शिक्षण हक्क कायद्याचा विस्तार करून पूर्व प्राथमिकपासूनच तो अमलात आणण्याचा
विचार होत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील एक हजारावर शाळा बंद करण्याचे आदेश
सरकारलाच काढावे लागत आहेत. सरकार त्यासाठी 'समायोजित'
असा गोंडस शब्द वापरत असले तरी प्रत्यक्षात हा 'शाळाबंदी' चाच प्रकार आहे. शिक्षण हक्क पहिलीपासून नव्हे तर पूर्व प्राथमिकपासून लागू करण्याचा केंद्र
सरकारचा विचार सुरू असल्यावरून शिवसेनेने भाजपवर नेम साधला आहे. शिक्षण म्हणजे प्रयोगशाळा असल्याचा समज झाला असून विद्यार्थी
हे प्रयोगासाठी ठेवलेले प्राणी आहेत, असे
भयंकर चित्र आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यानिमित्ताने शिक्षणाचे खासगीकरण हा विषय चव्हाट्यावर आला आहे. सरकारचे
शैक्षणिक धोरण काय आहे ते नक्की समजत नाही. विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिकपासून
शिक्षणाचा हक्क द्यायचा म्हणायचे आणि दुसरीकडे
शिक्षण ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रासाठी खुले करायचे, हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. शिक्षण हा जर ‘हक्क’
म्हणून सरकारने मान्य केला आहे तर तो हक्क देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला
मिळालाच पाहिजे, कारण घटनेने तो हक्क दिला आहे. परंतु सार्वजनिक सोई देणे केंद्र
सरकारला अवघड जात आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत खासगीकरण आणल्याशिवाय केंद्र
सरकारला बरे वाटत नाही. त्याचे पुढे काय दुष्परिणाम होतील, याचा सरकारपुढे विचार
दिसत नाही. देशातील नागरिक कर भरतो, त्याबदल्यात त्याला सार्वजनिक शिक्षण, आरोग्य,
जगण्याची हमी, सार्वजनिक रेशन सुविधा दिली जाते. ही सुविधा कमी मोबदल्यात
सरकारकडून दिली जाते. मात्र सरकार शेअर बाजाराच्या उसळीवर चालत असल्याने प्रत्येक
सार्वजनिक सुविधेचे खासगीकरण करण्याचा डाव केंद्र सरकार सर्वसामान्यांशी खेळत आहे.
नोटबंदी व जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे केंद्र सरकारची आर्थिक
स्थिती खालावली आहे, त्यामुळे सरकारला सार्वजनिक सुविधा न परवडणारया असल्याने
शिक्षणाचे खासगीकरण, कॉर्पोरेटीकरण असे ‘प्रयोग’ पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री जेटली यांनी सुरु केले
आहेत. यामुळे ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांनीच
शिक्षण अथवा अन्य सोयी घ्यायच्या,
अशी कार्पोरेट पद्धत आल्यास नवल नाही.
आपल्या देशात शिक्षण म्हणजे ‘विकत घेईल , तोच लाभ घेईल ’ असे नवे सूत्र बनत आहे. हा प्रकार घटनाविरोधी असून शैक्षणीक
हक्कांच्या लढाईसाठी सर्वांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. सरकार
बदलले की धोरणांमध्ये थोडाफार बदल होणे समजण्यासारखे आहे, पण नवे सरकार आले की ‘आम्ही
करेल तेच खरे, बाकीच्यांनी काहीच केले नाही’ अशीच पद्धत मोदी सरकारची दिसत आहे. शिक्षणमंत्र्यांची
वेगवेगळी मते असतात. कुणी आठवीपर्यंत परीक्षाच न घेण्याचे धोरण
राबवितो तर कुणी त्याला चुकीचे ठरवून
तो निर्णय रद्द करतो. मध्येच अकरावीच्या परीक्षा पद्धतीत बदल केले जातात.
नववी-दहावीच्या तोंडी परीक्षाही बंद करण्यात आल्या आहेत. म्हणजे आधी आठवीपर्यंत
मुलांची परीक्षेची सवयच मोडून टाकायची आणि दुसरीकडे दहावीमध्ये थेट शंभर गुणांच्या
परीक्षेला तोंड द्यायला लावायचे तर अकरावीत त्यांच्याकडून राष्ट्रीय पातळीवरील
स्पर्धेत टिकण्याची अपेक्षा करायची. राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत महाराष्ट्रातील
मुले टिकलीच पाहिजेत, पण त्यासाठी शैक्षणिक धोरणातील तऱ्हेवाईकपणा
सोडायला हवा. कधी विद्यार्थ्याला
दप्तराचे भले मोठे ओझे दिले जाते. कुणी म्हणतो इ –शिक्षण दिले तर विद्यार्थी हुशार
बनतील. गुरुदेव रवींद्र टागोर यांनी मुलांना निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण दिले.
