Friday, 6 December 2019

जंगलांतील वणवे रोखण्याची गरज


          जंगलांतील वणवे रोखण्याची गरज

जगातील सर्वात मोठे जंगल म्हणून ओळखले जाणाऱ्या मेझॉनच्या जंगलात सहा महिन्यांपूर्वी  भयंकर वणवा पसरला होता. या वणव्यात विविध महत्वाची वनौषधी जाळून खाक झाली. तेथील जंगलांतील औषधी वनस्पतीपासून जगाला ऱ्याच प्रमाणात पुरेल एवढे औषध बनवले जाते. तसेच सदर वणव्यात हजारो पक्षी, प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती जळून खाक झाले आहेत. त्यामुळे जैवसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे. या जंगलातील वनस्पती अतिशय दुर्मिळ, मानवी जीवनासाठी संजीवनीदायक होत्या. त्यामुळे असे वणवे लागणे भवितव्यात मानवासाठी धोकादायक आहे.                                           अजुनही या जंगलातील काही ठिकाणी वणवा सुरु आहे. विशेष म्हणजे, अॅमेझॉन जंगलात लागलेल्या आगीमुळे जवळच्या पर्वतावरील हिमनग वितळू लागल्याची बातमी येत आहे. यामुळे समुद्राची पाणीपातळी वाढू लागली आहे. पाणीपातळी वाढल्यामुळे समुद्री जीवांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे तसेच बेटांवर राहणाऱ्या लोकवस्तीला पूरसदृश्य स्थितीचा सामना करावा लागणार आहे. मागील सहा महिन्यांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेल्या या अॅमेझॉनच्या जंगलामध्ये दहा हजारहून अधिक जागी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत या आगीमुळे अॅमेझॉन, रोडांनिया आणि साओ पाओलोवर धुराचे ढग जमा झाल्याने भरदिवसा अंधार होत  आहे. या आगीमुळे सर्वाधिक नुकसान ब्राझीलमध्ये झाले असून तेथील २,७०० किमीचे क्षेत्र प्रभावित झाले आहे. जगाचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅमेझॉन जंगलाला लागलेली आग भीषण होती. जगात जंगलातील वनवे पेटण्याचे प्रकार वाढत आहेत. काहीवेळा मुद्दामहून आगी लावल्या जातात तर काही वेळा मानवाच्या निष्काळजीपणामुळे आगी लावल्या जात आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर ‘वन सुरक्षा समिती’ नेमून या समितीचे कार्य जगभर सुरु करावे आणि त्यासाठी काही सेवाभावी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही यंत्रणा गावोगावी कार्यरत ठेवण्याची गरज वाटते. कारण जंगल जगेल तर मानव जातीचे अस्तित्व अबाधित राहील.                                                अॅमेझॉन जंगलाच्या वणव्यामधून निघणारा धूर अंतराळातून दिसत होता, एवढी मोठी आग भीषण होती. जगातील सर्वात संवेदनशील अशा नैसर्गिक प्रदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ब्राझील सरकारवर पर्यावरणवाद्यांनी तसेच युरोपसहीत इतर अनेक देशांनी कठोर शब्दात टीका केली. आपल्याकडेही जंगलांमध्ये झाडांना आगी लागण्याचे प्रकार घडत असतात. परंतु याबद्दल वन विभाग, सरकार गंभीर नसते, असे बऱ्याचवेळा दिसून आले आहे. नैसर्गिक संपदेकडे पाहण्याचा दृष्टीकोन सरकार व नागरिकांनी बदलण्याची गरज आहे. वने ही महत्वाची आहेत. त्यांच्यामुळे आज मानव व सजीव यांचे अस्तित्व आहे. वने कमी होणे, वनांना आगी लागणे यांमुळे सजीवांचे अस्तित्व नष्ट होण्याची शक्यता आहे.   जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानुसार, वायव्येतील या जंगलांमध्ये लागलेल्या आगीमुळे अटलांटिक किनाऱ्यापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या ब्राझीलमधील रिओ दी जनेइरोपर्यंत धूर पसरला होता. अनेक शहरांमध्ये भरदिवसा अंधार दाटून आल्यासारखे वातावरण झाले होते. ब्राझीलबरोबरच पेरु, बोलिविया आणि पेरुग्वे या देशांमध्येही या वणव्याचा धूर पसरला होता. ब्राझिलला लागून असलेले अॅमेझॉन जंगल हे अनेक देशांच्या कार्यकक्षेत येते. त्यामुळे या जंगलाला लागलेल्या वणव्याची झळ अनेक देशांना बसली. अनेक देशांचे यामुळे मोठे नुकसान झाले. म्हणूनच ही घटना गंभीर आहे. ब्राझीलमधील अंतराळ संशोधन संस्था आयएनपीईने अॅमेझॉनच्या जंगलांमध्ये लागणाऱ्या आगींसंदर्भातील माहिती २०१३  पासून गोळा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून मागील सहा वर्षांमध्ये या जगलांमध्ये मोठ्या प्रमाणात आगीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. आयएनपीईच्या आकडेनुसार, ब्राझीलमध्ये वर्षभरात ७२ हजारहून अधिक आगीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक घटना ब्राझीलच्या हद्दीत असणाऱ्या अॅमेझॉनच्या जंगली प्रदेशात घडल्या आहेत. या वर्षी अॅमेझॉनच्या जंगलांमध्ये लागणाऱ्या आगींच्या घटनांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ८३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अॅमेझॉन हे जगातील सर्वात मोठे पर्जन्यवन म्हणजेच नैसर्गिक रेन फॉरेस्ट आहे. या जंगलांमध्ये वर्षातील १२ महिने पाऊस पडतो. ही जंगले इतकी घनदाट आहेत की, येथे अनेक ठिकाणी सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहचत नाहीत. जगभरातील वनस्पतींपासून तयार होणाऱ्या एकूण ऑक्सिनपैकी २० टक्के ऑक्सिजन या जंगलांच्या माध्यमातून निर्माण होतो. पृथ्वीवरील ऑक्सिजनचा नैसर्गिक समतोल कायम ठेवण्यासाठी या जंगलांचा मोलाचा वाटा आहे. मात्र आता या जंगलांच्या अस्तित्वालाच या भीषण वणव्यामुळे धोका निर्माण झाला आहे.       अॅमेझॉन जंगलामधील अनेक पक्षी आणि प्राणी जळून खाक झाल्याचे अनेक हृदद्रावक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, अनेकांनी अॅमेझॉन पर्जन्यवनांच्या संरक्षणाचा मुद्दा मागील अनेक वर्षांपासून पर्यावरणवादी संस्थांनी उपस्थित केला आहे. जंगलाला मुद्दाम लावल्या जाणाऱ्या आगी, बेकायदा वृक्षतोड यासारख्या समस्यांसंदर्भात सरकारी यंत्रणांकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र ब्राझील सरकारने या तक्रारींकडे नेहमीच दुर्लक्ष करत वनतोडीसाठी परवानग्या दिल्या. अशा पद्धतीने बेछूट वृक्षतोड झाल्याने या वनांचा मोठा भाग मागील काही वर्षांमध्ये नष्ट झाला आहे. अनेकदा या वनांच्या सीमेवर राहणाऱ्या गावातील गावकरी वन जमिनीवर शेती करण्यासाठी वनांना आगी लावतात. यासंदर्भातही वन्यप्रेमींनी आक्षेप घेतला होता. मात्र त्याकडेही दूर्लक्ष करण्यात आले. आता अॅमेझॉनच्या वणव्याने भीषण रुप धारण केल्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि ब्राझील सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. केवळ पर्यावरणप्रेमीच नाही तर जगातील अनेक तज्ञांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भारतातही जंगले नष्ट करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून होत असतो. याला आळा घालण्यासाठी कडक कायद्याचे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अन्यथा भवितव्यात जंगले दाखवण्यासाठीही उरणार नाहीत. जंगले, त्यातील वृक्ष ही पृथ्वीची फुप्फुसे आहेत. कारण पृथ्वीवरील ऑक्सीजनची निर्मिती हे वृक्ष करतात. वनांची निर्मिती होण्यास कितीतरी कालावधी लागतो. सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सीजनची निर्मिती वनांमधून होते, त्यामुळे पर्यावरणांचे संतुलन राहते. अशी उपकारक वने नष्ट होत असतील तर जागतिक पर्यावरण संघटनेने याची नोंद करावी व निसर्गाची होणारी हानी रोखण्यास प्रतिबंध करावा. तरच निसर्गाचे संतुलन राखले जाईल.   
                                           अशोक सुतार                                           ८६००३१६७९८७ 

No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर