भाजपचा ‘मॉब लीन्चिंग’ मुद्दा
स्व.
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजधानी दिल्लीत १९८४
साली दंगल उसळली होती. त्या दंगलीत तीन हजार शिखांची हत्या
करण्यात आली होती. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. लंडन स्कूल ऑफ
इकोनॉमिक्समध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात कॉंग्रेसचे राष्ट्रीय
अध्यक्ष राहुल गांधी यांना
१९८४ सालच्या शीख विरोधी दंगल आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या
विधानासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर
राहुल म्हणाले होते की, मनमोहन सिंग हे आमच्या
सर्वांच्या वतीने बोलले. मी स्वत: हिंसाचाराने पीडित आहे. त्यामुळे त्या वेदना काय
असतात हे मला चांगले ठाऊक आहे. पृथ्वीवर कोणाच्याही विरोधात कुठल्याही प्रकारचा
हिंसाचार करण्याला माझा विरोध आहे. जेव्हा कोणाला वेदना होतात तेव्हा ते पाहून मला
दु:ख होते. त्यामुळे मी शीख विरोधी दंगलीचा निषेध करतो. जे कोणी अशा प्रकारच्या
हिंसाचारात सहभागी आहेत त्यांना शासन झालेच पाहिजे. १९८४ च्या शीख हत्याकांडात
काँग्रेसचा सहभाग नव्हता, असे विधान
नुकतेच काँग्रेस अध्यक्ष राहुल
गांधी यांनी केले होते. राहुल
गांधी यांनी केलेल्या विधानावरून भाजपने काँग्रेसला
कोंडीत पकडत राजकारण सुरु केले आहे.
दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दिल्लीत ठिकठिकाणी ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’ अशा आशयाचे
होर्डिंग्ज लावून नाराजी व्यक्त केली आहे. माजी
पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या दिवशीही बग्गा यांनी राजीव गांधी हे मॉब लिचिंगचे जनक
असल्याचा आरोप केला होता. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात हे वादग्रस्त
विधान केलं होतं. माजी पंतप्रधानांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात
काँग्रेसने दिल्ली पोलिसांत तक्रारदेखील दाखल
केली होती. परंतु, आता दिल्लीच्या चौकाचौकात बग्गा यांनी हे
पोस्टर्स आणि होर्डिग्ज लावल्याने वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
१९८४ मध्ये राजीव गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे दंगली घडल्या. अनेक शीखांना
प्राण गमवावे लागले. राजीव गांधी हे मॉब लिंचिंगचे पितामह आहेत. देशात सगळ्यात मोठे मॉब
लिंचिंग राजीव गांधी यांनी घडवून आणले होते,असा
निष्कर्ष काढण्यापर्यंत भाजपचे दिल्लीतील प्रवक्ते तेजिंदरपाल
सिंह बग्गा यांची मजल गेली आहे. त्यानंतर भाजपा आणि पंजाबमधील अकाली
दलाने या मुद्यावरून काँग्रेसला घेरले आहे. भाजपला यात
फक्त राजकारण करायचे आहे, असे दिसते. सुमारे ३४ वर्षापूर्वी झालेली प्रकरणे उकरून
काढून भाजपला काय साध्य करायचे आहे, हे न समजण्याएवढी जनता दुधखुळी नाही. लोकसभा व
विधानसभा निवडणुका आता एक वर्षावर आल्या आहेत. त्यात सत्त्ताधारी भाजप एकत्रित
निवडणुका घेण्याच्या तयारीत होता. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत
फटकारले असून अशा एकत्रित निवडणुका घेता येणार नसल्याचेही म्हटले आहे. भाजप आता
त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसवर अनेक आरोप करणार आहे. कारण येत्या
निवडणुकीत कॉंग्रेसबद्दल जनमत बिघडावे, अशी भाजपची राजकीय खेळी यामागे दिसत आहे.
विविध समुदायांना कॉंग्रेसविरोधात भडकवून द्यायचे आणि आपली पोळी भाजायची, ही शक्कल
नवी नाही. असो. तर शीख विरोधी दंगलीत हजारो शिखांचे शिरकाण करण्यात आले होते. स्व.
इंदिरा गांधी यांची हत्या त्यांचे अंगरक्षक बियांत सिंग, सतवत सिंग आणि एका
अंगरक्षकाने केली होती. हे सर्व अंगरक्षक शीख समाजातील होते. त्यावेळी स्वतंत्र
खलीस्तानाची चळवळ स्व. इंदिरा गांधीनी हाणून पाडली होती. स्व. इंदिरा गांधी यांनी
‘ब्लु स्टार ऑपरेशन’ सुरु करून अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात खलीस्तानवाद्यांनी जमा
केलेला बॉंबसाठा, हत्यारे ताब्यात घेतल्यामुळे स्व. इंदिरा गांधींची हत्या करण्यात
खलिस्तानवाडी आघाडीवर होते. स्व. इंदिरा गांधी हे भारतातच नव्हे तर परदेशातही
प्रसिध्द व्यक्तिमत्व होते. त्यामुळे जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली,
त्यावेळेस शीख समाजावर सर्वत्र हल्ला झाला होता. लोक संतापले होते. या दंगलीला आज
जवळपास ३४ वर्षे झाली आहेत. स्व. इंदिरा गांधीनी देशविरोधी कारवाया करणाऱ्याना
शासन दिले होते. परंतु, खलिस्तान वेगळे मागणाऱ्यांना तत्कालीन पंतप्रधानांनी
केलेली कारवाई पचनी पडली नव्हती. आज भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते त्या
शीख दंगलीचा संदर्भ देऊन सांगत आहेत की, मॉब लीन्चींगचे जनक राजीव गांधी होते, ही
हास्यास्पद बाब आहे. ते प्रकरण न्यायालयात गेले होते, त्यात काही जणांना शिक्षाही
झाल्या आहेत. असे असताना जुने मध्ये उकरून काढून भाजप काय साध्य करू पाहत आहे ?
दिल्लीत सर्वत्र फलकबाजी करत तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधीना बदनाम करू
पाहणारा भाजप धुतल्या तांदळाचा आव आणत आहे, हे हास्यास्पद आहे. आज
भाजपा केंद्र व राज्यात सत्तेवर आहे. गेल्या चार वर्षांत अल्पसंख्यांकावर हल्ले
होण्याचे प्रमाण वाढले आहे. गो- रक्षणाचा मक्ता कट्टरपंथीयांनी घेतला आहे. गो-
रक्षणाच्या नावावर अल्पसंख्यांक मुस्लीम, हिंदूंमधील खालच्या जातींना त्रास
देण्याचे काम सुरु आहे. याला केंद्र सरकारही अटकाव करू शकत नाही. कट्टरपंथीय
डाव्या विचारवंतांची खुलेआम हत्या करीत आहेत. या हत्यांचा तपास योग्य दिशेने सुरु
होण्यास पाच वर्षे लागतात. अल्पसंख्यांकांना सुनावले जाते कि, आम्ही करणार ते
योग्यच; तुम्हाला ते पटत नसेल तर देश सोडून जा. अशा प्रकारची एकाधिकारशाही देशात
सुरु आहे. आपला तोच खरा धर्म आणि दुसऱ्यांचा धर्म तो धर्म नव्हेच, ही मानसिकता
कट्टरपंथीयांत बळावत आहे. सत्तेतील नेते भारतीय राज्यघटनेविरोधात वक्तव्ये करीत
आहे. दिल्लीत भारतीय संविधानाची होळी काही कट्टरपंथीयांनी केली; त्यावर सरकार मुग
गिळून बसले आहे. याचा अर्थ भाजप व त्यांना मानणारे लोक देशातील राज्यघटना बदलून
एकाधिकारशाहीकडे जाण्याची स्वप्ने पहात आहेत, यासारखे सुर्दैव नाही. स्व. राजीव
गांधीना ‘मॉब लीन्चींगचे जनक’ म्हणणारे देशात नेमके काय करीत आहेत, हे जनतेला
चांगलेच माहित आहे. मॉब लीन्चींगचा आरोप प्रतिस्पर्ध्यावर करून भाजप, आम्ही ते
नव्हेच असा पवित्रा घेत आहे किंवा स्वत:ला खूप पारदर्शक समजत आहेत.

No comments:
Post a Comment