Wednesday, 12 June 2019

मेघमल्हाराची धून


मेघमल्हाराची धून
By
Ashoksutar@gmail.com -


June 12, 2019 | 9:05 am






उन्हाळा संपला आहे आणि वसुंधरेला प्रतीक्षा आहे ती पावसाची. पाऊस मनामनातला, स्वप्नांतला आणि इच्छा आकांक्षेचाही. मृग नक्षत्र येते ते मुळी पावसाचा हात हातात घेऊन. पाऊस शेतकरी, कवीमनाला भावतो. पावसाचे गाव नवनिर्मितीत दंग असते. बिया मातीत रुजतात, काही झाडांवर तर काही खडकांवरसुद्धा. बियांचे रुजणे पावसाच्या आगमनाने सुरू होते.
पृथ्वीच्या गर्भाशयात बाळ श्‍वास घ्यायला सुरुवात करते. सृष्टीत जल्लोष सुरू होतो. झाडांनाही नवकांती येते. पाने हसतात, फुले गंध स्त्रवतात. तो सृष्टीचा सोहळा पाहून अशा आनंदी वातावरणात वसुंधरेला आस लागली आहे घननिळाची, त्याच्या भेटीची. जणू कृष्णसखा राधेला भेटायला आतूर आहे, असे भाव त्या आनंदघनाच्या मुखावर आहेत. सृष्टीत कुठून येतो अलगद शीतल वारा अन्‌ पिंगा घालतो वसुंधरेभोवती आणि म्हणतो, भेटावया सखा तुज येत आहे.

वसुंधरेच्या गालावर लालिमा पसरला आहे. लज्जा हा स्त्रीस्वभाव असावा. लाजवंती नेहमी सुंदर दिसते, पाहणाऱ्याला सुख देऊन जाते. तो सुखसोहळा अनुभवण्यासाठी पावसाचे गाणे ऐकावे, पावसात भिजावे, सृष्टीचे डोळे घ्यावे, जणू सृष्टीच होऊनी जावे. नदीच्या काठावर राहून नदीचे पात्र जोखता येणार नाही, तसे सिमेंटच्या बंगल्यात राहून पावसाची मज्जा अनुभवता येणार नाही. पावसाने अनेकांना वेड लावले आहे. कवींना पाऊस हवा असतो. पाऊस प्रतिभेचा स्रोत असावा, प्रतिभा म्हणजे सर्जनशील भावना, विचार आणि कल्पनामय अनुभूतींचे अतूट नाते असावे.
कवीमनातून कल्पनेचे ढग दाटून येतात, ते शब्दरूप होऊन भावविश्‍व प्रकट करतात. सर्जनशीलता म्हणतात ती हीच असावी. कवी बा. भ. बोरकर ओल्या चिंब पावसाच्या भेटीत आपली तगमग उघड करतात आणि म्हणतात, उन्हात पान, मनात गान, ओलावून थरथरते गं, नाते अपुले न्हाते गं, होऊनी ऋतुरस गाते गं. हीच ती काव्याची उत्कट प्रतिभा होय. भावनांचा पाऊस कोसळतो अंबरातून आणि ओल्याचिंब मनातून सृष्टीचे हुंकार ऐकू येतात. सृष्टीचा हुंकार म्हणजे कवितांचे गाणेच जणू. ओल्याचिंब पावसात पक्षी आनंदाने नाचत, बागडत भावविश्‍वात रममाण होतात. त्यांना कुठे जायचे, काय करायचे याचे बंधन नाही. फक्‍त आत्मानंद आणि आत्मानंद. त्यातून जगण्याचा शोध, जगण्यातील सौंदर्याचा आविष्कार, त्या आकाशापलीकडे असलेल्या निसर्गस्रोताशी एकतानता हीच अनुभूती मनास येते.
देह चिंब भिजलेला, मन स्वैर आकाशात, मीच माझा नुरलो या विश्‍वात. मीच झालो कृष्ण सखा आणि मीच राधा. जेव्हा भावनेत, त्यागात, भक्‍तीत, प्रेमात विश्‍व हरवून जाण्याएवढी एकरूपता असेल तर होते असे. तेवढी तीव्रता हवी मनात आणि पावसातही. सृष्टीतील मरगळ जाऊन नवी चेतना निर्माण होते. पावसाचे गीत सुरू झाले असून मयुराचे नर्तन सुरू आहे. जीवसृष्टी मातीच्या सुवासाने आनंदली आहे. पाने पावसात चिंब भिजण्याची मजा घेत आहेत. आभाळाला आस लागली आहे वसुंधराभेटीची. वसुंधरा प्रेमवर्षावात न्हाऊन निघत आहे. आता बिया अंकुरतील, त्यांची झाडे होतील, झाडांना पालवी फुटेल आणि झाडे वसुंधरा मातेभोवती फेर धरून नाचतील, गाणी म्हणतील. ही झाडांची, पाखरांची किलबिल ऐकण्यासाठी सारे उत्सुक आहेत.
पाऊस म्हणजे मनातले गाणे, पाऊस म्हणजे सृष्टीचा उल्हास. पाऊस असतो कधी रौद्र रूपात तर कधी महापूर घेऊन. पाऊस कोसळतो विजेसारखा झोपड्यांवर. कधी कधी डोळ्यात येतो पाऊस. पावसाची अशी अनेक रूपे आहेत, काही भली तर काही वाईट. तरीही पाऊस येण्याचा थांबत नाही. छपरा-छपरांवरून टापा टाकत पावसाचा अश्‍व दिमाखात पुढे चालला आहे. कुणीतरी आकाशातून मेघमल्हार गात आहे. मेघमल्हाराची धून आसमंतात गुंजत आहे. पाऊस सुरू आहे मनामनांत, तुमच्या आमच्या हृदयात.


मुद्दा विलीनीकरणाचा


              मुद्दा विलीनीकरणाचा
सत्ताधाऱ्यांनी धार्मिक उन्माद वाढविल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच केला आहे. या अनुषंगाने खरेच धार्मिक उन्माद देशात वाढला आहे काय, असा प्रश्न चर्चेत आला आहे.शरद पवार राष्ट्रवादीच्या एका मेळाव्यात म्हणाले की, लोकांच्या महत्वाच्या  प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी धार्मिक उन्माद वाढविण्याचे काम लोकसभा निवडणुकीत केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागला हे प्रथम डोक्यातून काढून टाका. आपल्याला विधानसभा निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरे जायचे आहे. आपला पक्ष आणि आपला उमेदवार जनमानसात कसा रुजेल याची खबरदारी घेण्याचे काम निष्ठेने करा, असा सल्लाहि यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांनी निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात घेतली होती. त्यावेळी पवार यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. पवार यांनी असाही आरोप केला आहे कि, महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत ही मंडळी धार्मिक उन्माद करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धार्मिक उन्माद आवरायचा असेल तर धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या लोकांनी आपापसातील मतभेद गाडून एकत्र आले पाहिजे. समाजात उन्माद कसा वाढेल असा प्रयत्न पंतप्रधानांनी प्रचारात केला होता. त्यामुळे प्रचाराची दिशा बदलण्याचे काम त्यांनी केले. पवारांनी पाच वर्षांत मोदी सरकारवर अनेक आरोप केले असतील. ते दोघे अनेकवेळा भेटलेही आहेत. लोकसभा निवडणूक २०१९ चा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी शरद पवार आणि कॉंग्रेस स्वतंत्रपणे प्रचार करत होते. पुरोगामी पक्षांनी एकत्र येण्यासाठी पवार जर खरोखरच झटले असते तर आज कॉंग्रेस व राष्ट्रवादीची वाताहात झाली नसती. असो. आजही पवारांचा स्वतंत्र बाणा दिसून येतो. तो दिसणे राजकारणासाठी वाईट नसले तरी विरोधी पक्षांच्या भवितव्यासाठी तो बाणा वाईटच आहे, असे दिसते. देशात भाजपने पुन्हा सत्ता प्राप्त केली आहे. राष्ट्रीय कॉंग्रेस अवघ्या ५२ जागांवर आहे तर राष्ट्रवादीचे संख्याबळ ४ आहे. गतवेळी कॉंग्रेसच्या जागा ४४ असल्यामुळे संसदेच्या सभागृहात सक्षम विरोधी पक्ष दिसला नाही. परंतु याचा स्थितीजन्य लाभ उठवत मोदी सरकारने अनेक विध्येयके मंजूर करून घेतली होती. विरोधी पक्ष सक्षम नसेल तर सत्ताधारी पक्षात एकाधिकारशाही निर्माण होते. आत्ताही थोडीफार अशीच राजकीय परिस्थिती आहे. संसदेत विरोधी पक्षाचे अस्तित्व निर्माण करायचे असल्यास कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजेत, असा एक मतप्रवाह विरोधी पक्षांतून येत आहे. शरद पवार यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची नुकतीच दिल्लीत भेट घेतली आहे. परंतु कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला शरद पवार यांनीच उत्सुकता दाखवली आहे. पवार यांच्या राजकारणामुळे आज कॉंग्रेस हताशपणे हा लोकशाहीतील देखावा पहात आहे. पवार मात्र आपले काही कर्तव्य नसल्याच्या थाटात आहेत. असो. मुद्दा धार्मिक उन्मादाचा आहे. देशात खरेच धार्मिक उन्माद वाढल्याचे दिसत आहे काय, हा प्रश्न व्यक्त करत पवार यांनी राजकारण पुन्हा एकदा धार्मिक ध्रूवीकरणाकडे नेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. धार्मिक मुद्दे भाजपला सोयीचे पाडले आहेत. आज जे देशात सर्वत्र भाजपचे चित्र दिसत आहे, तो धार्मिक राजकारणाचा परिणाम आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पवार यांनी भाजपवर आरोप करून पुन्हा एकदा हा विषय चव्हाट्यावर आणला आहे, ज्याचा पवार व विरोधकांना काहीएक फायदा होणार नाही.                                                                   देशात बेरोजगारी हा महत्त्वाचा प्रश्न होता. गेली पाच वर्षांत किंवा किमान दोन वर्षांत पवारांनी हा मुद्दा उठवला पाहिजे होता. आज देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. गेल्या ४५ वर्षांत जेवढी बेकारी वाढली नव्हती तेवढी बेकारी आज वाढली आहे. शेती व शेतीव्यवसायातील अपयश असेल किंवा शेतकरी आत्महत्या असतील. त्याविरोधातील सरकारबद्दलचा रोष मतदानातून व्यक्त होईल, अशी अपेक्षा होती. परंतु मोदी यांनी लोकांच्या भावनेला हात घातला,असे दिसून आले. शरद पवार म्हणतात की, जनता लोकसभेला वेगळा विचार करत असते आणि विधानसभेला वेगळा विचार करत असते. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीत लोक वेगळा विचार करतील आणि या सरकारला खाली खेचतील, असा विश्वास पवारांचे पुतणे अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्‍ट्रवादीने ११४, तर काँग्रेसने १७४ जागा लढविल्‍या होत्‍या. आता लोकसभा निवडणुकीत राष्‍ट्रवादीचे पाच, तर काँग्रेसचा केवळ एकच जागेवर  खासदार निवडून आला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेला राष्‍ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्‍या पाहिजेत, अशी भूमिका या बैठकीत व्यक्‍त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवार, तारिक अन्वर, पी.ए. संगमा यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी स्थापन केला. परंतु या २० वर्षांत शरद पवारांचे नेतृत्व असूनही राष्ट्रवादीने राष्ट्रीय पक्षाच्या प्रतिमेकडे झेप घेतली नाही. पवार यांनी सोनिया गांधींसारख्या परदेशी व्यक्तीच्या हातात कॉंग्रेसचे नेतृत्व नको, त्या पंतप्रधान व्हायला नकोत म्हणून कॉंग्रेस सोडली. परंतु आता तो अस्मितेचा मुद्दा कॉंग्रेसमध्ये राहिलेला नाही. कॉंग्रेस हा स्वातंत्र्यानंतरचा जास्त काळ सत्तेवर असलेला राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे पवार यांनी इत्तर मतभेद बाजुला सारून राष्ट्रवादी पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याची मागणी सर्व थरांतून व्यक्त होत आहे. पवार यांनी असे काही होणार नाही असे म्हटले असले तरी ते यावर बारकाईने विचार करतील व देशात विरोधी पक्ष अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करतील असे वाटते. अन्यथा राष्ट्रवादीचे भवितव्य धूसर असल्याचे दिसते. 
                                 अशोक सुतार
                      ८६००३१६७९८  

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर