Sunday, 15 December 2019

हिवाळी अधिवेशन


हिवाळी अधिवेशन
updated 15 dec2019 / 6.55


आजपासून नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष सज्ज झाला असून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आले असून, त्यांच्यामध्ये विसंवाद असून सरकारने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाक ला असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होत असून राज्याला मंत्रीच नसल्याने विषय कुणाकडे मांडायचे, असा प्रश्न पडला असल्याचे फडणवीस म्हणत आहेत.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे. फडणवीस म्हणाले, आम्ही काळजीवाहू सरकार असताना अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांच्या मदतीसंदर्भात निर्णय घेतला होता. सरकार स्थापन झाल्यानंतर पुढील मदत करून असेही म्हटलो होतो. त्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली होती. तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले असले तरी शेतकर्‍यांना मदत करण्यासंदर्भातला निर्णय झालेला नाही. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकर्‍यांची चर्चा नाही. सरकार आल्यानंतर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती, पण अद्याप मिळालेली नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीने सरसकट कर्जमाफी आणि कोरा सातबारा करण्याचे आश्वासन दिले आहे. ते कधी करणार त्याचा कार्यक्रम सरकारनं जाहीर करायला हवा. पण सरकार वेळकाढूपणा करत आहे,अशी टीका फडणवीस यांनी केली. फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षे अनुभव आहे. त्यामुळे फडणवीस या हिवाळी अधिवेशनात महा विकास आघाडीच्या राज्य सरकारची कोंडी करणार हे निश्चित. परंतु फडणवीसांनी त्यांच्या कारकिर्दीत अपुरी ठेवलेली कामे विद्यमान सरकार पूर्ण करणार आहे. सरकार स्थापन होऊ न जेमतेम एक महिना होत आला आहे आणि माजी मुख्यमंत्री फडणवीसांना शेतकर्‍यांच्या प्रश्नांची घाई झाली आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात शेतकर्‍यांना मदतीसाठी पाच वर्षे ताटकळत ठेवले आणि हे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ले देत आहेत. हे अजबच म्हटले पाहिजे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. त्या बहिष्कारामागे सावरकरवादाचे कारण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. म्हणजेच या अधिवेशनात नवीन सरकारला कोंडीत पकडायचे यापलिकडे विरोधकांकडे नवा अजेंडा दिसत नाही.                                                                             राज्यात महा विकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाले असून भाजपचे शिवसेनेसोबत सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले आहे. आपला सत्तेतील पूर्वीचा सहपक्ष शिवसेना राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्तेवर आलेला पाहून भाजपेयी चिडले आहेत. देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न धुळीस मिळाले, याचा राग देंवेंद्रांच्या मनात आहेच. त्यामुळे सरकारसमोर अधिवेशनात राज्यातील झाडून सारे प्रश्न मांडून शिवसेनेची गोची करायची, असे विरोधी पक्षाने ठरवलेले दिसत आहे. या हिवाळी अधिवेशनात विरोधक गोंधळ करून कामकाज चालू देण्याची शक्यता खुप कमी वाटते. फडणवीस म्हणतात की, कर्ज असणार्‍या मोठ्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती चांगली आहे. गेल्या पाच वर्षात भरपूर निधी राज्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक स्थितीचं कारण सांगून आणि चुकीच्या बातम्या पसरवून हात वर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ( फडणवीस यांच्या कार्यकाळात ते तसे म्हणत नव्हते. याच्याउलट, फडणवीसांनी सरकारच्या तिजोरीत पैसा उपलब्ध नसल्याची रट लावली होती, हे विशेष !) नागपूर येथे होणार्‍या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणार्‍या सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. सावरकरवादाच्या पार्श्वभूमीवर हा बहिष्कार टाकत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. खरे तर विरोधी पक्षाने, सरकारने काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. परंतु फडणवीस म्हणतात की, विरोधी पक्ष म्हणून आमच्या काहीच मागण्या नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत.(सरकार स्थापन होऊ न एक महिनाही पूर्ण झालेला नाही आणि यांना मागील पाच वर्षांत त्यांनी न केलेल्या कामांची किती बरे घाई झाली आहे ! ) असो. विरोधी पक्षाने फक्त विरोध करावा, मग तो कोणतेही कारण काढून ही मानसिकता बरी नव्हे. सरकार हिवाळी अधिवेशनातल्या कामकाजावर जनतेच्या करातील लाखो रूपये खर्च करणार आहे, पण विरोधी पक्षाला त्याची फिकीर नाही, असेच दिसते.                                                                                      काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या सभागृहात हा मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया आहे. या राहुल यांच्या वाक्यामुळे संसदेत गदारोळ उठला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना माफी मागण्यास सांगितले. यावर राहुल गांधी यांनी, आम्ही माफी मागायला राहुल सावरकर नाही,असे उत्तर दिल्यामुळे वीर सावरकरांचा अपमान सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून जे बसलेत त्यांच्या चहापानाला आम्ही जाऊ शकत नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले. शिवसेनेने काँगे्रससोबत महाराष्ट्रात आघाडी केली आहे, त्यामुळे भाजपने सावरकरवादाचे निमित्त करत सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. तसेच या अधिवेशनात राहुल गांधी यांच्या विधानावर भाजप निषेधाचा प्रस्ताव मांडणार असल्याचे दिसत आहेे. आजपासून सुरु होत असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री ठाकरे नागपूरात दाखल झाले आहेत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण हा संपूर्ण महाराष्ट्र एक आहे. महाराष्ट्राला देशाला अभिमान वाटेल असे सरकार, शासन आम्ही चालवू. जर आपण एकत्र आलो तर हे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे पन्नास वर्षे कायम राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.माझा आजवरचा अनुभव पणाला लावून माझ्या गोरगरीब जनतेला समाधान देण्याचा मी प्रयत्न करेन. मुख्यमंत्री म्हणून आता माझी कारकीर्द खर्‍या अर्थाने सुरु होत आहे. त्यामुळे जनतेचे आशिर्वाद कायम राहू द्यात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर राज्यातील शेतकरी,कर्जमाफी,अतिवृष्टीबाधितांना मदत, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, शेतकर्‍यांना हमीभाव, बेरोजगारी, उद्योगधंद्यातील मंदी असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, जे गतवेळच्या फडणवीस सरकारने सोडवले नाहीत. आता याच प्रश्नांसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपची मंडळी विद्यमान सरकारला विरोध करणार आहेत, हे अजबच आहे.

Friday, 6 December 2019

अंधश्रद्धा निर्मूलक व विज्ञाननिष्ठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर





अंधश्रद्धा निर्मूलक व विज्ञाननिष्ठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अशोक सुतार ८६००३१६७९८
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा अखंड कार्यक्रम राबवला. त्यांच्या महापरीनिर्वाणानंतरही समाज जागृतीची ज्योत अखंड तेवत आहे, जगाला प्रकाश देत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची कौटुंबिक परिस्थिती प्रतिकूल होती; तरीही त्यांनी या परिस्थितीतून मोठ्या कष्टाने आपले उच्चशिक्षण पूर्ण केले. एवढेच नव्हे तर, माझा समाज अंधश्रद्धा, पूजापाठ यांत गुरफटून जाईल आणि समाजाची प्रगती होणार नाही, हे जाणवल्यामुळे बाबासाहेबांनी समाजातील चुकीच्या रूढी-परंपरा यांतून वंचित, मागासवर्गीयांची मुक्तता करण्याचा निश्चय केला. याच दृष्टीने त्यांनी विविध आंदोलने सुरु केली. तत्कालीन धर्मसत्तेने, ब्राह्मणांनी पसरवलेल्या चुकीच्या कल्पनांच्या कचाट्यातून हिंदू मनाची मुक्तता झाली पाहिजे, या मुक्तीशिवाय देशाचा विकास होणार नाही व देशाला भवितव्यही राहणार नाही, ही असा विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक ग्रंथ लिहिले. समाजासाठी झटणारा एकमेव अंधश्रद्धा निर्मूलक, द्रष्टा म्हणून डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा जगासमोर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राचीन साहित्याचा सखोल अभ्यास केला. त्यातून त्यांना समाजाच्या दु:खमुक्तीचे रहस्य व त्यावरील उपाय काय योजावेत याची कल्पना आली. सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील वंचित घटकांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना जाणवले की, बहुतांशी वंचित समाज हा गरीब व प्रतिकूल परिस्थितीत जगत आहे. वंचित समाजाच्या प्रतिकूल परिस्थितीमागे अंधश्रद्धा,रूढी-परंपरा व तत्कालीन हिंदू धर्माने त्यांच्यावर लादलेली जाचक धार्मिक बंधने कारणीभूत आहेत, असे बाबासाहेबांना जाणवले.                                  ब्राह्मणशाहीतील वाड्मयाचा अभ्यास करताना त्यांनी देशातील वस्तुस्थितीचा व कारणांचा शोध घेतला. बाबासाहेबांच्या मते, ब्राह्मणी वाड्मय सहा प्रकारचे आहेत. मनुस्मृती, गीता, शंकराचार्यांचा वेदांत, महाभारत, रामायण आणि पुराण असे ते प्रकार होत. वाड्मय हा आरसा असून त्यात तत्कालीन लोकजीवनाचे प्रतिबिंब दिसते. भारतात वैदिक संस्कृती येण्यापूर्वी समृद्ध असा बौद्ध धर्म अस्तित्वात होता. भगवान तथागत गौतम बुद्ध यांनी बौद्ध धम्माची स्थापना केली. परंतु काही धर्मवादी ब्राह्मणांनी बौद्ध धम्माला खाली खेचण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यादृष्टीने इसवी सन पूर्व 200 मध्ये सुमती भार्गव या मनू ब्राह्मणाने मनुस्मृती लिहिली. ही मनुस्मृति म्हणजे समाजातील लोकांनी धर्म आचरण कसे करावे, ब्राह्मण- वैश्य- क्षत्रिय व शूद्रांनी कसा व्यवहार करावा, याची आचारसंहिता होय. ही आचारसंहिता राबवताना मनूने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना वेगवेगळा कायदा लागू केला तसेच या चार वर्णातील लोकांनी कसे जगावे, त्यांचे व्यवहार काय, हेही लिहून ठेवले आहे. त्यामुळे शूद्र व अतिशुद्रांना मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक त्रास सहन करावा लागला. मनुस्मृतीचे हे वैशिष्ट्य की, मनुस्मृती हा ग्रंथ जातीभेदावर आधारित आहे. दुसरी बाब म्हणजे, यात अंधश्रद्धा, काल्पनिक चमत्कार, रूढी-परंपरा कशा पाळाव्यात व त्या पाळल्या नाहीत तर त्यांना काय शिक्षा द्यावी, हेही या ग्रंथात नमूद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृति ग्रंथांचा अभ्यास केला. यानंतर त्यांना असे दिसून आले की, अज्ञानी लोकांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन काही लोक स्वतःला उच्चवर्णीय संबोधून एकाधिकारशाहीची अबाधित सत्ता प्रस्थापित करत आहेत.                                  सुमारे इ.स. पूर्व २०० दरम्यान तत्कालीन जातीवादी ब्राह्मणांनी बौद्ध धम्माविरुद्ध बंड केले. ब्राह्मणांना उपदेश करणारा मनू याने कायदे लिहिले व ब्राह्मणशाही कशी राबवायची आणि ब्राह्मणांचे राज्य कसे प्रस्थापित करायचे यासाठी प्रतिक्रांतीची घोषणा केली. ब्राह्मणशाही सत्तेवर येताच जातनिर्मिती करण्यात आली. त्यानंतर समाजातील अज्ञानी व देवाला न मानणाऱ्या लोकांना शुद्र ठरवण्यात आले. या शूद्रांना सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही असे कायद्यात लिहीत तत्कालीन धर्मसत्तेने शूद्र व स्त्रियांना हीन दर्जा दिला. त्या पद्धतीचे सामाजिक कायदे करण्यात आले. बौद्ध धम्माने समताधिष्ठित लोकशाही निर्माण केली होती, त्या लोकशाहीचा विध्वंस करून ब्राह्मणी एकाधिकारशाही रूढ करण्यात आली. यामुळे अर्थातच शुद्र अतिशुद्र स्त्रिया यांना समतेने जगण्याचा हक्क नाकारला गेला. याचा परिणाम भारतातील सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक परिस्थितीवर हजारो वर्षे दिसून आला. सुमती भार्गव याने लिहिलेला मनुस्मृती ग्रंथ हा दैवी आहे, असा प्रचार व प्रसार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती या ग्रंथात अनेक कायद्यांची नोंद असल्याचे म्हटले आहे. ज्यांनी धार्मिक विधी केले नाहीत व हलक्या कुळात जन्माला आले आहेत, ज्यांचा अनैतिक संबंधातून जन्म झाला आहे, ज्याने संन्यास घेतला आहे, ज्याने आत्महत्या केली आहे, त्यांच्या आत्म्यास अर्ध्य देऊ नये, असा कायदा मनूने ५ / ८९ या कलमात लिहिला आहे. वेदाच्या विरोधात बोलणाऱ्यांची भेट झाली तरी त्याचे आदरातिथ्य करू नये, असेही मनूने लिहिले आहे. ब्राह्मणाचा जन्म ब्रह्माच्या मुखातून झाला असल्यामुळे त्यालाच वेदांचा अधिकार आहे, जगात जे काही अस्तित्वात आहे ती सर्व ब्राह्मणांची संपत्ती असते, ब्राह्मणाचे सामर्थ्य हे राज्याच्या सामर्थ्यापेक्षा जास्त असते म्हणून ब्राह्मणच त्याच्या स्वतःच्या अधिकारात शिक्षा करू शकतो, असेही अकलेचे तारे मनुस्मृति ग्रंथात मनूने तोडले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व साहित्याचा अभ्यास करण्याचे कारण म्हणजे समाज साहित्यावर आधारित जीवन जगत असतो. वाड्मयाचे प्रतिबिंब समाजात पडलेले असते. आज समाजात अंधश्रद्धा, रूढी, दैववाद फोफावला तो मनूने लिहिलेल्या मनुस्मृती ग्रंथामुळे. म्हणून डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृतीची जाहीरपणे होळी केली होती. बाबासाहेबांनी नाकारलेल्या मनुस्मृतीचे कायदे पाळून आज आपण अंधश्रद्धेला उत्तेजन देत आहोत का, पुन्हा धर्मसत्तेचा पाया मजबूत करत आहोत का, याचा समाजाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.                                          वैदिक काळाचा व धर्मसत्तेचा प्रभाव सुमारे २००० वर्षे भारतावर आणि शेजारील देशांवर होता. आजही मनूने लिहिलेले कायदे विझले असले तरी राखेत कुठेतरी ठिणगी आहेच. आपण जर तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेबांच्या शुद्ध, नीतिमार्गाने गेलो नाही तर पुन्हा अंधाराच्या खाईत कायमचे गाडले जाऊ. म्हणून गरज आहे, सर्व काही समजावून घेण्याची. भारतातील मागासवर्गीय समाज अंधश्रद्धा, रूढी-परंपरा यांच्या आहारी गेला होता. सर्वत्र जातीभेदाचे स्तोम माजले होते. छत्रपती शिवरायांच्या नंतरचा हा काळ होता. अशा परिस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील ढोंगी परंपरा- रूढी यांच्यावर जोरदार टीका केली तसेच वंचित समाजातील घटकांना क्रियाशील बनवले. शूद्रांनाही शिक्षणाचा हक्क व अधिकार आहे असे फुले यांचे मत होते. महात्मा फुले यांनी वज्रसूची या ग्रंथाचा अभ्यास केला होता. त्यामुळे समताधिष्ठित समाजाची निर्मिती होण्याच्या दृष्टीने फुले व सावित्रीबाई फुले यांनी १८४८ साली पुणे येथील भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा काढली. यानंतर तत्कालीन सनातनी ब्राह्मणांनी फुले दाम्पत्यावर बहिष्कार टाकला. फुले दाम्पत्याने वंचित व मागासवर्गीयांसाठी मोठे कार्य केले. यानंतर दि. १४ एप्रिल १८९१ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीतून उच्च शिक्षण घेतले. ते परदेशात अभ्यासासाठी गेले. त्यांनी भारतातील सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना जाणवले की, उच्चवर्णीय समाज वंचित समाजाला आपल्या अधिकारात वागवत आहे. उच्चवर्णीय समाजाने यासाठी हिंदू धर्म, त्यांतील रूढी-परंपरा, चमत्कार तसेच विविध अंधश्रद्धांचा आधार घेतला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चय केला की, मी वंचित समाजातील अंधश्रद्धा, रूढी-परंपरा नष्ट करेन व समाजाला यातून मुक्तता देईन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर ते भारतात आले. त्यावेळी बडोदानरेश सयाजीराव गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत केली होती. बाबासाहेब भारतात परत आल्यानंतर सयाजीराव गायकवाड यांच्याकडे ते थांबले. त्यावेळी त्यांना प्रखर जातीयतेचा अनुभव आला. आपण उच्चशिक्षित असूनही लोक आपल्याला जातीवरून नीच समजतात, ही बाब बाबासाहेबांना अपमानास्पद वाटली. माझा समाज खालच्या दर्जाचा समजला जातो व समाजाला अंधश्रद्धा, रूढी, परंपरांनी घेरलेले आहे, याची जाणीव त्यांना झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यानंतर सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसमोर एक ध्येय होते ते म्हणजे, वंचित समाजाला त्यांचे हक्क व अधिकार समजावून सांगणे तसेच समाजातील इतर वंचित घटकांना समता निर्माण करून देणे.                                                                 