कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचे मोठे
प्रस्थ आहे. पुजाऱ्यांच्या
भुमिकेमुळे आतापर्यंत बरेच वाद झाले आहेत. केरळमधील शबरीमला
मंदिराच्या गाभाऱ्यात स्त्रियांना
जाण्यास बंदी या विषयावरूनही बरेच रणकंदन झाले आहे. शबरीमला
येथे भाजप व आर. आर. एस. च्या कार्यकर्त्यांनी सामाजिक शांततेचा भंग केला. काहींनी
बाँम्बफेकही केली. पुजाऱ्यांच्या
भुमिकेबद्दल अनेकवेळा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. छत्रपती
शाहु महाराजांच्या काळातही अंबाबाई मंदिरात शुद्र जातीतील (तत्कालिन
धर्माच्या ठेकेदारांनी ठरवलेल्या शुद्र जाती) लोकांना मंदीर प्रवेश
नाकारला होता, ही बाब राजर्षी शाहु महाराजांना माहित नव्हती.
त्यावेळी केशव ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या
‘प्रबोधन’ पाक्षिकमध्ये ‘अंबाबाईचा नायटा’ असे शीर्षक असलेला परखड अग्रलेख लिहिला
होता. त्यात करवीरनगरीचे पालक छत्रपती शाहू महाराजांना जबाबदार
धरून प्रबोधनकारांनी जोरदार टीका केली होती. परंतु शाहू महाराजांनी
याची दखल घेउन तत्कालिन शुद्रांना अंबाबाई मंदिर दर्शनासाठी खुले केले होते.
आज या घटनेला सुमारे ९० वर्षे होऊन गेली असतील, परंतु मंदिराच्या
पुजाऱ्यांच्या वर्तनात काहीही फरक दिसत नाही. कोल्हापूरमधील
अंबाबाई मंदिरात सोवळं न नेसल्याने एक वर्षापूर्वी सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर
व त्यांच्या सहकार्यांना मंदिराच्या गाभार्यात प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली होती. श्रमिक
मुक्ती दलाचे नेते भारत पाटणकर, त्यांच्या पत्नी गेल ऑम्वेट यांनी
सोवळे नेसण्यास नकार दिल्याने कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांच्यासह
कार्यकर्त्यांना गाभाऱ्यात जाण्यापासून
रोखले होते. असे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडतात. सध्या शबरीमला मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशाला
मनाई केल्यामुळे वातावरण तापले आहे. तेथील धर्मवाद्यांनी वातावरण
बिघडवून ठेवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्त्रियांना मंदिरात
प्रवेश देण्याचा आदेश देऊनही धर्मवादी
त्याला विरोध करतात. यामुळे न्यायव्यवस्था मोठी की संकुचित धर्मव्यवस्था
मोठी हा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. काही जणांनी शबरीमला मंदिर परिसरात बाँबस्फोट केल्याची बातमी
नुकतीच घडली आहे. असे वातावरण बरे नव्हे. शबरीमला मंदिरात स्त्रियांना प्रवेश द्यावा, असे सर्वोच्च
न्यायालय आदेश देते. परंतु सप्टेबरपासून धर्मवाद्यांनी स्त्रियांना
प्रवेश करण्यापासून रोखले आहे. यावर देशातील हिंदू लोकांनी स्पष्ट
विचार मांडणे गरजेचे आहे. न्यायव्यवस्थेला महत्व द्यायचे की जुनाट
बुरसटलेल्या व्यवस्थेला महत्व द्यायचे हे ठरले पाहिजे. कोल्हापुरची
अंबाबाई देवी महाराष्ट्रातील अनेकजणांची आद्य माता, कुलस्वामिनी
आहे. वाडवडिलांपासून अनेक जण तिचे दर्शन घेत आहेत. शिर्डी, पंढरपूर येथे देवाचे दर्शन घेण्यापासून रोखले
जात नाही. पण कोल्हापूरच्या अंबामाता मंदिरात जाण्यापासून पुजारी
रोखत आहेत. सोवळ्याचा नियम कोणी सांगितला, धर्म लिहिणारी माणसे कोण होती, सोवळे नेसले की माणूस
शुद्ध होतो अन्यथा तो अशुद्ध, ही व्याख्या कोणी ठरवली ? महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही मंदिरात सोवळ्याचा
नियम नाही. अंबाबाई ही बहुजनांची माता आहे, तिला सोवळ्याने दर्शन घ्यायचे की नाही, हे बहुजन ठरवतील.
आम्हाला देवीजवळ जाण्यासाठी कोणतेही दलाल नकोत, त्यामुळे पंढरपूरातील बडवे हटवले त्याप्रमाणे शासनाने पूजारी हटाओचा कायदा
करण्याची गरज आहे. पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, सोवळे नसल्यास देवीचे दर्शन गाभाऱ्यात घेता येणार नाही. हा अधिकार पुजाऱ्यांना धर्माने
दिला आहे, असे पुजारी म्हणत आहेत. खरेच हिंदू धर्माने एवढे अधिकार पुजाऱ्यांना दिले
आहेत का, याचेही परीक्षण करणे गरजेचे आहे. धर्मातील तत्वे आचरण करण्यास कुणाचाही नकार असण्याचे कारण नाही. परंतु ही तत्वे आता कालबाहय होत असतानाही ती पाळावीत काय, असा एक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच अंबाबाईची
पुजा अर्चा व स्नान, वेशभुषा आदी करण्यासाठी पुरुष पुजारी आहेत,
हे मंदीर समितीला कसे चालते ?
हिंदूंनाच
मंदिरात दर्शन घेण्याचा अधिकार
नसेल, तर पुजाऱ्यांचा विशेष
धर्म देवळांचा आहे की मानवतेचा, असेही अनेक प्रश्न उपस्थित
होतात. प्रबोधकार ठाकरे यांनी मंदिरे आणि त्यातील पुजारी यांच्याबाबत
परखड असे पुस्तक लिहिले आहे, ते म्हणजे ‘ देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळे’ हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचले
पाहिजे, असे वाटते. आजच्या पिढीने हे पुस्तक,
सुमारे ८० वर्षांपूर्वी लिहिले आहे, ते अवश्य वाचावे. या पुस्तकात हिंदू धर्मातील पाखंडी व्यवस्था व धर्माच्या ठेकेदारांनी हिंदू
धर्म कोणत्या थराला नेला आहे, याचे समग्र दर्शन दिसते.
कोणतीहि कल्पना प्रथमतः कितीहि चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आलेली
असली, तरी काळ हा असला इलमी जादूगार आहे की आपल्या धांवत्या गतीबरोबर
त्या हेतूचे रंग आरपार बदलून, त्या कल्पनेला सुद्धां उलटी पालटी
करून टाकतो. काळ हा अखंड प्रगतशील आहे. निसर्गाकडे पाहिलें तरी तोच प्रकार. निसर्ग धर्मानुसार,
कालगतीबरोबरच सर्व काही बदलत आहे. बदल हाच निसर्गाचा
स्वयंभू गुणधर्म आहे. काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगामुळें झपाझप
मागें पडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना, ती जर दगड धोंड्याप्रमाणें
अचेतन अवस्थेंत असेल तर, प्रगमनशील डोळ्यांना ती विचित्र आणि
निरुपयोगी दिसल्यास त्यांत काहींच चुकीचे नाही. ज्या गोष्टी वा
विचार कधीही बदलत नाहीत,त्या नंतर काळाच्या ओघात गंजून जातात,
लय पावतात. उत्क्रांतीच्या प्रवाहात मानवाने काळाच्या
आणि निसर्गाच्या बदलत्या थाटाबरोबर आपल्या आचार विचारांचा थाट जर शिस्तवार बदलला नाहीं,
तर कालगतीच्या चक्रांत त्यांच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्याशिवाय रहाणार
नाहीत.
पूर्वीच्या
काळीं मोठ्या पुण्यप्रद वाटणाऱ्या गोष्टी आज जर पापाच्या खाणी बनलेल्या असतील, तर केवळ
जुनें म्हणून सोनें एवढ्याच सबबीवर त्या पापाच्या खाणींचे देव्हारे माजविणें,
म्हणजे जाणून बुजून काळाची कुचाळी करण्यासारखें आहे. प्रबोधनकारांनी ‘धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म’ या पुस्तकात लिहिले
आहे, “भटेत्तरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडांत देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ति ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदुधर्माची ही अगदी अलिकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय
या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचें जे आलय - वसतिस्थान - ते देवालय. आमचें तत्त्वज्ञान
पहावें तों देव चराचर व्यापुनि’ आणखी वर दशांगुळें उरला’.
अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतीच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरांत येऊन
राहण्याची जरूरच काय पडली होती! बौद्ध धर्म हिंदुस्थानांतून परागंदा
होईपर्यंत (म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत) तरी भारतीय इतिहासांत देवळांचा कोठेंच कांहीं सुगावा लागत नाहीं. मग तोंपर्यंत आमचे हे हिंदु देव थंडीवार्यांत कुडकुडत
आणि उन्हातान्हांत धडपडत पडले तरी कोठें होते? विद्वान संशोधकांच्या
मतें, आर्यांच्या ऋग्वेदकाळाची गणना जास्तींत जास्त इसवी सनापूर्वी
७००० वर्षे धरलीं, तर इतकीं वर्षे हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठें ? आजचा त्यांचा देवळांतला थाट पाहिला,
तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत पण या देवांना सकाळची
न्याहरी, दुपारी पंचपक्वानांचे भरगच्च ताट, पुन्हा तीन प्रहरी टिफीन आणि रात्री जेवण! याशिवाय दिवस
सुना जायचा नाहीं. याशिवाय
काकडआरत्या, माकड आरत्या, धूपार्त्या,
शेजार्त्या, आहेतच. कोट्यवधि
गोरगरीब हिंदूंना, विशेषतः धर्मश्रद्धाळु हतभागी अस्पृश्यांना
थंडीच्या भयंकर कडाक्यांत गोणपाटाचें ठिगळहि मिळण्याची पंचाईत; पण आमच्या देवांना छपरीपलंग, मच्छरदाणी, गाद्यागिरद्यांशिवाय भागायचेंच नाहीं. खुशालचेंडू श्रीमंताप्रमाणे
असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणार्या देवांची स्थिति देवळें निर्माण
होण्यापूर्वी कशी असावी, याची प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून तर
भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी
तत्कालीन महारवाडे, मांगवाडे, धेडवाडे व भंगीवाडे
निर्माण करून ठेवले असावेत काय ? सारांश, प्रत्येकाने आपापली एक ठराविक धंद्याची जातच
बनविली; आणि बहुजन समाजांतले पुष्कळ हुषार लोक देवळाच्या या बैठ्या
परंतु किफायतशीर धंद्यात घुसले.” प्रबोधनकारांनी वर्णन केलेली
ही परिस्थिती आजही तशीच असल्याची प्रचिती वेळोवेळी येत आहे. धर्म
हा माणसांसाठी असतो, तो विशिष्ट घटकांसाठी नाही. धर्माचा उदय झाल्यानंतर मानवाने देवळांची निर्मिती केली असून जर देवळांमध्ये
मानवता नसेल तर देवळांचे कार्य नक्की कुणासाठी सुरु आहे, असा
प्रश्न निर्माण होतो. भारतात अनेक मंदिरांमध्ये अब्जावधी पैसा,
सोनेनाणे जमा होते. परंतु त्याचा वापर गोरगरीब,
अनाथ, अपंग, वंचित लोकांच्या
कल्याणासाठी अथवा सामाजिक कामांसाठी का होत नाही, याचा विचार
नव्या पिढीने करण्याची खास गरज आहे. शबरीमला वाद असो की शनि शिंगणापूर
किंवा कोल्हापूरमधील मंदिरातील वाद असो, समाज आज बदलत आहे.
स्त्री, शूद्र सारे एकाच पातळीवर आले आहेत.
धर्म आणि देवळांमधील व्यवहारांचा तिढा ज्या दिवशी मिटेल, तो दिवस हिंदू धर्माच्या प्रगतीसाठी पहिले पाउल असेल, असे वाटते.
अशोक सुतार
8600316798

No comments:
Post a Comment