ती सर्व मुले हुशार होती. परंतु शिक्षणासारख्या मुलभूत हक्कांना डावलत सरकारने
कार्पोरेट शिक्षणाला दिलेली परवानगी भावी पिढीच्या प्रगतीला बाधक आहे.
आता
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र
विधिमंडळाने राज्यातील कॉर्पोरेट क्षेत्राला शाळा काढण्याची परवानगी देणारी सुधारणा
संमत केली. त्यापाठोपाठ शिक्षणाचा हक्क पहिलीपासून नव्हे तर पूर्व प्राथमिकपासूनच
लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. सध्याच्या
कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले
जाते. त्यानुसार पहिली ते आठवी इयत्तेपर्यंत गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के
जागा राखून ठेवणे शाळांसाठी सक्तीचे झाले आहे. आता या संभाव्य बदलानुसार पूर्व
प्राथमिक म्हणजे नर्सरी, ज्युनियर आणि सीनियर केजी शिक्षणासाठीही हा ‘राखीव टक्का’ ठेवणे बंधनकारक असेल. एका
दृष्टिकोनातून ही सुधारणा चांगली असली तरी त्यामागील हेतू कितपत साध्य होईल हा
प्रश्नच आहे. कारण एकीकडे शिक्षण हक्क कायद्याचा विस्तार करून पूर्व
प्राथमिकपासूनच तो अमलात आणण्याचा विचार होत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील एक
हजारावर शाळा बंद करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत. सरकारने ही शाळाबंदी करून काय साध्य केले ? आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे शिक्षणासारख्या पवित्र
क्षेत्रात व्यापारी तत्वांची कॉर्पोरेट मंडळी बसतील.
शहरांप्रमाणेच दुर्गम, डोंगराळ भागातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे असे सरकारचे मत आहे. परंतु ही कार्पोरेट मंडळी व्यापारी तत्वावर
प्रत्येक गोष्ट करत असल्यामुळे नफेखोरी करणार , हे निश्चित. फी वसूल केल्याशिवाय
शाळेत बसू न देणे , असे प्रकार अजूनही अनेक शाळांत सुरु आहेत. कॉर्पोरेट मंडळी दुर्गम भागात शाळा सुरू करून गरिबांना शिक्षणाचे दरवाजे सहज उघडतील असे समजणे भाबडेपणाचे
ठरेल. आज सरकारी शाळांची दुरवस्था
झाली आहे अशी बोंब सरकारने ठोकत, शिक्षण
हक्काचा गाजावाजा करीत कॉर्पोरेट शिक्षण संस्थांना शिक्षणाचे क्षेत्र खासगीकरणासाठी खुले केले आहे. भाजप
सरकारने शिक्षणाचे खासगीकरण करण्याचा डाव आखला आहे, तो मुठभर भांडवलदारांच्या
फायद्यासाठी. राज्य व केंद्र सरकारच्या या राक्षसी प्रवृतीला जनतेने वेळीच विरोध
केला पाहिजे; अन्यथा ‘विकत घ्या आणि जगा’ अशी अवस्था सर्वसामान्यांची होईल. हा
प्रकार जागतिकीकरण प्रक्रियेतील एक भाग आहे. भारताने १९९१ साली ‘जगतिक व्यापार
स्पर्धा करारा’ वर सही केली आहे. त्याची अंमालाबाजावणी मोदी सरकार करू पहात आहे.
शिक्षणाचे व्यापारीकरण, खासगीकरण हा पहिला टप्पा आहे, त्यानंतर गरीबीचे उच्चाटन न
करता थेट गरिबांचे उच्चाटन करणे हा दुसरा टप्पा आहे. सरकारला देशात निखालस
खासगीकरण आणायचे असून भांडवलशाही पुन्हा रुजण्याची मोठी शक्यता वाटते. सरकारने
शिक्षण क्षेत्र कार्पोरेट कंपन्यांच्या गळ्यात घालून स्वत: नामधारी राहायाचे
ठरवलेले दिसते, हे लोकशाही प्रक्रियेला घातक आहे.

