Wednesday, 27 November 2019

वैश्विक मानव धर्माचे उद्गाते


 वैश्विक मानव धर्माचे उद्गाते

भारतीय स्वातंत्र्याच्या ५० वर्षांपूर्वी हिंदुस्तानात बहुजनांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या महात्मा ज्योतीराव फुले यांनी देशाला सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक विचारांची दिशा दाखवली. शेतकरी, कामगार आणि वंचित समाज हे ज्यांच्या लेखणीचे व चळवळीचे विषय होते, त्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचा आज १२९ वा स्मृतिदिन आहे. पत्नी सावित्रीबाई फुले यांना सोबत घेऊन स्त्रीशिक्षणाचा पाया घातला. ज्या काळी समाजाने स्त्रियांना शिक्षण घेण्यास बंदी केली होती, त्या काळात हे धाडस फुलेंनी केले व त्यासाठी समाजातील कर्मठांचा रोषही पत्करला. ज्योतिराव गोविंदराव फुले हे क्रांतीसुर्य महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाज सुधारक होते. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, जातीवाद, त्यामुळे होणारी बहुजनांची पिळवणूक, सावकारी, स्त्रीला हीन दर्जा यांविरोधात अखेरपर्यंत आवाज उठवून समाजाला निद्रिस्त अवस्थेतून जागृत केले. अशा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांना विनम्र अभिवादन!                                                                      ज्योतीराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. कटगुणमध्ये त्यांचा जन्म दि.११ एप्रिल १८२७ रोजी झाला. ज्योतीरावांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. दुसरे बाजीराव पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि चुलते शनिवारवाड्यात फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे मूळचे गोऱ्हे आडनाव जाऊन ते फुले या आडनावाने ओळखले जाऊ लागले. ज्योतीराव नऊ महिन्यांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. ज्योतीराव करारी व निश्चयी वृत्तीचे होते. ते अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. ज्योतीरावांच्या मनावर संत कबीराच्या विचारांचा मोठा प्रभाव होता.                                                         विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली । नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।। हे प्रसिद्ध विचार महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देताना मांडले आहेत. कमीत कमी शब्दांत मोठे सार यात सांगितले आहे. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामधील बुधवार पेठेत भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. आजही भिडेवाडा तिथे आहे. राज्य शासनाने या स्थळाची जपणूक करणे गरजेचे आहे. समाजाने बहिष्कृत केलेल्या अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. फुले यांनी विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर निवेदन देऊन प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. ज्योतिरावांनी पत्नी् सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई होय. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय मानले जातात.                                                                महात्मा ज्योतीराव फुले यांच्या मनावर जगप्रसिद्ध तत्ववेत्ते थाॅमस पैनी यांच्या राईटस ऑफ मॅनया ग्रंथाचा प्रभाव होता. त्यामुळे मानवी हक्क, सामाजिक न्याय यांबाबत त्यांना माहिती मिळाली आणि सामाजिक विचार दृढ झाली. समाजातील विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल, असे त्यांचे मत होते. त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. विधवाविवाह घडवून आणला. दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. ज्योतीराव फुले यांची धर्म व समाजाबद्दल रोखठोक मते होती. कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही मानवनिर्मित आहे, असे त्यांचे मत होते. परंतु विश्वाची निर्मिती करणारी शक्ती अस्तित्वात आहे, अशी त्यांची अस्तिक्यवादी विचारसरणी होती. त्या शक्तीचे त्यांनी निर्मिकअसे नामाभिधान केले होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील तत्कालीन  शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकात त्यांनी सावकारशाहीबद्दल आणि शेतकऱ्यांच्या पिळवणुकीबाबत मते मांडली आहेत. तसेच शेतकऱ्यांनी कर्ज काढून सण कार्यक्रम करू नये, असे म्हटले आहे. नीति हाच मानवी जीवनाचा आधार आहे, असे त्यांनी विचार मांडले. फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड व इतर ग्रंथांद्वारे समाजाला जागृत करून समाजबदलाची चळवळ सुरु केली. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारे समाजाचे नवनिर्माण करणे व त्यासाठी नीतिमत्तेचे वर्तन व ठाम वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे, असे मत ज्योतीराव फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात मांडले आहे.                                        महात्मा फुले यांना मानवी वर्तन व मानवाचा व्यवहारात बदल घडवून आणायचा होता. त्यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत याबाबतही फुलेंनी विपुल लेखन केले आहे. माणसाला माणूस म्हणून जगू देणारा व मानवतेला प्रतिष्ठा देणारा वैश्विक धर्म महात्मा फुलेंना अपेक्षित होता. अखंड या काव्यप्रकारात त्यांनी मानवधर्म, आत्मपरीक्षण, नीती, समाधान, सहिष्णूता, सदसदविवेक, उद्योग, स्वच्छता, गृहकार्यदक्षता, इ. गोष्टींवर भाष्य केले आहे. संत तुकाराम यांनी मानवी जीवनाला उपदेश करणारे अभंग लिहिले, त्याच हेतूसाठी ज्योतीराव फुलेंनी ‘अखंड’ हे काव्य लिहिले. महात्मा फुले यांनी १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्या लेखन, प्रकाशनचे कार्य केले. छ. शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. अत्याचार व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी आपले आयुष्य सामाजिक न्याय आणि सामाजिक पुनर्रचना यांसाठी अर्पण केले होते.
                                   - अशोक सुतार 
                                    ८६००३१६७९८

Sunday, 24 November 2019

अजितदादांचे बंड, शपथविधी आणि सत्तेचे गणित

अजितदादांचे बंड, शपथविधी आणि सत्तेचे गणित
Daily प्रीतिसंगम/ published on 24thNov2019 sunday
www.pritsangam.com    
अजितदादा पवार / अर्कचित्र : अशोक सुतार 


             राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली. अचानकपणे वादळ यावे, जमवलेल्या गोष्टी विखरून पाडाव्यात आणि नवीन गोष्टी तिथे येऊन वातावरणच बदलावे, असा प्रकार झाला. राजकारणात केव्हाही, काहीही घडू शकते, याची प्रचिती महाराष्ट्राला आली. शुक्रवारपर्यंत शिवेसेनेचे महा शिवआघाडी की महा विकासआघाडीची सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरु होती. त्यादृष्टीने गेली ४-५ दिवस शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या चर्चा सुरु होत्या. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता महा विकासआघाडीचे सरकार अस्तित्वात येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होणार यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले. नंतर रात्रीपासून पहाटेपर्यंतच्या अंधारात नवा राजकीय खेळ सुरु होऊन काही घडामोडी घडल्या आणि शनिवारी सकाळी थेट आठ वाजता मुख्यमंत्री म्हणून पुन्हा भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री म्हणून अजित दादा पवार यांनी विधानभवनात शपथ घेतली.                                                सकाळी सकाळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या दिग्गज मंडळीना ही धक्कादायक बातमी समजल्यावर सर्वजण सुन्न झाले. अजित दादा पवारांनी थोरल्या पवारांच्या अपरोक्ष भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापनेत पुढाकार घेतला. अजित दादांच्या या बंडाने राष्ट्रवादीच नव्हे तर शिवसेनाही हादरली आहे. अजितदादांनी कोणत्या कारणास्तव भाजपशी सोयरिक केली असेल, पक्ष नेतृत्वाला म्हणजेच पवार काकांना अंधारात ठेवून त्यांनी स्वतंत्र निर्णय का घेतला असे अनेक प्रश्न चर्चिले जात आहेत. कोणी म्हणते अजित दादांच्या निर्णयाला शरद पवारांचा छुपा पाठिंबा होता, यात काहीच तथ्य वाटत नाही. मुळातच अजित दादा पवार हे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या सत्ता समीकरणापासून दूर होते. म्हणजे असून नसल्यासारखे होते. मुंबईतील शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीतून ते तडकाफडकी बाहेर निघून गेले होते. त्यानंतर त्यांचा फोनही नॉट रिचेबल होता. त्यामुळे तेव्हाच त्यांच्या मनात काहीतरी राजकारण शिजले असावे. शनिवारी सकाळी विधानभवनात अजित दादांचा मनसुबा समजला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी मोठा संघर्ष केला. भाजपने राष्ट्रवादीतील दिग्गज मोहरे आपल्या गळाला लावले असताना आणि पक्षात कमी नेते शिल्लक राहिलेले असताना शरद पवारांनी आपल्या नेतृत्व कौशल्याने फक्त राष्ट्रवादीलाच उभारी आणली नाहीतर कॉंग्रेसलाही काही जागा मिळवून दिल्या. पवारांचे खरे राजकीय कौशल्य तेव्हा पणाला लागले होते, नाहीतर आज राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट झाली असती, हे वास्तव आहे. त्यावेळी अजितदादा आपले पुत्र रोहित पवार यांना निवडून आणता येईल, या विचारात होते. अजित दादांनी भाजपशी नवी सोयरिक केली आहे खरी, परंतु सध्या स्थापन झालेल्या सरकारच्या विश्वास ठरावावेळी त्यांच्या बाजूने किती आमदार उभे राहणार, याबद्दल शंकाच वाटते. आता भाजपने सत्तेचे गणित जमवताना राष्ट्रवादीचा वजीरच आपल्या ताब्यात घेतला आहे. त्यामुळे थोरले पवार काही वेळ विचारात पडले असतील. परंतु पवार असे स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नाहीत. ते स्वतःला सावरून प्रतिपक्षाला कोंडीत पकडणारे आहेत. भाजपच्या खेळीनंतर शरद पवार आता जी खेळी करतील, ती वेगळीच असेल. तरीही अजित दादांनी आपल्या पक्षाशी बंड का केले, हा अस्वस्थ करणारा प्रश्न अनुत्तरीतच आहे.                                                                                        देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शुक्रवारी रात्रीपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यामध्ये स्थापन होईल असे चित्र दिसत असतानाच अचानक शनिवारी सकाळी राज्यात भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांनी घेतलेला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाविरोधातला आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकर परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीमधून अजित पवार अचानक उठून निघून गेल्यानंतर काय काय झाले यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री संध्याकाळी साडेसात वाजता महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पहिली संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी तिन्ही पक्षांना उद्धव ठाकरेंचे नेतत्व मान्य असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असेही स्पष्ट करण्यात आले. संजय राऊत यांनीही तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याचा दुजोरा प्रसार माध्यमांना दिला. रात्री साडेआठ वाजता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना संपर्क करुन सरकार बनवण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांना संपर्क केला. शिवसेनेच्या नेत्यांबरोबर सुरु असणाऱ्या बैठकीमधून अजित पवार तडकाफडकी निघून आले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचा भाजपाला पाठिंबा असल्याचे पत्र भाजपाच्या नेत्यांना दिल्याचे समजते. यासंदर्भात शरद पवार यांनी शनिवारी दुपारी बारा वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, आमदारांच्या सह्या असलेल्या पाठिंब्याचे पत्र दाखवून राज्यपालांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने सर्व आमदारांच्या सह्या घेतलेले हे पत्र असल्याचे ‘भास्कर डॉट कॉम’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. ऐत दादा हे राष्ट्रवादीचे अति महत्वाचे नेते असल्यामुळे त्यांच्याकडेच राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या सह्या असलेले पाठिंबा पत्र देण्यात आले होते. यानंतर अजित पवारांनी आपला मोबाईल बंद करुन ठेवला. परंतु यावेळेपर्यंत राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला ही खबर नव्हती की, अजित दादा आता सत्तेचा वेगळाच डाव खेळत आहेत. शनिवारी रात्री बारा वाजल्यानंतर सत्तेचा डाव पलटी करण्याचे षडयंत्र सुरु झाले. भाजपाचे महत्वाचे नेते आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसहीत राजभवनामध्ये पोहचले. भाजपाने अजित पवारांनी दिलेल्या पत्राच्या आधारावर सत्ता स्थापनेचा दावा केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या सर्व घटनाक्रमाची माहिती लागू नये म्हणून लवकरात लवकर शपथविधी उरकून घेण्यासाठी फडणवीस आग्रही होते. मात्र राज्यपालांनी सकाळी शपथविधीचा वेळ दिला. सकाळी लगबगीने देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्रीपद व उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शुक्रवारी रात्री एक वाजता राज्यपालांनी महाराष्ट्रातून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातील एक ई-मेल राष्ट्रपतींना पाठवला. राष्ट्रपती भवनातून हा ई-मेल गह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. केंद्रीय मंत्रीमंडळाने यावर निर्णय घ्यावा यासाठी हा ई-मेल गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव शुक्रवारी रात्रीच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर सादर करुन त्यावर मंत्र्यांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या. हे मंजूरीपत्र राष्ट्रपतींना शनिवारी पहाटेच्या सुमार मिळाल्यानंतर पहाटेच्या सुमारास राज्यातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आल्याचे अध्यादेश राष्ट्पतींनी जारी केला. अजित दादांकडे असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देवेंद्र फडणवीस यांना मिळताच रात्रीच केंद्रातील भाजपकडून तातडीने तांत्रिक सोपस्कार पार पाडण्यात आले होते                     राजभवनामध्ये शनिवारी सकाळी आठ वाजताच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र हा शपथविधी सोहळा नक्की कधी पार पडला याबद्दल वेगवेगळी माहिती समोर येत आहे. राष्ट्पतींनी सकाळी सव्वा पाच वाजता राज्यातील राष्ट्रपती राजवट मागे घेतली. त्यानंतर लगेचच फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली, असे म्हटले जात आहे. एनएनआय या वृत्तसंस्थेने सकाळी आठच्या सुमारास ही बातमी प्रसिद्ध केली. पीटीआय या वृत्तसंस्थेनेही सकाळी साडेसातच्या सुमारास शपथविधी सोहळा पार पडल्याचे म्हटले आहे. तसेच शपथविधीसंदर्भातील बातमी सकाळी आठनंतरच प्रकाशित करण्यासंदर्भातील सुचना राजभवनामधून करण्यात आल्याचे देशातील  एका आघाडीच्या दैनिकाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. राज्यात घाईघाईने भाजपचे सरकार स्थापन करण्यात आले आहे. परंतु या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी नक्की समजणार आहे की, अजित दादांना राष्ट्रवादीचे किती आमदार पाठिंबा देणार आहेत. भाजपचे संख्याबळ १०५ असून त्यांना १५  आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजते आणि अजित दादा पवारांसोबत किती आमदार येणार हे निश्चित नाही. भाजपला सत्ता स्थापेसाठी १४५ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. भाजपला सत्तेतून बाजूला ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादीने जमवून आणलेले गणित अजितदादांच्या सत्तालोभापायी बिघडले आहे. अजित दादांनी शरद पवारांना अंधारात ठेवून हे कृत्य केले असून याचे अनेक राजकीय परिणाम दादांना भोगावे लागतील. शिवसेनेचे संजय राऊत यांनी म्हटले आहे की, अजितदादांनी बंड करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तुम्हाला काय वाटतं ? 

                                                                                             - अशोक सुतार   


Saturday, 23 November 2019

'अग्रलेखांचा बादशाह' हरपला



     'अग्रलेखांचा बादशाह' हरपला
ज्येष्ठ पत्रकार आणि अग्रलेखांचे बादशाह म्हणून ओळखले जाणाऱ्या नीळकंठ खाडिलकर यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार सुरू होते. अग्रलेखांचा बादशाह म्हणून खाडिलकरांची ओळख होती. दै. नवाकाळ या वृत्तपत्राचे ते २७ वर्षे संपादक होते. खाडिलकर यांच्या मार्मिक आणि सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत धुमाकूळ घातला होता. त्यामुळेच त्यांना अग्रलेखांचा बादशाहअशी बिरुदावली मिळाली. वाचक सकाळी नवाकाळ वर्तमानपत्राची वाट पाहात असायचे. नवाकाळमधील अग्रलेख वाचण्यासाठी वाचकांची झुंबड उडायची. दि. ६ एप्रिल १९३४ रोजी खाडिलकर यांचा जन्म झाला. अर्थशास्त्र विषयासह त्यांनी बी.ए.ऑनर्सचे शिक्षण पूर्ण केले. अग्रलेखांव्यतिरिक्त एक उत्तम मुलाखतकार म्हणूनही त्यांची ओळख होती. गोळवलकर गुरूजी, सत्यसाईबाबा यांच्या खाडिलकरांनी घेतलेल्या मुलाखती खूप गाजल्या होत्या. ते ज्येष्ठ नाटककार आणि केसरीचे माजी संपादक कृ.प्र.खाडिलकर यांचे नातू होते. खाडिलकर यांची पत्रकारिता ही धाडसी होती. सत्य आहे तेच मांडायचे यासाठी ते आग्रही होते. नवाकाळमधील खाडिलकर यांच्या पत्रकारितेने वृत्तपत्रसृष्टीत निस्पृह बाणा निर्माण केला, एक ओळख निर्माण केली. पत्रकार कसा असावा याचे उकृष्ट उदाहरण म्हणजे निळूभाऊ खाडिलकर होय. खाडिलकर यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टीने एक निस्पृह, निर्भीड, लढाऊ बाण्याचा पत्रकार गमावला आहे.                                                                      नीळकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत चालू परिस्थितीवर भाष्य करून वाचकांचे प्रबोधन केले. ज्या काळात प्रसारमाध्यमांची साधने (सरकारी वाहिनी दूरदर्शन, रेडीओ वगळता) अजिबात उपलंध नव्हती, त्यावेळी खाडिलकर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने वाचकांचे लक्ष वेधून घेतले व समाजजागृती केली. त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखांची तत्कालीन सरकारांनी दखल घेतली, एवढी त्यांच्या लेखणीत ताकद होती. तत्कालीन वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहचविले. खाडीलकरांनी संध्याकाळ या नावाचे सायंदैनिकही काढले आहे. निळूभाऊ खाडिलकरांचे हिंदुत्व हे पुस्तक समीक्षकांच्या व वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.नीळकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत वाचकांना इतिहाससाक्षर केले आणि त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहचविले. असा हा अग्रलेखांचा बादशहा समाजातील तळागाळातील लोकांच्या वेदना, व्यथा मांडत राहिला. तळागाळातील लोकांच्या समस्या मांडून सरकारला त्याची दाखल घ्यायला लावणे ही खाडिलकरांच्या लेखणीची खासियत होती.त्यांच्या झंझावाती, मार्मिक आणि सामान्य वाचकालाही कळेल अशा सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत नवाकाळचे नाव प्राधान्याने घेतले जाई. खाडिलकर यांच्या ग्रंथवाचन व्यासंगाचा अनेक विद्वानांनी गौरव केला आहे. तळागाळातील लोकांसाठी नीळकंठ खाडिलकरांनी आपली लेखणी नेहमीच वापरली. खाडिलकरांच्या अग्रलेखांचे पाचहून अधिक संग्रह प्रकाशित झाले आहेत, तसेच अग्रलेखांच्या अनेक आवृत्तीही प्रसिद्ध झाल्या. त्यांनी ४६ पुस्तके लिहिली. राजे शिवाजी या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या अडीच लाखाहून अधिक प्रति खपल्याचा विक्रम आहे. असा हा प्रतिभावंत संपादक हरपला काळाच्या पडद्याआड गेला आहे.                                           नाट्याचार्य खाडिलकर यांनी ७ मार्च १९२३ रोजी दैनिक 'नवाकाळ' ची स्थापना केली. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर अग्रलेख आणि टिका टिप्पणी याबद्दल दि. ९ फेब्रुवारी १९२९ रोजी राजद्रोहाचा खटला   भरला. दि. २७ मार्च १९२९ रोजी त्यांना एक वर्ष साधी कैद व दोन हजार रुपये दंडाची सजा झाली. पण तो ब्रिटिशांचा तुरुंग होता. त्यांनी जातानाच 'नवाकाळ' चे संपादकपद सोडले आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र यशवंत कृष्णा उर्फ अप्पासाहेब खाडिलकर संपादक झाले. काकासाहेब तुरुंगातून जानेवारी १९३० साली परत आल्यानंतर ते पुन्हा संपादक झाले नाहीत. नाट्याचार्य यांचे वय ५८ होते. पण त्यांनी वेळीच स्वयंस्फूर्तीने संपादकपद सोडले होते. त्यांना थांबायचे कुठे ? याची उत्तम जाण होती ! हीच परंपरा खाडिलकर घराण्याने पुढे जपली. अप्पासाहेब खाडिलकरांनी वयाच्या ६४ व्या वर्षी १ ऑक्टोबर १९६९ रोजी दैनिक नवाकाळचे संपादकपद सोडल्यानंतर नीळकंठ खाडिलकरांचे नाव संपादक, मुद्रक आणि प्रकाशक म्हणून जाहीर करण्यात आले. नीळकंठ खाडिलकर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी १९९७ साली मार्चमध्ये 'नवाकाळ' चे संपादकपद सोडले आणि कन्या सौ. जयश्री रमाकांत-पांडे यांना संपादक, मुद्रक व प्रकाशक म्हणून जाहीर केले. मागोमाग डिसेंबर १९९८ मध्ये खाडिलकर यांनी 'संध्याकाळ'चे संपादकपद सोडले आणि  सर्वांत लहान कन्या रोहिणी नीळकंठ खाडिलकर यांना संपादकपद दिले. खाडिलकर यांनी वयाच्या ६३ वर्षानंतर नवाकाळचे संपादकपद सोडणे म्हणजे ही एक मोठी परंपरा आहे. ती पुढेही जपली जाईल, असे वाटते.                                           भारतामध्ये वर्तमानपत्रांना आपले विचार, भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिले आहे. परंतु एखाद्या वृत्तपत्राच्या संपादकाला न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल तुरूंगात टाकण्याच्या घटना देशात दुर्लभ आहेत. मुंबईतील १९९२-९३ मधील जातीय दंगलीची चौकशी सुरू असताना न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्णवर दैनिक नवाकाळच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली होती. त्यावेळी नीळकंठ खाडिलकर हे अग्रलेख लिहित असत व ते कार्यकारी संपादक होते. नवाकाळच्या अग्रलेखात निळूभाऊंनी श्रीकृष्ण यांना न्यायमूर्ती श्रीकृष्ण असे संबोधले होते. नवाकाळ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात श्रीकृष्ण आयोगावर ताशेरे ओढण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने नवाकाळच्या संपादकांविरूद्ध न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला दाखल केला होता. श्रीकृष्ण आयोगावर टीका करताना 'न्यायमूर्ती' उपसर्ग वापरल्याने कोर्टाची प्रतिष्ठा कमी होते, असे न्यायालयाचे म्हणणे होते. श्रीकृष्ण हे कमिशनचे नेतृत्व करणारे न्यायाधीश असल्याचा उपसर्ग वापरणे योग्य प्रकारे आहे, असा युक्तिवाद नवाकाळने करत त्यांनी आपली भूमिका कायम राखली. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडिलकर यांना सहा दिवस तुरुंगवास भोगावा लागला. वयाच्या कारणास्तव निळकंठ खाडिलकर यांना तुरुंगात टाकले नव्हते. खरे तर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी एक दिवसाची शिक्षा असते, परंतु न्यायालयाने जयश्री खाडिलकर यांना सहा दिवस तुरुंगात टाकले. तत्कालीन महाराष्ट्र विधानसभेतील लोकप्रतिनिधींच्या निषेधांमुळे खाडिलकर यांची सातव्या दिवशी सुटका करण्यात आली होती. न्यायालयात माफी मागण्याऐवजी तुरुंगवास स्वीकारणारी नवाकाळची बेडर पत्रकारिता आहे. आतापर्यंत कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप लावलेल्या सर्व संपादकांनी शांतपणे माफी मागितली आहे आणि तुरुंगात जाण्यापासून अनेकजण बचावले आहेत. आहे. नवाकाळच्या या धाडसी भूमिकेमुळे नवाकाळला लोकांचा जोरदार पाठिंबा मिळाला होता. आपल्या विचारांवर ठाम असणाऱ्या खाडिलकर यांनी नेहमीच कामगार, शोषितांची बाजू नवाकाळमधून मांडली आणि त्यांना न्याय दिला. निळकंठ खाडिलकर यांचे पत्रकारितेतील योगदान महाराष्ट्राच्या नेहमीच स्मरणात राहील.                                                                      खाडिलकर हे व्यासंगी साहित्यिक होते. त्यांनी टॉवर्स ,संत तुकाराम, द्रौपदी (नाटक), मऱ्हाठाचि बोलु कौतुके (३६ अग्रलेखांचा संग्रह), महात्मा गांधी, यशस्वी कसे व्हाल ?, राजे शिवाजी (या पुस्तकाच्या अडीच लाखाहून अधिक प्रती खपल्याचा तत्कालीन विक्रम), रामायण, महाभारतातील शहाणपण, शूरा मी वंदिले, श्रीकृष्ण अशी एकूण विविध विषयांवरची ४६ पुस्तके लिहिली आहेत. पत्रकारितेतील उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या नीळकंठ खाडिलकर यांना अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले. महाराष्ट्र सरकारचा पत्रकारितेचा पहिला लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार(२००८), मुंबई मराठी पत्रकार संघाचे दोनदा अध्यक्षपद, भाषिक वृत्तपत्र संघटना आयएलएनएचे ते चिटणीसपद, भारत सरकारचा पद्मश्री, ‘चौफेरकराडतर्फे सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार (२०११), मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य अत्रे पुरस्कार, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (२०१७) असे अनेक पुरस्कार व सन्मान निळूभाऊंना मिळाले. त्यात लोकांनी त्यांना दिलेला सन्मान महत्वाचा होता. सर्वसामान्यांना त्यांच्या अग्रलेखात आपल्या वेदना आणि दु:ख दिसत असे. एवढेच नव्हे तर या समस्यांवर काय उपाय आहेत, याचेही मार्गदर्शन होई. म्हणूनच नवाकाळ हा खऱ्या अर्थाने लोकांचे मुखपत्र बनला. निळकंठ खाडिलकर यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टीची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे, हे मात्र प्रत्येकाला मान्य करावेच लागेल.

                                  - अशोक सुतार                                                                     


Saturday, 16 November 2019

महाराष्ट्राची सत्ता कुणाकडे ?


महाराष्ट्राची सत्ता कुणाकडे ?








शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, शिवसेनेची राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे. लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. रालोआच्या बैठकीला शिवसेना हजर राहिली नव्हती हे विशेष. शिवसेनेने भाजपशी असलेली युती केंद्र व राज्यातही तोडली आहे, असे दिसते. राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचानंतर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला. शिवसेनेने भाजपशी फारकत घेतली असताना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसशी सेनेची जवळीक वाढली आहे. महा शिवआघाडी होण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे की, दि. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला नवे सरकार स्थापन होईल अशी चर्चा आहे. मात्र राज्यात १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होणे अवघड आहे, पण शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे सरकार पाच वर्षं टिकेल. पवार यांच्या विधानाचा अर्थ लावायचा तर महा शिव आघाडीचे सरकार स्थापन होण्यासाठी अजून बराच वेळ लागणार असे दिसते. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या अडीच अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असे काही ठरलेले नसून किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरु आहे, यातूनच राज्याला शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळेल, असाही विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचा राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसशी सातत्याने संपर्क आहे, त्यामुळे उशिरा का होईना महा शिवआघाडी आकार घेण्याची शक्यता आहे.

 शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे, शिवसेना कॉंग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेऊन महा शिवआघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना तयार आहे. परंतु भाजपचे नेते आता पुन्हा एकदा, महाराष्ट्रात आमचेच सरकार येणार असे म्हणू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे १०५ आमदार निवडून आले, सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांना राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. मात्र आम्ही सरकार स्थापन करणार नाही, असा दावा त्यांनी त्यावेळी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. आता राज्यपालांनी घाईघाईने राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर भाजपाकडून सरकार आमचेच होणार, असे दावे केले जात आहेत. भाजपकडे अपक्षांना सोबत घेऊन १२१ संख्याबळ होत आहे. अशा वेळी भाजपला शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांपैकी कोणत्या तरी पक्षाला सोबत घेऊन सरकार बनवावे लागेल. परंतु यातील कुणाचाच पाठिंबा भाजपला नसल्यामुळे भाजप सत्तेसाठी अपेक्षित संख्याबळासाठी घोडेबाजार करण्याची शक्यता आहे. तसा आरोपही राऊत यांनी भाजपवर केला आहे. राऊत हे नुकतेच हॉस्पिटलमधून परतले आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर वाटाघाटी सुरू केल्यानंतर संजय राऊतांनी महा शिवआघाडी होण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला आहे.शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा सुरू केली आहे. शिवसेनाला आता भाजपशी कुठल्याही प्रकारे तडजोड करायची नाही, असे दिसत आहे.                                 राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांची आगामी काळातील भूमिका काय असेल याबद्दल चर्चा सुरु असताना भाजपचे नेते चंद्रकांत दादांनी, मुख्यमंत्री आमचाच होणार असल्याचे पालुपद सुरु ठेवले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये सविस्तर चर्चा सुरू आहे. सरकारमध्ये कोण कोणत्या पदांवर काम करेल हे ठरवावे लागेल, आगामी निवडणुकांमध्ये तीनही पक्षांची भूमिका काय असणार यावर विचार करणे गरजेचे आहे. राज्यात माह शिवआघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी तीनही पक्षांची भूमिका ठरवावी लागेल. एका निश्चित राजकीय रणनीतीने पुढे चालण्याची गरज आहे. महा शिवआघाडीमुळे राज्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे दिसत आहे. भाजपचा सध्या एकच हेतू आहे, तो म्हणजे दुसऱ्या पक्षांतील आमदार आपल्या बाजूने वळवायचे आणि अपेक्षित संख्याबळ झाले की सत्तास्थापनेचा पुन्हा घाट घालायचा. त्यामुळेच भाजपकडे अपेक्षित संख्याबळ नसताना भाजपचे नेते म्हणत आहेत की, आमचाच मुख्यमंत्री बनणार. असो. राजकारणात अनेक डावपेच सुरु असतात. विरोधी पक्षाचे मानसिक बळ खच्ची करण्याच्या दृष्टीने आम्ही कमी नाही, हे दाखवण्याची खेळी असते. भाजपची ही खेळी त्यातलीच एक असावी.                              राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेनेने सत्तास्थापनेची मुदत वाढवून न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सेनेची बाजू कोर्टात मांडणार आहेत. आम्हाला आता ४८ तासनव्हे तर सहा महिन्याचा वेळ राज्यपालांनी दिला आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता. भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी पाचारण केले होते. नंतर राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे निमंत्रण देण्यात आले. परंतु राष्ट्रवादीला दिलेली मुदत संपण्यापूर्वीच केंद्र सरकारने राज्यपालांकडे शिफारस पत्र देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लादण्यात आली. यानंतर राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण करण्यात आला आहे. भाजपने सत्ता स्थापण्यास असमर्थता दाखवली असताना आता पुन्हा भाजपच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेसाठी आम्ही इच्छुक असल्याचे म्हटले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत चर्चा होऊन सत्तास्थापनेचे एकमत झाले असून त्यादृष्टीने चर्चा सुरु आहे. भाजपनेही याबाबत ‘थांबा आणि पहा’ ची भूमिका घेतली आहे. भाजपचे गेल्या पाच वर्षांतील राजकारण जनतेने पाहिले आहे, त्यामुळे आता जनतेने काय पहायचे, त्यांनी काय दाखवायचे बाकी राहिले आहे, ते समजत नाही. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी महा शिवआघाडीच्या सरकारबाबत प्रयत्न सुरु केले असून शिवसेना, राष्ट्रवादीला कॉंग्रेससोबत सत्ता स्थापन करण्यासाठी यश येते का ते पहावे लागेल. भाजपच्या बड्या नेत्यांनी पुन्हा आमचाच मुख्यमंत्री ही चर्चा (की अफवा ?) सुरु केल्यामुळे ते जनतेला कोणत्या राजकीय रणनीतीचे दर्शन घडवणार हे पहावे लागेल. तोपर्यंत जनतेनेही ‘थांबा आणि पहा’ हीच भूमिका घेणे योग्य वाटते. आपल्याला काय वाटते ? 





चंद्रकांतदादांचा उताविळपणा

Wednesday, 13 November 2019

गेली नैतिकता कुठे ?


             गेली नैतिकता कुठे ?

                                                 कृष्णाकाठ / अशोक सुतार

                                                      ८६००३१६७९८   



महाराष्ट्रात शिव महाआघाडीचे सरकार सत्तेवर येण्याच्या प्रयत्नात असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पाठिंब्याचा प्रस्ताव येण्यास उशीर झाल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी क्रमांक ३ नंबरच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. शिवसेनेचे सरकार स्थापन करण्यावर राज्यपालांनी कोणताच निर्णय घेतला नाही. शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्याची संधी न देता राष्ट्रवादीला अचानकरित्या निमंत्रण दिल्यामुळे राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. राज्यात अशी राजकीय संभ्रमाची परिस्थिती असताना केंद्र सरकारने राज्यपालांकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा खलिता धाडला. भाजपशिवाय दुसऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाला सत्ता स्थापनेसाठी व विश्वासदर्शक ठराव संमत करण्यासाठी राज्यपालांनी वाढीव मुदत दिली नाही, हे आश्चर्यकारक वाटते. त्यात भरीस भर म्हणजे राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी दिलेली मुदत संपण्यापुर्वी राज्यात राष्ट्रपती लागू व्हावी, या राज्यपालांनी पाठविलेल्या पत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केली आहे. घाईघाईने व एकाधिकारशाही वापरून केंद्र सरकारने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राज्यपालांना पत्र दिले व त्यावर त्वरित कारवाई झाली, हे पाहता केंद्र सरकारच्या म्हणजेच भाजपच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सत्तास्थापनेसाठी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी न्यायासानाकडे दाद मागितलच, परंतु राज्यात जे काही राजकारण चालले आहे, ते जनतेच्या हिताचे नाही.       महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यपालांनी जो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला होता त्या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केली आहे. मंगळवारी सकाळपासूनच राष्ट्रपती लागू होईल, अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. यासंदर्भातली शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली होती. भाजपाने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेनेला संधी देण्यात आली. मात्र शिवसेना दिलेल्या मुदतीत दावा सिद्ध करु शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला त्यानंतर चोवीस तासांची मुदत देण्यात आली. मात्र ही मुदत संपायच्या आतच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती राजवटीच्या आदेशावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आणि महाराष्ट्रात भाजप सोडून इतर राजकीय पक्षांना विचारात घेतले जात नसल्याची भावना बळावली  आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता. भाजप- १०५, शिवसेना- ५६ असे महायुतीला  बहुमत मिळूनही दोन्ही पक्षांत मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु होता. या दोन्ही पक्षांचे आपसात एकमत झाले नसल्याने युतीचे सरकार ही कल्पना कल्पनाच राहिली. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. १०५ जागा जिंकलेल्या भाजपशिवसेनेने महायुती म्हणून विधानसभा  निवडणूक लढवूनही सोबत येण्यास नकार दिल्याने त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्यास शुभेच्छा दिल्या. ०५ जागा जिंकणाऱ्या भाजपाने जेव्हा सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी बोलावले आणि २४ तासांची मुदत दावा सिद्ध करण्यासाठी दिली. मात्र शिवसेना हा दावा मुदतीत पूर्ण करु शकली नाही त्यामुळे त्यांचा दावा निष्प्रभ ठरला. शिवसेना दावा सिद्ध करु न शकल्याने राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला संधी दिली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेली मुदत पूर्ण होण्याआधीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. यापूर्वी मंगळवारी दिवसभर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही संपर्कात होते. तसेच काँग्रेसचे नेतेही दिल्लीहून शरद पवार यांच्या भेटीसाठी आले. या सर्व घडामोडी घडत असताना दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कॅबिनेटची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यातल्या सत्तापेचावर चर्चा झाली आणि त्यानंतर अवघ्या दोन तासात राष्ट्रपती राजवटीच्या प्रस्तावावर सही करण्यात आली. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. महाराष्ट्रात एखाद्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी अल्पमुदत दिली जाते आणि ही मुदत संपण्यापूर्वी अचानकारीत्या राष्ट्रपती राजवट लागू केली जाते, हे विशेष आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या राजकीय भूमिकेबद्दल शंका निर्माण होत आहे.

 महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. भाजपा आणि शिवसेना सत्ता स्थापन करण्यात असमर्थ ठरल्यानंतर राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. त्यासाठी मंगळवारी रात्री ८.३० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची तयारी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापनेस असमर्थता दाखवली असती तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्यास हरकत नव्हती. मात्र राष्ट्रवादीला देण्यात आलेली मुदत संपण्याच्या आधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट शिफारसीचे पत्र राष्ट्रपतींकडे पाठवल्याने अनेक राजकीय पक्संतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स समिटसाठी ब्राझिलला निघण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटची बैठक बोलावून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे पत्र राज्यपालांकडे घाईघाईने दिले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे राज्यात निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा गुंता सुटण्याऐवजी आणखी वाढत चालला आहे. राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेच आमंत्रण दिल्यानंतर त्याची मुदत संपण्याआधीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. तसेच  शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर पुरेसा वेळ देण्यास राज्यपालांनी नकार दिला. या निर्णयाला शिवसेनेने थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवसेनेची बाजू मांडणार आहे. भाजपने सरकार स्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला आमंत्रण दिले  होते. मात्र, त्यासाठी २४ तासांचा वेळ देण्यात आला होता. या काळात शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनुकूल असली तरी पाठिंबा मिळू शकला नाही. त्यामुळे शिवसेनेने आपल्याला तीन दिवसांचा वेळ वाढवून देण्यात यावा, अशी मागणी राज्यपालांकडे केली होती. राज्यपालांनी ही मागणी फेटाळून लावत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेच निमंत्रण दिले. राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला अवधी संपण्याआधीच राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वेळ वाढवून मागितला होता. ती मागणी फेटाळत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्यानंतर शिवसेनेने सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे सांगत राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. शिवसेनेच्या वतीने अ‍ॅड. सुनील फर्नांडिस यांनी ही याचिका दाखल केली असून सेनेची बाजू काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल मांडणार आहेत.                                                  सत्ता स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीशी संपर्क ठेवत शिवसेनेने हलचाली सुरु केल्या आहेत. यावरुन भाजप समर्थकांनी म्हटले आहे की, दोन्ही काँग्रेसला बरोबर घेऊन शिवसेनेने सत्ता स्थापन करणे नैतिकतेला धरुन नाही. अनेक राज्यांत भाजपला बहुमत नाही, काही ठिकाणी तर नगण्य संख्याबळ असताना भाजपने त्या राज्यांत सरकार स्थापन केल्याचे पाहायला मिळते. त्यावेळी भाजपची नैतिकता कुठे गेली होती, असा सवाल उपस्थित होत आहे. गोव्यामध्ये काँग्रेसला १७ जागा भाजपाला १३, मणिपूरमध्ये काँग्रेसला २८ जागा भाजपाला २१ जागा, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलला ८० तर जनता दल युनायटेडला ७१ आणि भाजपाला ५३ जागा, मेघालयमध्ये भाजपाला केवळ दोन तर काँग्रेसला २१ आणि नॅशनल पीपल्स पार्टीला १९ जागा होत्या. अशी परिस्थिती असताना भाजपाने या राज्यात सरकारे बनवताना नैतिकता गुंडाळून ठेवली होती का, असा सवाल कॉंग्रेसचे माजी आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे.राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. शिवसेनेनेही राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी पत्र दिले होते. आता शिवसेनेने शपथविधी सोहळा घ्यावा आणि कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या पाठींब्याने सत्ता स्थापन करणे हे न्याय्य ठरले असते. शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी वेळ देणे महत्वाचे होते, पण तसे झाले नाही. याचवेळी भाजपच्या नेत्यांनी मिडीयावर, आता राष्ट्रपती राजवट लागू होणार, असा दावा केला होता. केंद्र सरकारच्या घाईघाईच्या निर्णयावरून असे वाटते की भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी दोन दिवसांपासून केली होती. राज्यात सत्ता स्थापनेचा निर्माण झालेला राजकीय पेच सुटणे महत्वाचे आहे, राष्ट्रपती राजवट लागू करणे हितावह नाही.

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर