Thursday, 16 April 2020

लॉकडाऊन विरोधाचे राजकारण

ब्लॉगर  / अशोक सुतार 

लॉकडाऊन विरोधाचे राजकारण
अशोक सुतार / 8600316798












देशात लॉकडाऊन सुरु झाला आहे आणि तो आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जातीने कोरोनाबद्दल दक्षता घेत असून जनतेच्या हितासाठी निर्णय घेत आहेत. यात कुणीही राजकारण करणे योग्य नव्हे. परंतु गेल्या पाच दिवसांत लोकांचा संयम सुटत असल्याच्या बातम्या मीडियावर येत असल्याने अनेकांना आयते बळ मिळत आहे. लॉकडाऊन सुरु असताना परप्रांतीय कामगारांना आता त्यांच्या गावी जायचे आहे, असे दिसते. काही दिवसांपूर्वी सुरत येथे काही परप्रांतियांनी आम्हाला आमच्या राज्यात जायचे आहे, आम्हाला गावी पाठवा असे म्हणत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून गोंधळ घातला. परवा मुंबई येथील वांद्रे रेल्वे स्थानकाशेजारी उत्तर भारतीय संघटनेचा अध्यक्ष विनय दुबे याने केलेल्या आवाहनानुसार  हजारो परप्रांतीयांनी एकत्र येत रस्त्यावर गर्दी करून लॉकडाऊनचा विरोध केला आणि आम्हाला आमच्या गावी जायचे असल्याने आम्ही येथे जमलो आहोत, असा सूर कामगारांचा होता. रेल्वे प्रशासनाने कोणत्याही गाड्या सोडणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केल्यामुळे ही गर्दी झाली कशी ? या गर्दीला नेमकी कोणी फूस लावली, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. उत्तर भारतात राहणाऱ्या कामासाठी मुंबईत आलेल्या मजुरांना आपआपल्या राज्यात पाठवण्यासाठी आंदोलन छेडणे, १८ तारखेला एकत्र जमण्याचे आवाहन करणे, आदी त्याच्यावर आरोप असून फेसबुक लाईव्हवर त्याने ही भूमिका मांडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.या सगळ्या प्रकरणानंतर विनय दुबेला अटकही करण्यात आली. त्याला आज पोलिसांनी कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण आणि तबलिगी जमातच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या उत्सवाचे प्रकरण थोडेफार एकसारखे वाटते. पहिल्या प्रकरणात राजकारणाचा वास येत आहे तर दुसऱ्या प्रकरणात धार्मिकतेचा वास येतो. केंद्र सरकार कोरोनाबाबत जी उपाययोजना करत आहे, त्याला प्रतिसाद द्यायचा नाही, समाजात तेढ निर्माण करायची आणि आपल्या फायद्यासाठी समाजाला संकटात आणायचे, ही प्रवृत्ती वेळीच ठेचली तर ठीक आहे. प्रत्येकाचे प्रश्न आहेत, ते सामंजस्याने सोडवण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु त्यासाठी समाजाला संकटात ढकलणे योग्य नव्हे, हा राजद्रोह आहे.                                                                                                                                                                         मुंबई येथील वांद्रे गर्दी प्रकरणी विनय दुबेला अटक करण्यात आली होती. आता कोर्टाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. करोनाचा मुकाबला करण्यासाठी देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. अशात मंगळवारी मुंबईतील वांद्रे स्टेशनच्या बाहेर हजारो मजूर गावी जाण्यासाठी जमले होते. उत्तर भारतीय संघटनेचा अध्यक्ष विनय दुबे याने यासंदर्भातलं आवाहन केल्यानंतर मजुरांनी गर्दी केली होती. मुंबईतील वांद्रे आणि ठाण्यातील मुंब्रा येथे मंगळवारी लॉकडाउनचा विरोध कऱण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. एकीकडे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले जात असताना इतक्या मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाला होता. तो पांगवण्यासाठी पोलिसांना दोन तास लागले. विशेष म्हणजे देशभरातील रेल्वे गाड्या, बसेस ठप्प असताना आणि देशात आरोग्य आणीबाणी, संचारबंदी सुरु असताना  ही गर्दी झाली कशी ? या प्रश्नाचा शोध घेत असताना पोलिसांना उत्तर भारतीय महापंचायतच्या दुबेचा तपास लागला. आज देशात कोरोनाचे जास्त मोठे संकट असेल तर महाराष्ट्रात आहे. असे असताना लॉकडाऊनचे नियम पाळता येत नसतील आणि अराजक निर्माण करण्याच्या गोष्टी करणे म्हणजे सरकारविरोधात आणि समाजाविरोधात द्रोह केल्यासारखे आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी जमातचा कार्यक्रम घेणे, लॉकडाऊन सुरु असतानाही सरकारच्या सूचना ऐकणे, सरकारचे नियम धाब्यावर बसवणे असे प्रकार केल्याप्रकरणी तबलिगीचे प्रमुख मौलाना साद यांच्यासह इतर काही जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीसह संपूर्ण भारतात करोनाचे संकट वाढले ते या कार्यक्रमामुळेच! पोलिसांनी व्हिसाच्या नियमांचे  उल्लंघन करणाऱ्या १९०० जणांना लुकआउट नोटीसही जारीही  केली आहे. सरकार लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देणार की रस्त्यावर उतरणाऱ्या जमावाकडे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. असे लोक एकत्र येतील तर कोरोना हटवण्यासाठी राज्य सरकार जी मेहनत घेत आहे ती वाया जाईल आणि एकदा राज्यातील आरोग्याचे वातावरण बिघडले तर भयानक प्रकार घडू शकतो, हे या गर्दी जमावणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे. कारण देशात महाराष्ट्र राज्यातच कोरोनाचे जास्त रुग्ण सापडत आहेत आणि कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या महाराष्ट्रात आजमितीस १७८ आहे. देशात कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या ३७७ आहे. यावरून समजेल की , महाराष्ट्र किती संकटात आहे !                                              मुंबईतील अनेक झोपडपट्ट्या आणि उपनगरांमध्ये रस्त्यावर मृत्यूचे थैमान सुरु आहे. अशावेळी लॉकडाऊन हा सर्वात योग्य पर्याय आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमीच आशादायी आहेत. त्यांनी कोरोनाचा एकजुटीने सामना करण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. धारावीत रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या होत असल्याने रुग्णसंख्या वाढते आहे. कोरोनाची लढाई आपण जिंकणारच असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या आता २८०१ झाली आहे. कारण या रुग्णांमध्ये ११७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. ११७ मधले १०० रुग्ण मुंबई पुण्यातले आहेत. ११७ पैकी ६६ रुग्ण हे मुंबईतले तर ४४ रुग्ण पुण्यातले आहेत. महाराष्ट्राची काळजी वाढवणारी ही बाब आहे.राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. देशभरातील करोनाग्रस्तांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाचे रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शासकीय यंत्रणा, पोलीस, डॉक्टर, आरोग्य अधिकारी हे सगळेच जण करोनाच्या संकटाशी सामना करत आहेत.देशभरात मेपर्यंत लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. या दरम्यान कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. उत्तर भारतीय मजुरांचे जर लॉकडाऊनमुळे जेवणाचे इतर हाल होत असतील तर जे तथाकथित नेते आहेत, ज्यांनी मजुरांना एकत्र येऊन लॉकडाऊनचे आंदोलन करण्यास भाग पाडले आहे, त्यांनी त्यांची व्यवस्था करण्यासाठी काहीच प्रयत्न का केले नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो. सरकारने मजुरांसाठी दोन वेळचे अन्नवाटप सुरु केले आहे, ती योजना सर्वत्र काटेकोरपणे राबवण्याची गरज आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वावरून राजकारण चालले आहे. यातच उत्तर भारतीय संघटनेला पुढे घालून मुख्यमंत्र्याना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत काय, असे असेल तर राजकारण नीच पातळीवर खेळले जात आहे, असे वाटते.       

No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर