Friday, 13 March 2020

काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना संधी कधी ?


काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना संधी कधी ?

Ashok Sutar / 8600316798 


ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशमधील सत्तानाट्य अद्याप सुरू आहे. सिंधिया भाजपमध्ये गेले आणि भाजपावाल्यानी मध्यप्रदेशात लोटस ऑपरेशन सुरु केले आहे. महाराष्ट्रात साध्य झाले नाही तर मध्यप्रदेशात सत्ता हस्तगत करायचीच या हट्टाने भाजप पेटला आहे. मध्यप्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडत ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याची स्तुतीसुमने ज्योतिरादित्यांनी उधळली. ज्योतिरादित्यांना भाजपमध्ये जाऊन राज्यसभेच्या उमेदवारीचा लाभ झाला आहे. ज्या काँग्रेसने त्यांना अनेक सवलती, सन्मान दिला त्या काँग्रेसवर सिंधिया यांनी टीका केली. असो. त्यांचे मित्र आणि काँग्रेसचे नेते  राहुल गांधी यांनी म्हटले आहे कि, ज्योतिरादित्य यांना मी महाविद्यालयापासून ओळखतो. ते भाजपमध्ये जास्त काळ राहतील, असे नाही. ज्योतिरादित्य यांच्या काँग्रेसच्या राजीनाम्यानिमित्त काँग्रेसने युवा नेत्यांना विचारात घ्यावे, अशी चारचा सुरु आहे. काँग्रेसने आता जुन्या कोंडाळ्यात राहणे योग्य होणार नाही. काँग्रेसमध्ये विरोधकांची आक्रमकता आली पाहिजे, जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतारण्याचीही काँग्रेसची तयारी पाहिजे, असे दिसते. थोडक्यात काँग्रेसने काळानुसार बदलला सामोरे गेले पाहिजे.                                                                                                                                  ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला रामराम, त्यानंतर त्यांच्या समर्थक आमदारांनी दिलेले राजीनामे यामुळे मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार अडचणीत सापडले  आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक आमदार सध्या बंगळुरूत आहेत. त्यांना परत आणण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र हे आमदार भोपाळला परतण्यास तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. सिंधिया समर्थक १९ आमदार सध्या बंगळुरूतल्या एका रिसॉर्टमध्ये आहेत. त्यांना मध्य प्रदेशात आणण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. आज हे आमदार भोपाळला परतण्यासाठी रिसॉर्टहून केम्पेगौडा विमानतळाच्या दिशेनं निघाले होते. मात्र तिथून ते पुन्हा रिसॉर्टवर परतले. या आमदारांना बंगळुरूहून आणण्यासाठी काँग्रेसने पूर्ण तयारी केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र विमानतळाहून आमदार पुन्हा रिसॉर्टला गेल्याने काँग्रेसचे प्रयत्न व्यर्थ गेले.सरकार वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसने आमदारांना परत आणण्यासाठी भोपाळच्या राजा भोज विमानतळावर एका विशेष बसची व्यवस्था केली होती. मात्र हे आमदार बंगळुरूतल्या विमानतळावरूनच पुन्हा रिसॉर्टला परतल्याने ही बसदेखील रिकामी परतली. मध्य प्रदेशात आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा आमदारांनी केला आहे. तशी माहिती त्यांनी मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक यांनाही कळवली आहे.ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी (१० मार्चला) त्यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामे दिले होते. सिंधिया यांचे १९ समर्थक आमदार सध्या बंगळुरूत आहेत. यातले सहा जण कमलनाथ सरकारमध्ये मंत्री आहेत. या सगळ्या आमदारांनी राजीनामे दिले असले तरी यातल्या एकाचाही राजीनामा मंजूर झालेला नाही.                                                                                                        म्हणूनच काँग्रेसने हे विशेष प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. मध्यप्रदेशातील सत्तानाट्याचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसच्या सहकारी पक्षांची मदत घेतली तर मध्यप्रदेशात पुन्हा काँग्रेसचे सरकार येऊ शकते, असा अनेकांचा युक्तिवाद आहे. सध्या मध्यप्रदेशातील कठीण राजकीय स्थिती पाहता पुन्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल, असे वाटत नाही. कारण ज्योतिरादित्य याना मानणारा १९ गट फुटणारा नाही. मध्यप्रदेशातील आमदारांचा कमलनाथ यांना विरोध का आहे, तर ते मनमानी करतात आणि दुसर्या गटाला विचारात घेत नाहीत. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या विधानानंतर हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते युवा नेत्यांना जमेत धरत नाहीत, ही खरी परिस्थिती आहे. कारण राहुल गांधी यांचे मित्र व काँग्रेसमधील युवा नेते राजेश पायलट यांनाही राजस्थानमध्ये सत्ता स्थापन करताना विचारात घेतले नव्हते. यांच्या दबावामुळे पायलट यांची राजस्थानमध्ये उप मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.  निवडणुकीत मेहनत करतात, युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काँग्रेसचा प्रचार करतात, परंतु जुने नेते आपल्याच मस्तीत असून ते इतरांना जास्त किंमत देत नाहीत, हे कारण स्पष्ट झाले आहे. काँग्रेसमध्ये अजूनही नवा नेता उच्च पदावर आलेला नाही. युवा नेत्यांना राष्ट्रीय स्तरावरील कार्यकारिणीत स्थान देऊन त्यांचा योग्य तो आदर राखला पाहिजे. आज काँग्रेसची प्रतिकूल परिस्थिती पाहता काँग्रेसकडे युवा वर्ग आकृष्ट करणारे धडाडीचे नेते हवे आहेत. तरच काँग्रेस आगामी लोकसभेत भाजपशी टक्कर घेऊ शकेल. त्यामुळे काँग्रेसने युवा नेत्यांना संधी दिली पाहिजे. पक्षात युवा नेत्यांनी किती दिवस उमेदवारी करायची आणि ज्येष्ठ नेत्यांची मनमानी का सहन करायची, हे किती दिवस चालणार, याचाही काँग्रेसने विचार केला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भाजपाध्ये युवा नेत्यांना विविध पातळीवर संधी देऊन पक्षात चैतन्य आणले आहे. काँग्रेसमध्ये असे दिसत नाही. एखादा मोर्चाचे किंवा आंदोलन करायचे म्हटले तरी  लोक शोधून आणावे लागतात, एवढी प्रतिकूल परिस्थिती आहे. याचाही काँग्रेसने विचार करण्याची गरज आहे. एकूण काँग्रेसने पूर्वीची काँग्रेस समोर ठेऊन पक्षात सर्वाना स्थान दिले पाहिजे. काँग्रेसची युवा नेत्यांची फळी उभारून त्यातील तगफदार नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवली पाहिजे. ज्येष्ठ नेत्यांनी विनाकारण जागा अडवण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा युवा नेत्यांना सल्ला द्यावा, काँग्रेसमध्ये युवा कार्यकर्त्यांचा वावर वाढला पाहिजे, पक्षात चैतन्य आले पाहिजे, कारण आजचा युवा हा टेक्नोसेव्ही आहे. समाजात घडणाऱ्या घटनांची जाण युवा कार्यकर्त्यांना आहे. त्यावर युवा पिढीत विचारचक्र सुरु झाले पाहिजे, काँग्रेसचा संदेश युवा पिढीमध्ये पोहोचला पाहिजे, भारतीय संविधान म्हणजे काय, लोकशाहीला अनुसरून सत्ताधाऱ्यांचे कामकाज सुरु आहे का, हेही युवा कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. तरच देशात काँग्रेसची चर्चा होईल, युवा पिढी काँग्रेसकडे वळेल.

No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर