Saturday, 4 August 2018

भाजपचे यश: विरोधकांना आत्मचिंतनाची गरज


गेल्या ३५ वर्षांपासून माजी मंत्री सुरेश जैन यांची अबाधित सत्ता असलेल्या जळगाव महापालिकेवर भाजपाने वर्चस्व स्थापन केले आहे.  सुरेश जैन यांचे संस्थान खालसा करण्यात भाजपला यश आले आहे.  महापालिका निवडणुकीत जळगावकरांनी भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. भाजपने ५७ जागांवर विजय मिळवत सत्ता खेचून आणली असून जळगावचा पुढचा महापौर भाजपचाच असणार आहे. जळगावपेक्षाही भाजपाने सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत केलेला पराक्रम चक्रावून टाकणारा आहे. कारण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या काळापासून सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. २०१३च्या निवडणुकीत काँग्रेसला ४१ आणि राष्ट्रवादीला १९ जागा मिळाल्या होत्या. पण, आता भाजपाने ६ जागांवरून ४० जागांवर घेतलेली उसळी विरोधकांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारी आहे. म्हणून सांगलीचा विजय भाजपच्या दृष्टीने महत्वाचा आहे. सुरेश जैन यांची जळगाव महापालिकेत गेल्या ३५ वर्षांपासून सत्ता होती. सुरेश जैन यांच्या या वर्चस्वाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुरुंग लावला असून भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली आहे. जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी एकूण ३०३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. मुख्य लढत शिवसेना आणि भाजपमध्ये होती. सुरेश जैन विरुद्ध गिरीश महाजन असे या निवडणुकीला स्वरूप आले  होते. त्यामुळे जळगावमध्ये कोण बाजी मारणार, याकडे राज्याचे लक्ष लागले होते. मात्र महाजन यांनी जळगाव महापालिकेची सत्ता खेचून आणण्यात यश मिळवले. जळगाव पालिकेतील सर्व ७५ जागांचे निकाल जाहीर झाले असून भाजपने ५७ जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेनेच्या पदरी फक्त १५ जागा पडल्या. सांगली-मिरज-कुपवाड महापालिका स्थापन झाल्यापासून सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली असून, भाजपनं या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. सर्व ७८ निकाल हाती आले असून भाजपने ४१ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ३५ पर्यंतच मजल मारता आली. स्वाभिमानी आघाडीच्या पदरी १ जागा पडली असून १ अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, शिवसेनेची पाटी कोरी राहिली आहे. सांगली महापालिका निवडणुकीच्या ७८ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात उतरले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. सांगलीचा गड राखण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला. तर सत्तास्थापनेचा निर्धार भाजपनं केला होता. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीचे निवडणूक कल बघता भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. त्यानंतर भाजपनं अनपेक्षित मुसंडी मारली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 'मिशन जळगाव' फत्ते करून दाखवले. गेल्या निवडणुकीत भाजपाने १५ जागा जिंकल्या होत्या, त्यात यावेळी ४२ जागांची वाढ झाली. सुरेश जैन यांच्या खानदेश विकास आघाडीला गेल्या निवडणुकीत ३३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला १४ जागांपर्यंतच मजल मारता आली. भाजपाकडून झालेला हा पराभव शिवसेना नेत्यांना चांगलाच जिव्हारी लागणारा आहे.                                                                                                                                                   
 राज्यातील मोर्चे, आंदोलनांनंतरही जनतेचा भाजपावरील विश्वास कायम असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव आणि सांगली महापालिकेतील यशानंतर दिली आहे. सध्या राज्यात सर्वत्र मोर्चे निघत आहेत, आंदोलने होत आहेत. मात्र तरीही जनतेचा भाजपा आणि राज्य सरकारवरील विश्वास कमी झालेला नाही, से मुख्यमंत्री म्हणाले आहेत. सध्या राज्यात सर्वत्र मोर्चे निघत आहेत. शेतकरी रस्त्यावर उतरले असून मराठे पेटून उठले आहेत. आता भाजपाचे राज्यात काही खरे नाही, से  म्हणणाऱ्या अनेकांना जळगाव महानगरपालिका व सांगली महानगरपालिका निवडणुकीतील निकालाने मोठा धक्का दिला आहे.  सांगली-मिरजमध्ये भाजपला 'अच्छे दिन' आले आहेत. काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या – मराठ्यांची जास्त संख्या असलेल्या सांगली-मिरज-कुपवाडमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या यशामुळे भाजपाचे मनोबल उंचावले आहे. सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी कॉंग्रेसने इव्हिएम बद्दल आक्षेप घेतल्याचे समजते. परंतु त्या आरोपांत आता तथ्य राहिलेले नाही. गेल्या साडेतीन-चार वर्षांच्या कार्यकाळात देवेंद्र सरकारपुढे अनेक आव्हाने उभी राहिली. काही वेळा सरकार अडचणीत आले.तर अनेकवेळा मुख्यमंत्र्यांसह काही मंत्र्यांवर आरोप झाले. नाणार प्रकल्प, समृद्धी महामार्गाला विरोध होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न अधिवेशनात केला होता. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही भाजपला लक्ष्य केले. पण असे विरोधी वातावरण असताना अजूनही जनमानसाचा भाजपला पाठींबा मिळत असल्यामुळे विरोधक हतबल झाले आहेत. भाजपने टीमवर्क करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लोकसभेची प्रतिष्ठेची पोटनिवडणूकही जिंकून दाखवली. वारा विरुद्ध दिशेने वाहू लागला की, नौकेची दिशा बदलण्याचे तंत्र भाजपाला अवगत झाले आहे, असे म्हणता येईल. आधी दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून शेतकरी खवळले होते. दुधाचे टँकरच्या टँकर रस्त्यावर रिकामे केले जात होते. दरवाढ मिळेपर्यंत माघार नाही, यावर 'स्वाभिमानी' शेतकरी ठाम होते. त्यामुळे सरकारची शेतकरीविरोधी प्रतिमा निर्माण करण्याची संधीच विरोधकांना मिळाली होती. पण, सरकारने  शेतकऱ्यांना शांत केले. मात्र, त्यानंतर , मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेले  मराठा समाजाचे आंदोलन चिघळले. महाराष्ट्र बंद, मुंबई बंद, रास्ता रोको, दगडफेक, जाळपोळ, तोडफोड, जेल भरो, जलसमाधी हे सगळे प्रकार अजूनही राज्यात सुरू आहे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडताहेत. पण, मुख्यमंत्री कायद्यावर बोट ठेवून आहेत, ते ठाम आहेत. स्वाभाविकच, मराठा समाजाचा रोष फडणवीस सरकारला महागात पडेल, अशी चिन्हे दिसत असताना अनपेक्षितरित्या भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय मिळाला आहे. देवेंद्र सरकारचं अपयश दाखवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकीकडे कंबर कसली आहे आणि भाजपचा सत्तेतील सहभागी पक्ष शिवसेना भाजपावर नेहमीच शरसंधान करत असते. परंतु, या तीनही विरोधकांना धोबीपछाड देऊन भाजपाने दोन्ही महापालिकांमध्ये यश मिळवले, हे स्तुत्य आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जळगावात भोपळाही फोडता आलेला नाही आणि शिवसेना सांगलीत खातेही उघडता आलेले नाही. विरोधकांनी आपले काय चुकत आहे, आपल्या नेतृत्वात कोणत्या त्रुटी आहेत, याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. 
                                                                                                                   - अशोक सुतार 

No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर