'अग्रलेखांचा बादशाह' हरपला
ज्येष्ठ पत्रकार आणि
अग्रलेखांचे बादशाह म्हणून ओळखले जाणाऱ्या नीळकंठ खाडिलकर यांचे शुक्रवारी पहाटे
अल्पशा आजाराने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील लिलावती
रूग्णालयात उपचार सुरू होते. अग्रलेखांचा बादशाह म्हणून खाडिलकरांची ओळख होती. दै.
नवाकाळ या वृत्तपत्राचे ते २७ वर्षे संपादक होते. खाडिलकर यांच्या मार्मिक आणि
सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत धुमाकूळ घातला होता. त्यामुळेच
त्यांना ‘अग्रलेखांचा बादशाह’ अशी बिरुदावली मिळाली. वाचक सकाळी
नवाकाळ वर्तमानपत्राची वाट पाहात असायचे. नवाकाळमधील अग्रलेख वाचण्यासाठी वाचकांची
झुंबड उडायची. दि. ६ एप्रिल १९३४ रोजी खाडिलकर यांचा जन्म झाला. अर्थशास्त्र
विषयासह त्यांनी बी.ए.ऑनर्सचे शिक्षण पूर्ण केले. अग्रलेखांव्यतिरिक्त एक उत्तम
मुलाखतकार म्हणूनही त्यांची ओळख होती. गोळवलकर गुरूजी, सत्यसाईबाबा
यांच्या खाडिलकरांनी घेतलेल्या मुलाखती खूप गाजल्या होत्या. ते ज्येष्ठ नाटककार
आणि केसरीचे माजी संपादक कृ.प्र.खाडिलकर यांचे नातू होते. खाडिलकर यांची
पत्रकारिता ही धाडसी होती. सत्य आहे तेच मांडायचे यासाठी ते आग्रही होते.
नवाकाळमधील खाडिलकर यांच्या पत्रकारितेने वृत्तपत्रसृष्टीत निस्पृह बाणा निर्माण
केला, एक ओळख निर्माण केली. पत्रकार कसा असावा याचे उकृष्ट उदाहरण म्हणजे निळूभाऊ
खाडिलकर होय. खाडिलकर यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टीने एक निस्पृह, निर्भीड, लढाऊ बाण्याचा
पत्रकार गमावला आहे. नीळकंठ
खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत
चालू परिस्थितीवर भाष्य करून वाचकांचे प्रबोधन केले. ज्या काळात प्रसारमाध्यमांची
साधने (सरकारी वाहिनी दूरदर्शन, रेडीओ वगळता) अजिबात उपलंध नव्हती, त्यावेळी
खाडिलकर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने वाचकांचे लक्ष वेधून घेतले व समाजजागृती
केली. त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखांची तत्कालीन सरकारांनी दखल घेतली, एवढी
त्यांच्या लेखणीत ताकद होती. तत्कालीन वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू
व विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहचविले. खाडीलकरांनी संध्याकाळ या नावाचे
सायंदैनिकही काढले आहे. निळूभाऊ खाडिलकरांचे हिंदुत्व हे पुस्तक समीक्षकांच्या व
वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.नीळकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि
संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत वाचकांना इतिहाससाक्षर केले आणि
त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचन
वाचकांपर्यंत पोहचविले. असा हा अग्रलेखांचा बादशहा समाजातील तळागाळातील लोकांच्या
वेदना, व्यथा मांडत राहिला. तळागाळातील लोकांच्या समस्या मांडून
सरकारला त्याची दाखल घ्यायला लावणे ही खाडिलकरांच्या लेखणीची खासियत होती.त्यांच्या
झंझावाती, मार्मिक आणि सामान्य वाचकालाही कळेल अशा सोप्या भाषेतील
अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत नवाकाळचे नाव प्राधान्याने घेतले जाई. खाडिलकर
यांच्या ग्रंथवाचन व्यासंगाचा अनेक विद्वानांनी गौरव केला आहे. तळागाळातील
लोकांसाठी नीळकंठ खाडिलकरांनी आपली लेखणी नेहमीच वापरली. खाडिलकरांच्या
अग्रलेखांचे पाचहून अधिक संग्रह प्रकाशित झाले आहेत, तसेच
अग्रलेखांच्या अनेक आवृत्तीही प्रसिद्ध झाल्या. त्यांनी ४६ पुस्तके लिहिली. राजे
शिवाजी या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या अडीच लाखाहून अधिक प्रति खपल्याचा
विक्रम आहे. असा हा प्रतिभावंत संपादक हरपला काळाच्या पडद्याआड गेला आहे. नाट्याचार्य खाडिलकर यांनी ७ मार्च १९२३
रोजी दैनिक 'नवाकाळ' ची स्थापना केली. ब्रिटिश सरकारने
त्यांच्यावर अग्रलेख आणि टिका टिप्पणी याबद्दल दि. ९ फेब्रुवारी १९२९ रोजी
राजद्रोहाचा खटला भरला. दि. २७ मार्च
१९२९ रोजी त्यांना एक वर्ष साधी कैद व दोन हजार रुपये दंडाची सजा झाली. पण तो
ब्रिटिशांचा तुरुंग होता. त्यांनी जातानाच 'नवाकाळ' चे संपादकपद
सोडले आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र यशवंत कृष्णा उर्फ अप्पासाहेब खाडिलकर संपादक
झाले. काकासाहेब तुरुंगातून जानेवारी १९३० साली परत आल्यानंतर ते पुन्हा संपादक
झाले नाहीत. नाट्याचार्य यांचे वय ५८ होते. पण त्यांनी वेळीच स्वयंस्फूर्तीने
संपादकपद सोडले होते. त्यांना थांबायचे कुठे ? याची उत्तम
जाण होती ! हीच परंपरा खाडिलकर घराण्याने पुढे जपली. अप्पासाहेब खाडिलकरांनी
वयाच्या ६४ व्या वर्षी १ ऑक्टोबर १९६९ रोजी दैनिक नवाकाळचे संपादकपद सोडल्यानंतर
नीळकंठ खाडिलकरांचे नाव संपादक, मुद्रक आणि प्रकाशक म्हणून जाहीर
करण्यात आले. नीळकंठ खाडिलकर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी १९९७ साली मार्चमध्ये 'नवाकाळ' चे संपादकपद
सोडले आणि कन्या सौ. जयश्री रमाकांत-पांडे यांना संपादक, मुद्रक व
प्रकाशक म्हणून जाहीर केले. मागोमाग डिसेंबर १९९८ मध्ये खाडिलकर यांनी 'संध्याकाळ'चे संपादकपद
सोडले आणि सर्वांत लहान कन्या रोहिणी
नीळकंठ खाडिलकर यांना संपादकपद दिले. खाडिलकर यांनी वयाच्या ६३ वर्षानंतर नवाकाळचे
संपादकपद सोडणे म्हणजे ही एक मोठी परंपरा आहे. ती पुढेही जपली जाईल, असे वाटते. भारतामध्ये वर्तमानपत्रांना आपले विचार, भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य भारतीय
राज्यघटनेने दिले आहे. परंतु एखाद्या वृत्तपत्राच्या संपादकाला न्यायालयाचा अवमान
केल्याबद्दल तुरूंगात टाकण्याच्या घटना देशात दुर्लभ आहेत. मुंबईतील १९९२-९३ मधील
जातीय दंगलीची चौकशी सुरू असताना न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्णवर दैनिक
नवाकाळच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली होती. त्यावेळी नीळकंठ खाडिलकर हे
अग्रलेख लिहित असत व ते कार्यकारी संपादक होते. नवाकाळच्या अग्रलेखात निळूभाऊंनी
श्रीकृष्ण यांना न्यायमूर्ती श्रीकृष्ण असे संबोधले होते. नवाकाळ मध्ये प्रसिद्ध
झालेल्या अग्रलेखात श्रीकृष्ण आयोगावर ताशेरे ओढण्यात आल्यानंतर न्यायालयाने
त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने
नवाकाळच्या संपादकांविरूद्ध न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला दाखल केला होता.
श्रीकृष्ण आयोगावर टीका करताना 'न्यायमूर्ती' उपसर्ग
वापरल्याने कोर्टाची प्रतिष्ठा कमी होते, असे न्यायालयाचे म्हणणे होते.
श्रीकृष्ण हे कमिशनचे नेतृत्व करणारे न्यायाधीश असल्याचा उपसर्ग वापरणे योग्य
प्रकारे आहे, असा युक्तिवाद नवाकाळने करत त्यांनी आपली भूमिका कायम
राखली. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडिलकर यांना
सहा दिवस तुरुंगवास भोगावा लागला. वयाच्या कारणास्तव निळकंठ खाडिलकर यांना
तुरुंगात टाकले नव्हते. खरे तर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी एक दिवसाची शिक्षा
असते, परंतु न्यायालयाने जयश्री खाडिलकर यांना सहा दिवस तुरुंगात टाकले. तत्कालीन
महाराष्ट्र विधानसभेतील लोकप्रतिनिधींच्या निषेधांमुळे खाडिलकर यांची सातव्या
दिवशी सुटका करण्यात आली होती. न्यायालयात माफी मागण्याऐवजी तुरुंगवास स्वीकारणारी
नवाकाळची बेडर पत्रकारिता आहे. आतापर्यंत कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप लावलेल्या
सर्व संपादकांनी शांतपणे माफी मागितली आहे आणि तुरुंगात जाण्यापासून अनेकजण बचावले
आहेत. आहे. नवाकाळच्या या धाडसी भूमिकेमुळे नवाकाळला लोकांचा जोरदार पाठिंबा
मिळाला होता. आपल्या विचारांवर ठाम असणाऱ्या खाडिलकर यांनी नेहमीच कामगार, शोषितांची
बाजू नवाकाळमधून मांडली आणि त्यांना न्याय दिला. निळकंठ खाडिलकर यांचे
पत्रकारितेतील योगदान महाराष्ट्राच्या नेहमीच स्मरणात राहील. खाडिलकर
हे व्यासंगी साहित्यिक होते. त्यांनी टॉवर्स ,संत तुकाराम, द्रौपदी
(नाटक), मऱ्हाठाचि बोलु कौतुके (३६ अग्रलेखांचा संग्रह), महात्मा गांधी, यशस्वी कसे
व्हाल ?, राजे शिवाजी (या पुस्तकाच्या अडीच लाखाहून अधिक प्रती
खपल्याचा तत्कालीन विक्रम), रामायण, महाभारतातील
शहाणपण, शूरा मी वंदिले, श्रीकृष्ण अशी एकूण विविध विषयांवरची
४६ पुस्तके लिहिली आहेत. पत्रकारितेतील उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या नीळकंठ
खाडिलकर यांना अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले. महाराष्ट्र सरकारचा
पत्रकारितेचा पहिला लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार(२००८), मुंबई मराठी
पत्रकार संघाचे दोनदा अध्यक्षपद, भाषिक वृत्तपत्र संघटना ‘आयएलएनए’चे ते
चिटणीसपद, भारत सरकारचा पद्मश्री, ‘चौफेर’ कराडतर्फे ‘सुधारक’कार गोपाळ
गणेश आगरकर पुरस्कार (२०११), मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य अत्रे
पुरस्कार, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (२०१७) असे
अनेक पुरस्कार व सन्मान निळूभाऊंना मिळाले. त्यात लोकांनी त्यांना दिलेला सन्मान
महत्वाचा होता. सर्वसामान्यांना त्यांच्या अग्रलेखात आपल्या वेदना आणि दु:ख दिसत
असे. एवढेच नव्हे तर या समस्यांवर काय उपाय आहेत, याचेही
मार्गदर्शन होई. म्हणूनच नवाकाळ हा खऱ्या अर्थाने लोकांचे मुखपत्र बनला. निळकंठ
खाडिलकर यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टीची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे, हे मात्र
प्रत्येकाला मान्य करावेच लागेल.
- अशोक सुतार

No comments:
Post a Comment