ज्येष्ठ पत्रकार अशोक सुतार यांचे परखड लेख. दै. पुण्यनगरी, दै. देशोन्नती. दै. संचार, दै. वार्ताहर,दै. जनशक्ती, दै. प्रभात, सा. मार्मिक, दै. लोकमंथन, दै. महाराष्ट्र सम्राट, दै. सागर, दै. जनमुद्रा, दै. कर्नाळा, दै. महानायक इ.दैनिकांत राजकीय, सामाजिक विषयांवर अनेक लेख प्रसिद्ध.
Tuesday, 8 June 2021
कौटुंबिक हिंसाचार बंद होण्याची गरज
कौटुंबिक हिंसाचार बंद होण्याची गरज
मुंबईजवळील कल्याणच्या मलंगगड परिसरातील द्वारली गावातील एका वयोवृद्ध आजोबांनी त्यांच्या वृद्ध पत्नीला अमानुषपणे लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमुले जनमानसात खळबळ उडाली असली तरी याबाबत अनेक मत- मतांतरे व्यक्त होत आहेत. या परिसरातील हा. भ. प. गजानन चिकणकर बुवा यांनी आपल्या वृद्ध पत्नीला मारहाण केली, परंतु याबाबत कोणीही त्यांच्याविरोधात पुढे येत नाही, हे विशेष ! चिकणकर यांनी दोन लग्न केली असून पहिल्या पत्नीला वयोमानामुळे (८० वय ) घरकाम जमत नाही. त्यामुळे तिला मारहाण केली जाते, असे समजते. तसेच मारहाण झालेल्या आजी आणि कुटुंबीयांनी तक्रार देण्यास नकार दिला,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत सत्यता होती, परंतु हा प्रकार का घडला याचे समर्थन करणारी काही मंडळी आहेत, तशी या प्रकाराला विरोध करणारीही काही मंडळी आहेत. या घटनेचे मूळ समाजातील पुरुषी मानसिकतेत शोधावे लागेल. कारण चिकनकर यांनी दोन लग्न केली आहेत, पहिल्या पत्नीला मूल नाही म्हणून दुसरे लग्न केले आहे. तसेच पहिल्या पत्नीला मूल नसल्याने तिला या कुटुंबात कमी लेखले जाते. पहिली पत्नी ही वार्धक्यात आणि पूर्वीही घरातील प्रमुख पुरुषाच्या मेहरबानीने रहात आहे, असेच आता म्हणावे लागेल. अशा असहाय्य स्त्रिया समाजात अनेक आहेत. यामागे कुटुंब व्यवस्थेतील पुरुषी वर्चस्व कारणीभूत आहे. अजूनही काही कुटुंबात हीच मानसिकता असल्यामुळे असे प्रकार सर्रास गृहीत धरले जातात आणि अनेक जण आपापल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे समर्थन करण्यासाठी पुढे येतात. चिकणकर महाराज कीर्तन वगैरे सांगतात, त्यामुळे या लोकांना समाजातील नियम, संहिता माहित नसणे असे म्हणणे धाडसाचे होईल. तसेच ते वारकरी संप्रदायातील आहेत, म्हणून त्यांच्यावर कोणी टीका करू नये, असे म्हणणेही बाळबोध बुद्धीचे लक्षण होय. असो. एक घरगुती हिंसाचाराची घटना म्हणून याकडे पाहिले तर चिकणकर महाराजांना पोलीस समज देणार असल्याचे समजते. परंतु अशा घटना काही कमी होत नसल्याचे दिसते. घरगुती हिंसाचाराचे प्रमाण टाळेबंदीदरम्यान वाढले आहे, असा अहवाल आहे. टाळेबंदीत कुटुंबांची होणारी आर्थिक ओढाताण, त्यात खाणारी तोंडे जास्त अशा उद्विग्नतेतून या घटना घडताना दिसत आहेत. म्हणून या घटनेचे समर्थन होईल, असे नव्हे. ही घटना निंदनीय तर आहेच आणि समाजासमोर चुकीच्या गोष्टींचे प्रतिनिधित्व करणारी आहे. म्हणूनच या घटनेबद्दल दोषी व्यक्तीला शासन होणे आवश्यक आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात दर तीन महिलांमागे एका महिलेला शारिरीक किंवा लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. काही दिवसांपूर्वी कल्याण येथील चिकणकर बुवांनी आपल्या वयोवृद्ध पत्नीला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओत सत्यता होती. परंतु व्हिडीओतील या घटनेत चिकणकर बुवांना पत्नीला मारहाण करताना कोणी रोखल्याचे दिसत नाही. घरातील महिला सदस्य आपापले काम निमूटपणे करताना दिसत आहेत. जणू काही आजूबाजूला काहीच घडत नसल्यासारखे कुटुंबातील सदस्य वागत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, या घरात घडणारी मारहाणीची घटना यापूर्वीही अनेकवेळा घडली आहे. त्यामुळे घरातील सदस्यांना याबाबत पूर्वकल्पना आहे, असेच दिसते. पत्नीला मारहाण करणाऱ्या चिकणकरांना पोलिसांनी पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चिकणकर हे पंचक्रोशीत कीर्तनकार म्हणून ओळखले जातात. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून ते गायब होते.कल्याणच्या हिल लाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. के. खंदारे म्हणतात, पोलीस चिकणकर यांच्या घरी गेले असता त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. कोणाची काहीही तक्रार नाही. चिकणकर यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल.
भारतात घरगुती हिंसाचाराच्या नाईक घटना दररोज घडत असतात, परंतु याबाबत कोणी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही, असे दिसते. घरगुती हिंसाचाराच्या घटनेत पोलीस स्थानिक पातळीवर अनेकवेळा समज देऊन सोडून देतात. परंतु यातूनच त्रास देणाऱ्या व्यक्तीचे मनोबल वाढीस लागते. भारतीय कुटुंबात अनेक महिला घरातील पुरुषांच्या कमाईवर जगतात, हे वास्तव आहे. त्यामुळे अत्याचार, मारहाण, त्रास झाला तरी त्या विरोध करत नाहीत, असेच दिसून येते. महिलांनी सबळ व्हावे, असे अनेकवेळा म्हटले जाते. शासकीय पातळीवर महिला दिनी यशस्वी महिलांच्या कथा सांगितल्या जातात. परंतु कुटुंबातील स्त्रियांच्या प्रश्नाकडे कोणी गांभीर्याने पाहत नाहीत. अजूनही देशात काही ठिकाणी मनुस्मृतीतील कायदे पाळले जातात. स्त्रियांना हीन मानणे, भोगवस्तू म्हणून त्यांचा विचार करणे, त्या पुरुषाच्या अवलंबावर कशा राहतील हे पाहणे हे समाजातील अनेक कुटुंबात होत असते. म्हणून हेच सुरु राहणे योग्य नाही. स्त्रियांवरील अत्याचार, त्रास कमी करण्यासाठी त्यांना शिक्षण देणे, स्वबळावर उभे करणे महत्वाचे आहे. तरच त्यांना स्वबळाची जाणीव होईल. या जाणिवेतून नवे भेदभावरहित जग उभे राहील. पुरुषांनीही स्त्रियांना बरोबरीने वागविले पाहिजे. महिला घरगुती हिंसाचाराबद्दल तक्रार न देण्याची काही कारणे आहेत. त्याचाच पुरुष गैरफायदा घेतात, असे दिसून येते. बऱ्याच वेळेस महिलांना घरातून पाठिंबा मिळत नाही, त्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. पोलिसांकडे मदत मागितली तर ती मिळेलच असे नाही. शेजारील कोणी असे वाद सोडविण्यासाठी आले तर अनेकवेळा सांगितले जाते की, हा आमचा घरातील, वैयक्तिक प्रश्न आहे. खरे तर असे म्हणणे म्हणजे कौटुंबिक अत्याचाराला पाठींबा देण्यासारखे आहे. बराचश्या घरगुती हिंसाचाराच्या घटनांत त्रास देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जात नाही, हेही या घटना वाढण्यास कारणीभूत असण्याची शक्यता आहे. कल्याण येथील चिकणकर बुवांनी पत्नीला केलेली मारहाण चव्हाट्यावर आली, म्हणून या घटनेची चर्चा होत आहे. परंतु अनेक ठिकाणी अशा घटना राजरोस घडतात, हे दुर्दैव आहे.
स्त्रियांना घरात दुय्यम स्थान असल्याने त्या कुटुंब प्रमुखाविरोधात बोलत नाहीत. नवऱ्याच्या गैरवर्तनाबाबत आजुबाजुला चर्चा झाली तर हिंसाचार अधिक वाढतो, परिणामी स्त्रियांना त्रास होतो, असे दिसते. तसेच अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने घराबाहेर काढले तर कुठे जाणार, हाही प्रश्न निर्माण होतो. केंद्र सरकारच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या माहितीनुसार, २०१९ मध्ये महिलांविरोधातील अत्याचाराच्या ४ लाखांपेक्षा जास्त घटना नोंदवण्यात आल्यात. २०१८ च्या तूलनेत यात ७. ३ टक्क्यांनी वाढ झाली. नवरा किंवा कुटुंबियांकडून मारहाण झाल्याच्या घटना ३०. ९ टक्के नोंदवण्यात आल्या होत्या. चिकणकर बुवांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जनमानसात कौटुंबिक हिंसाचाराची चर्चा सुरु झाली असली तरी असे प्रकार बंद करण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येकाची आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
व्याघ्रसंरक्षण काळाची गरज देशातील वाघांच्या मृत्यूंची वाढती संख्या चिंताजनक आहे. देशभरात २०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या काल...
-
Ashok Sutar www.hasyanand.blogspot.com नोटाबंदी आणि बेरोजगारी केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीनंतर गेल्या दोन वर्षांत सु...
