Wednesday, 27 November 2019

वैश्विक मानव धर्माचे उद्गाते


 वैश्विक मानव धर्माचे उद्गाते

भारतीय स्वातंत्र्याच्या ५० वर्षांपूर्वी हिंदुस्तानात बहुजनांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या महात्मा ज्योतीराव फुले यांनी देशाला सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक विचारांची दिशा दाखवली. शेतकरी, कामगार आणि वंचित समाज हे ज्यांच्या लेखणीचे व चळवळीचे विषय होते, त्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचा आज १२९ वा स्मृतिदिन आहे. पत्नी सावित्रीबाई फुले यांना सोबत घेऊन स्त्रीशिक्षणाचा पाया घातला. ज्या काळी समाजाने स्त्रियांना शिक्षण घेण्यास बंदी केली होती, त्या काळात हे धाडस फुलेंनी केले व त्यासाठी समाजातील कर्मठांचा रोषही पत्करला. ज्योतिराव गोविंदराव फुले हे क्रांतीसुर्य महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाज सुधारक होते. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, जातीवाद, त्यामुळे होणारी बहुजनांची पिळवणूक, सावकारी, स्त्रीला हीन दर्जा यांविरोधात अखेरपर्यंत आवाज उठवून समाजाला निद्रिस्त अवस्थेतून जागृत केले. अशा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांना विनम्र अभिवादन!                                                                      ज्योतीराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. कटगुणमध्ये त्यांचा जन्म दि.११ एप्रिल १८२७ रोजी झाला. ज्योतीरावांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. दुसरे बाजीराव पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि चुलते शनिवारवाड्यात फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे मूळचे गोऱ्हे आडनाव जाऊन ते फुले या आडनावाने ओळखले जाऊ लागले. ज्योतीराव नऊ महिन्यांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. ज्योतीराव करारी व निश्चयी वृत्तीचे होते. ते अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. ज्योतीरावांच्या मनावर संत कबीराच्या विचारांचा मोठा प्रभाव होता.                                                         विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली । नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।। हे प्रसिद्ध विचार महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देताना मांडले आहेत. कमीत कमी शब्दांत मोठे सार यात सांगितले आहे. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामधील बुधवार पेठेत भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. आजही भिडेवाडा तिथे आहे. राज्य शासनाने या स्थळाची जपणूक करणे गरजेचे आहे. समाजाने बहिष्कृत केलेल्या अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. फुले यांनी विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर निवेदन देऊन प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. ज्योतिरावांनी पत्नी् सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई होय. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय मानले जातात.                                                                महात्मा ज्योतीराव फुले यांच्या मनावर जगप्रसिद्ध तत्ववेत्ते थाॅमस पैनी यांच्या राईटस ऑफ मॅनया ग्रंथाचा प्रभाव होता. त्यामुळे मानवी हक्क, सामाजिक न्याय यांबाबत त्यांना माहिती मिळाली आणि सामाजिक विचार दृढ झाली. समाजातील विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल, असे त्यांचे मत होते. त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. विधवाविवाह घडवून आणला. दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. ज्योतीराव फुले यांची धर्म व समाजाबद्दल रोखठोक मते होती. कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही मानवनिर्मित आहे, असे त्यांचे मत होते. परंतु विश्वाची निर्मिती करणारी शक्ती अस्तित्वात आहे, अशी त्यांची अस्तिक्यवादी विचारसरणी होती. त्या शक्तीचे त्यांनी निर्मिकअसे नामाभिधान केले होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील तत्कालीन  शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकात त्यांनी सावकारशाहीबद्दल आणि शेतकऱ्यांच्या पिळवणुकीबाबत मते मांडली आहेत. तसेच शेतकऱ्यांनी कर्ज काढून सण कार्यक्रम करू नये, असे म्हटले आहे. नीति हाच मानवी जीवनाचा आधार आहे, असे त्यांनी विचार मांडले. फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड व इतर ग्रंथांद्वारे समाजाला जागृत करून समाजबदलाची चळवळ सुरु केली. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारे समाजाचे नवनिर्माण करणे व त्यासाठी नीतिमत्तेचे वर्तन व ठाम वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे, असे मत ज्योतीराव फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात मांडले आहे.                                        महात्मा फुले यांना मानवी वर्तन व मानवाचा व्यवहारात बदल घडवून आणायचा होता. त्यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत याबाबतही फुलेंनी विपुल लेखन केले आहे. माणसाला माणूस म्हणून जगू देणारा व मानवतेला प्रतिष्ठा देणारा वैश्विक धर्म महात्मा फुलेंना अपेक्षित होता. अखंड या काव्यप्रकारात त्यांनी मानवधर्म, आत्मपरीक्षण, नीती, समाधान, सहिष्णूता, सदसदविवेक, उद्योग, स्वच्छता, गृहकार्यदक्षता, इ. गोष्टींवर भाष्य केले आहे. संत तुकाराम यांनी मानवी जीवनाला उपदेश करणारे अभंग लिहिले, त्याच हेतूसाठी ज्योतीराव फुलेंनी ‘अखंड’ हे काव्य लिहिले. महात्मा फुले यांनी १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्या लेखन, प्रकाशनचे कार्य केले. छ. शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. अत्याचार व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी आपले आयुष्य सामाजिक न्याय आणि सामाजिक पुनर्रचना यांसाठी अर्पण केले होते.
                                   - अशोक सुतार 
                                    ८६००३१६७९८

No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर