आंदोलन सुरु केल्यानंतर जगभरातील जवळपास १०० देशांतील पर्यावार्ण रक्षकांनी आंदोलने केली. स्वीडिश सरकारने तिच्या सन्मानार्थ प्रकाशित केलेल्या स्टॅम्पच्या एका चित्रात १८ वर्षाची ग्रेटा एका उंच कड्यावर उभी आहे असे दाखवले आहे. तिच्या अंगात ग्रेटाचा ट्रेडमार्क ठरलेला पिवळा रेनकोट आहे. तिची वेणी वाऱ्यामुळे उजव्या बाजूला उडते आहे. स्वीडनमधले चित्रकार हेन्निंग ट्रोलबॅक यांनी ही पाचही चित्रे काढली आहेत. या स्टॅम्पची किंमत १२ क्रोनॉर (स्वीडिश चलन) म्हणजेच १.४ डॉलर आहे. दि.१४ जानेवारीपासून हे स्टॅम्प विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. स्वीडिश सरकारने अलीकडेच पर्यावरणविषयक १६ ध्येय निश्चित केली. त्यांचा या स्टॅम्पच्या मालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यात काही महत्त्वाच्या गणल्या गेलेल्या अधिवासांचे जतनीकरण आहे. उंच पर्वतराजी, तिथली वृक्षसंपदा, जंगले, शेतजमिनी, खारपड जमिनी यापैकी काहींचा समावेश स्टॅम्पवर करण्यात आला आहे. या निसर्गसंपत्तीइतकीच ग्रेटासारखी पर्यावरण रक्षणाचा आग्रह धरणारी तरूण मुलगी आपल्यासाठी महत्त्वाची आहे, हेच जणू स्वीडन सरकारने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. जेमतेम १८ वर्षाच्या ग्रेटाला तिच्या छोट्याशा पण लक्षणीय आंदोलनामुळे जगभर प्रसिद्धी मिळाली. तिला संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक परिषदेत भाषण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. पर्यावरणविषयक नोबेल पारितोषिकासाठी तिचे नामांकन झाले होते. आता तिच्या सन्मानार्थ स्वीडिश सरकारने स्टॅम्प वितरित करण्यात आल्यामुळे लहान वयात तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ग्रेटाच्या “स्कूल स्ट्राइक फॉर क्लायमेट’ आंदोलनामुळे जगभरातल्या मुलांना पर्यावरण रक्षणाची प्रेरणा मिळाली. ग्रेटा म्हणते, मी लहान असताना अभिनय करण्यापासून ते शास्त्रज्ञ होण्यापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचा मी विचार करत होते. नंतर एकदा शाळेतल्या शिक्षकांनी आम्हाला हवामान बदलाविषयी सांगितले आणि माझे डोळे उघडले. या सर्व गोष्टींनी ग्रेटा व्यथित झाली. एक दिवस तिने ठरवले की, पर्यावरण वाचवण्यासाठी स्वतःलाच काहीतरी करायला हवे. म्हणून तिने स्वीडनच्या संसदेबाहेर हातात फलक घेऊन आंदोलन करायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी ती एकटीच होती. पण दुसऱ्या दिवसापासून तिला लोकांची साथ मिळाली आणि पर्यावरण वाचवण्याची चळवळ जगभर पसरली. पोलंडमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलविषयक परिषदेमधले तिचे भाषण जगभरातील राज्यकर्त्यांना विचार करायला लावणारे होते. इंग्लंडची राजधानी लंडन येथे वयाच्या १६ व्या वर्षी ग्रेटाच्या नेतृत्वाखाली हवामान बदलाविरोधात आंदोलन झाले. विशेष म्हणजे या आंदोलनाला जगभरातून पर्यावरणवाद्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रेटाच्या आंदोलनामुळे जागतिक हवामान बदलाची चर्चा सुरु झाली. ग्रेटाने सुरू केलेल्या आंदोलनामुळे जगभरात ती पर्यावरणवाद्यांसाठी प्रेरणा ठरली आहे. जैवविविधतेचा ऱ्हास थांबवावा, मनुष्य प्रजाती विलुप्त होण्यापासून वाचवली जावी, अशा मागण्या ग्रेटाने केल्या होत्या. राज्यकर्त्यांनी हवामान बदलाचे सत्य सांगावे, कार्बनचे उत्सर्जन २०२५ पर्यंत शून्य व्हावे, यावर लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांची समिती असावी, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या.
जागतिक तापमानवाढीचे आव्हान जगासमोर उभे असून तंत्रज्ञानाच्या वापराने जीवन सुसह्य झाले असले, तरी भविष्यात त्याचे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. मनुष्याप्रमाणेच नैसर्गिक साधन-संपती, वन्यजीव, जलचर आदींना प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे. जागतिक तापमानवाढीचे मुख्य कारण आहे, कार्बन वस्तूंची निर्मिती. जगात वाढत्या औद्योगिकीकरणानंतर हवेत मिथेनसारखे घातक वायू तयार होत असून श्वसनाचे रोग वाढत आहेत, हवेतील कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनाक्साईडचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात आली आहे. वातावरणात ओझोनचा थर जमा होत असून सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवर थेट पडत असल्याने पृथ्वीचे तापमान वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे निसर्गचक्रात बदल होत आहे, पर्जन्यमानही बदलले असून केव्हाही पूरस्थिती येऊ शकते, अशी स्थिती आहे. ध्रुवीय प्रदेशात वाढत्या तापमानामुळे हिमनग वितळत आहेत. हिमनग वितळल्यामुळे तेथील पाणी नद्यांमध्ये मिसळत असून समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. परिणामी समुद्री जीव, आजूबाजूच्या वातावरणातील सजीवांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा बेसुमार वापर, मोबाईल, संगणकाचा अवास्तव वापर यांमुळे हवेत किरणोत्सर्गाचे प्रमाण वाढत आहे. हवेतील मोबाइलच्या लहरींचे परस्पर छेदन झाल्याने वातावरण गरम होत आहे. वृक्ष लागवड करणे, संवर्धन करणे, पाण्याचा योग्य तो वापर केला तर पृथ्वीचे वातावरण आटोक्यात येईल. हल्ली वाहनांच्या अतिवापरामुळे हवेत कार्बन मोनोक्साईडचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय लोकांनी स्वीकारणे गरजेचे आहे. पृथ्वीवरील तापमान वाढ कमी करण्यासाठी सौर ऊर्जा, पवन उर्जा वापरली पाहिजे. औष्णिक ऊर्जा टाळली पाहिजे. तापमानवाढ कमी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१९ साली आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पर्यावरण रक्षण, तापमानवाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने काम करण्याची गरज आहे. नैसर्गिक ग्रीनहाऊस परिणामाबरोबरच औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातून उत्पन्न होणाऱ्या वायूंचे उत्सर्जन होत असते. त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते, यालाच जागतिक तापमानवाढ किंवा हवामान बदल म्हणतात. स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग हिच्या प्रयत्नामुळे जगभरात पर्यावरणवादी विचार पोहोचत असून लोक जागृत होत आहेत. ग्रेटाच्या आंदोलनाचे हेच यश आहे.
