भाजपसमोर
कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे आव्हान
२०१४ साली मोदी लाट आली, त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला. पश्चिम महाराष्ट्रात
गेल्या साडेचार वर्षांत बऱ्याच ठिकाणी कमळ फुलल्याचे दिसले. सांगली जिल्हा परिषदेत
भाजपने कॉंग्रेस व राष्ट्रवादीला चीत करत मुसंडी मारली. सांगली जि. प. मध्ये कमळ
फुलल्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने पराभवाचे आत्मपरीक्षण केले असेलच. नाही
असे नाही. परंतु कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सुंदोपसुंदीमुळे कमळाला पश्चिम महाराष्ट्रात
शिरकाव करणे सोपे झाले, हे मात्र खरे. त्यावर दोन्हीकडील नेत्यांनी सुबुद्धपणे
विचार करण्याची खास गरज आहे. आत्तापर्यंत असा विचार झाला नसेल, तर तसा विचार पुढील
भवितव्यासाठी व्हायला हरकत नाही. अलीकडच्या काळात दोन्ही काँग्रेसमध्ये एकत्र लढण्याएवढी राजकीय ऊर्जा आली असल्याने भाजपला पश्चिम महाराष्ट्रात कमळ फुलवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. नुकत्याच कराडजवळील मलकापूर नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे
काका- बाबा गट एकत्र झाले, त्याचा परिणाम म्हणजे कॉंग्रेसने एकहाती सत्ता प्राप्त
केली. परंतु मलकापूरमध्ये हे दोन गट एकत्र आले नसते तर भाजपने बऱ्याच जागा
पटकावल्या असत्या, हे निश्चित. कराड नगरपालिकेत यापूर्वी राष्ट्रवादी-
कॉंग्रेसच्या वाढलेल्या दरीमुळे भाजपने सत्ता प्राप्त केली होती. जिथे जिथे
कॉंग्रेस व राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी सुरु आहे, तिथे भाजपने चांगलाच शिरकाव केला
आहे. हे राजकारण आहे; जो ते चांगले जाणेल त्यालाच विजय मिळेल. राजकारणात
वेळप्रसंगी काय करावे, आपल्या वर्तनात कसा बदल करायचा आणि आपले इप्सित कसे साध्य
करायचे याची जाणीव नसेल तर राजकारणात फक्त एकमेकांची उणीधुणी काढायला कोणी येण्याची
गरज नाही. राजकारण अशा लोकांचा प्रांतच नव्हे. गेल्या चार वर्षांतील राज्यातील
भाजपचा घटलेला जनाधार ओळखून लोकसभा, विधानसभेच्या मतदारसंघात भक्कम बांधणी करण्यासाठी अनेक भाजप नेत्यांनी
निवडणुकीच्या रणनीतीची तयारी सुरु केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, सहकार मंत्री सुभाष देशमुख, भाजपचे प्रदेश
सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी कंबर कसली आहे. ना. चंद्रकांतदादांकडे भाजप नेतृत्वाने पश्चिम महाराष्ट्रातील जबाबदारी सोपवली आहे. पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचे वर्चस्व
असलेला भाग म्हणून ओळखला जातो. साखर कारखानदारीने ऊस
उत्पादक शेतकऱ्यांचे जीवन सुखी झाले
त्याचप्रमाणे साखरसम्राट लोकप्रतिनिधींच्या जीवनातही सुख आले. सहकार चळवळीचा पुरेपूर वापर करत अनेकांनी
राजकारणात मक्तेदारी बनवली. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते प्रामुख्याने आहेत. पण २०१४ च्या मोदी लाटेत ही मक्तेदारी बऱ्याच अंशी संपुष्टात आली. काहीजण चक्क
भाजपलाच जाऊन मिळाले. मोदी लाटेत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या भल्याभल्या नेत्यांना पराभूत व्हावे लागले. विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र दिसून आले. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आल्याने नंतर दोन्ही काँग्रेसमधील अनेकांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. यामुळेच भाजपला पश्चिम महाराष्ट्रात व राज्यातील नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकीत दणदणीत यश मिळाले. काँग्रेसच्या या पट्ट्यात भाजपने शिवसेनेलाही मागे टाकले. भाजपने पश्चिम महाराष्ट्रात पावले टाकण्यास सुरुवात केली
आहे, परंतु या
निवडणुकीच्या पूर्वी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्र सज्ज झाली आहे. भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या
१० आणि विधानसभेच्या ५६ मतदारसंघावर लक्ष
केंद्रित केले आहे. भाजपचे पुणे, सांगली व सोलापूर येथे खासदार आहेत. भाजपची शिवसेनेशी युती झाली तर त्यांच्या
कोल्हापूर, सातारा, शिरूर व मावळ हे चार मतदारसंघ वगळता पुणे, सांगली, सोलापूर येथे काँग्रेसशी मुकाबला करावा लागणार आहे. त्यादृष्टीने भाजपने
बांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेशी युती झाली नाहीं तर अन्य सात मतदारसंघांतही सज्जता ठेवली
आहे. कार्यकर्त्यांना वेगवेगळे कार्यक्रम देऊन
त्यांना निवडणूक होईपर्यंत गुंतवून ठेवले आहे. यावेळची निवडणूक पक्षीय संघटनात्मक बांधणी याच्या जोरावर
भाजप जिंकेल, असा भाजप नेत्यांचा होरा आहे. महाराष्ट्रात भाजप वाढविण्यासाठी
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मेहनत घेतली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा पट्ट्यात
त्यांनी जनसंपर्क मोठा ठेवला आहे. त्यांच्याकडे सहकार खाते असताना सहकारातील राष्ट्रवादी व काँग्रेसची मक्तेदारी
मोडीत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काही सहकारी बँकांचे उदाहरण डोळ्यांसमोर आहे. चार लोकसभा आणि २६ विधानसभा मतदारसंघ नजरेसमोर ठेवून भाजपने आपल्या राजकीय चाली सुरु ठेवल्या आहेत. सांगलीत काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा
लाभ उठवून संजयकाका पाटील यांना पुन्हा संसदेत पाठवण्यासाठी त्यांनी तयारी चालवली आहे. सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्याशी संपर्क वाढला आहे. कराड विधानसभेच्या दोन आणि सातारा शहर अशा तीन मतदारसंघात प्रस्थापितांना शह देण्याची रणनीती भाजपने ठरवली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात अतुल भोसले, बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात मनोज घोरपडे आणि साताराम्य़ात शिवेंद्रराजे भोसले यांच्याविरोधात
दीपक पवार यांना भाजपतर्फे ताकद दिली जात आहे. माण- खटाव मध्ये कॉंग्रेसच्या जयप्रकाश गोरे यांच्या विरोधात माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, शेखर गोरे तर कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे यांच्या विरोधात महेश
शिंदे अशा लढती करण्याचे मनसुबे
ना. चंद्रकात दादा पाटील यांनी आतापासूनच रचले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात मिशन लोटस यशस्वी होण्यासाठी भाजपमध्ये येणाऱ्या व असलेल्या उमेदवारांना भाजप नेतृत्वातर्फे मदत केली जात आहे. कोल्हापुरातील दोन आणि
सांगलीतील चार विधानसभा मतदारसंघात यशाची
पुनरावृत्ती व्हावी, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. सद्यस्थितीत भाजपएवढी संघटनात्मक बांधणी अन्य पक्षांकडे नाही. भाजपमध्ये दुसऱ्या पक्षांतून येणाऱ्या
उमेदवारांची कुमक निवडणुकीसाठी
लाभदायक ठरण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आघाडी करून निवडणुकीत उतरणार असल्याने त्यांचे आव्हान भाजपला सोपे राहणार नाही. मोदी लाटेत सत्ता गमावल्यामुळे आलेली मरगळ झटकत कॉंग्रेस व राष्ट्रवादी पुन्हा
एकदा सज्ज झाले आहेत. परंतु दोन्ही काँग्रेसमध्ये संघटनात्मक बांधणीचा अभाव दिसतो, तो सुधारणे गरजेचे आहे. कर्नाटक आणि पाच राज्यातील कॉंग्रेसच्या यशाने उभय काँग्रेसमध्ये विरोधकांना आव्हान देण्याची ऊर्जा मिळाली आहे. त्यात मोदींची लोकप्रियता पूर्वीसारखी राहिली नाही. भाजपचे विकासाचे चित्र प्रत्यक्षात अस्तित्वात आलेले नाही. त्यामुळे भाजपला कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे असलेले आव्हान कडवे असेल,
हे निश्चित.
अशोक सुतार