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात सत्याग्रह केला. तो सत्याग्रह काळाराम मंदिराच्या प्रवेशाबाबत होता. तत्कालीन समाजाने अर्थात धर्मसत्तेने शूद्रांना मंदिरात प्रवेश करण्याचे नाकारले होते. काळाराम मंदिर सत्याग्रहात अनेक वंचित समाजातील लोकांनी भाग घेतला व मंदिर प्रवेश केला. ही घटना आज जरी साधी वाटत असली तरी यातून वंचित समाजाचा आत्मविश्वास वाढीस लागला. यानंतर बाबासाहेबांनी वंचित लोकांना भेटण्याचे व बैठका घेऊन लोकांना हिंदू धर्मातील रूढी व परंपरा तसेच अंधश्रद्धेबद्दल जागृत करण्याचे कार्य सुरू केले. वंचित व मागासलेल्या जातींना एकत्र करून त्यांचे संघटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला दिलेला सर्वोत्तम धम्म बौद्ध धम्म यांचा अभ्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. अर्थात भारतातील जुन्या व पाखंडी धर्मसत्तेला आव्हान देण्यासाठी बाबासाहेब सज्ज झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धर्म व देवाच्या नावाने धार्मिक स्तोम माजवणे, वंचित व मागासवर्गीयांना खालचा दर्जा देणे, त्यांच्यावर धर्माच्या नावाने अत्याचार करणे मंजूर नव्हते. बाबासाहेबांनी वंचित समाजातील घटकांना समाजातील अंधश्रद्धा, काल्पनिक चमत्कार, अस्तित्वहीन ईश्वराचे स्तोम यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले, त्यासाठी बाबासाहेबांनी विविध सक्षम पुरावे दिले, वंचित व मागासवर्गीय समाजाची प्रगती न होण्याचे कारण म्हणजे समाजातील अज्ञान, अडाणीपणा, धार्मिक गुलामगिरी व गुलामगिरीची वृत्ती होय. तसेच याला धार्मिक एकाधिकारशाहीची समाजव्यवस्था कारणीभूत आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाला समजावून सांगितले.                                                                डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यास करत वंचित व मागासवर्गीय बांधवांना २२ प्रतिज्ञा समजावून सांगितल्या. या २२ प्रतिज्ञा म्हणजे हिंदू धर्माच्या पाखंडीपणावर ओढलेले कोरडे होय. या २२ प्रतिज्ञा म्हणजे बौद्ध धम्माची जगण्याची आचारसहिता आहे. या प्रतिज्ञा मानवाला उच्च ध्येयाकडे वाटचाल करण्यास शिकवतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले की, कोणत्याही काल्पनिक देवाची पूजा करू नये, अंधश्रद्धा व रूढी परंपरा यांना शरण जाऊ नये, मद्य पिऊ नये, असत्य बोलू नये, कल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवू नये, विज्ञाननिष्ठ गोष्टी स्वीकाराव्यात अशी अनेक वचने बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञामध्ये नमूद केली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला २२ प्रतिज्ञा देण्याचे कारण म्हणजे वंचित व मागासवर्गीय समाजाने धर्मसत्तेच्या आहारी जाऊ नये व आपले अस्तित्व राखावे, गुलामगिरी करू नये, स्वतःचा विकास करावा, यांसाठीच त्या लिहिल्या आहेत, खरेतर समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या २२ प्रतिज्ञांचे विचार व आचार जपणे महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांनी कधीही अंधश्रद्धा, काल्पनिक देव-देवता, रूढी, परंपरा, धार्मिक गुलामगिरीला थारा दिला नाही. जगातील सर्व मानव जात समान असून सर्वांना आपले हक्क व अधिकार समान आहेत, हा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिला. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म चळवळीमुळे हिंदू धर्मातील काही सनातनी व पाखंडी लोक त्यांच्याविरुद्ध प्रचार करू लागले. बाबासाहेबांनी याची पर्वा कधीच केली नाही. त्यांनी आपले आयुष्य समाजातील अज्ञानीपणा घालवण्यासाठी व समाजाला विकासशील बनवण्यासाठी वेचले. आज वंचित व मागासवर्गीय समाजातील लोक बौद्ध धम्माकडे वळले आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजवलेली अंधश्रद्धाविरोधी विचारांची ती मशाल तेवत ठेवणे महत्त्वाचे आहे. आज बौद्ध समाजातही विविध बाबा- बुवा यांचे प्रस्थ माजले आहे. काही लोक धार्मिक गोष्टींच्या आहारी जात आहेत, त्यासाठी जास्त पैसे खर्च करत आहेत. परंतु विकासासाठी लोक जागृत नाहीत असे दिसते. यात कोणावर टीका करण्याचे प्रयोजन नाही. धर्मसत्तेने वाळीत टाकलेल्या, अस्पृश्य ठरवलेल्या वंचित घटकांना ज्यांनी मानव म्हणून जगायला शिकवले, त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याची शिकवण सर्वानीच विसरता कामा नये. हीच त्यांना मोठी आदरांजली ठरेल.


VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर