ठन गई! मौत से ठन गई!
जूझने का मेरा इरादा न था,
मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था,
रास्ता रोक कर वह खड़ी हो गई,
यूं लगा जिंदगी से बड़ी हो गई।
मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं,
जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं।
मौत से ठन गई।
जूझने का मेरा इरादा न था,
मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था,
रास्ता रोक कर वह खड़ी हो गई,
यूं लगा जिंदगी से बड़ी हो गई।
मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं,
जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं।
मौत से ठन गई।
दीर्घायुष्य माणसाला मृत्यूचे
भय वाटत नाही. माजी
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना मृत्यूचे भय कधीच वाटले नाही. त्यांना दीर्घायुष्य लाभले
होते. पण वाजपेयी गेली काही
वर्षे हे विस्मरणाचे
सुख भोगत होते. गुरुवारी त्यातून त्यांची सुटका मृत्यूने केली. वाजपेयी गेले आणि
त्यांच्यासोबत एक अजातशत्रू, निखळ, मानवतावादी व्यक्तिमत्व हरपले. देशातील जनसागर
शोकात बुडाला आहे. एवढा प्रतिभावान, मोठ्या ताकदीचा नेता देशाने पाहिला नाही. त्यांच्या निधनाने एक सच्चा,
प्रामाणिक राजकारणी विद्वान आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या कार्याचा वसा
देशातील सर्वपक्षीय राजकारण्यांनी घेतला तर देश कधीही मागे राहणार नाही; देश
प्रगतीपथावर जाईल. सर्वपक्षीय नेत्यांशी असलेली सलगी, सर्वधर्म समभाव, प्रखर
देशभक्ती, मानवता, देशासाठी काहीतरी चागले करण्याची तळमळ, संस्कारीत मुल्यांची
जपणूक अशी स्वभाव वैशिष्ठ्ये वाजपेयींच्या व्यक्तिमत्वाची होती. आज देशाला अशा
प्रतिभावान नेतृत्वाची गरज आहे. सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्व
आपल्यामध्ये असणे, असे
भाग्य फारच कमी जणांच्या वाटय़ास येते. वाजपेयी यांनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला, तो काळ सर्जनशील
स्वतंत्र भारताचा होता. राजकारणापेक्षा समाजकारणातून भारताचे नवनिर्माण करण्याचा
होता. साहजिकच अटलबिहारी वाजपेयींनी समाजकारणाला महत्व दिले. तत्कालीन नेते सर्वसामान्य माणसासारखे होते आणि त्यांना लोक आपलेच मानत असत. नेते
त्यावेळी स्वत:ला जनतेपेक्षा वेगळे समाजात नसत. सर्वसामान्यांच्या घरी चटईवर बसणे, त्यांच्या
घरी प्रतिकूल परिस्थितीत राहणे हे विशेष नव्हते. थोडक्यात, राजा आणि प्रजा यांत अंतर नव्हते. निश्चित विचारधारेने समाज घडवण्याचा निस्पृह
हेतू तत्कालीन राजकारण्यांचा होता. श्यामाप्रसाद
मुखर्जी, राममनोहर लोहिया,
नानाजी देशमुख, दीनदयाळ उपाध्याय, अच्युतराव पटवर्धन अशा बुद्धिजीवी मंडळीचा तो काळ होता.
भारतीय क्रांती लढयातील १९४२
च्या चलेजाव आंदोलनाचा परिणाम
दिसू लागला होता,
ब्रिटीश सत्ताधारी देश सोडण्याच्या तयारीत होते. स्वातंत्र्याची पहाट उगवत होती. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल यांचा तो काळ होता. १९४२ च्या
क्रांती लढ्यात अटलबिहारी वाजपेयी सामील असल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा
लागला. त्यानंतर ते श्यामाप्रसाद
मुखर्जी यांच्या संपर्कात आले आणि जनसंघाचे नेते म्हणून त्यांची खऱ्या अर्थाने राजकीय
कारकीर्द सुरु झाली. मध्य
प्रदेशातील ग्वाल्हेरात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांच्या सामाजिक,
राजकीय विचारांनी खुणावले. त्यांचे
वडील शिक्षक
आणि कवी होते. वडिलांकडून
संवेदनशीलता आणि नेत्याच्या भूमिकेतील लोकशिक्षकाचे बाळकडू त्यांना लहानपणापासून
मिळाले. त्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक
संघ बाल्यावस्थेत होता. देशासाठी काहीतरी
करण्याची जिद्द असलेल्या या युवकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय होण्याचे ठरविले. संघाने त्यांना पुढे
संधी दिली. नेतृत्वादी प्रशिक्षणादरम्यान संघाने वाजपेयी यांना
उत्तर प्रदेशातील जबाबदारी सोपविली. देश स्वातंत्र्याच्या
उंबरठ्यावर होता. स्व.दीनदयाळ
उपाध्याय आणि स्व.श्यामाप्रसाद मुखर्जी या नेत्यांच्या
मार्गदर्शनाखाली वाजपेयी
यांच्या समाजकारणाची सुरुवातच झाली. उपाध्याय
संपादक असलेल्या नियतकालिकांसाठी वाजपेयी बातमीदार होते आणि नंतर मुखर्जी यांचे
सहायक संपादक होते. पत्रकार
आणि कार्यकर्त्याची भूमिका त्यांनी निभावली. गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली. त्यानंतर भारतीय जनसंघाचा जन्म झाला. वाजपेयी हे जनसंघाच्या काही मूळ संस्थापकांतील एक होते. सुरुवातीलाच त्यांची पक्षाचे राष्ट्रीय
सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली. १९५७
साली, अटलबिहारी पहिल्यांदा बलारामपुरामधून लोकसभेवर निवडून आले. साहित्य, कला, संस्कृती यांचे बाळकडू घरातूनच
त्यांना होते.
त्यास संघाच्या
शिबिरांतून मिळालेल्या वक्तृत्व प्रशिक्षणाची जोड मिळाली आणि अटलबिहारी यांचे
व्यक्तिमत्व सर्वार्थाने बहरू लागले.
वाजपेयी संसदेच्या सभागृहात पोटतिडकीने लोकांचे प्रश्न मांडत. वाजपेयींच्या वक्तृत्वाची स्व. तत्कालीन
पंतप्रधान पंडित नेहरूंनी स्तुती केली आणि हा मुलगा उद्या देशाचे
नेतृत्व करेल, अशी
भविष्यवाणी उच्चारली. नंतर ती तंतोतंत खरी ठरली. पुढे जनसंघाचे आणि
नंतर भाजपचे अध्यक्षपद अटलबिहारींकडे आले. भाजपचा झालेला
प्रसार, काही दिवसांचे पहिले
पंतप्रधानपद, दुसरे पंतप्रधानपद १३
महिन्यांचे व पुढे आलेले पूर्णकाळ स्थिर सरकार आणि अटलबिहारी वाजपेयी
यांचे समर्थ नेतृत्व यामुळे भाजपा पक्षाला खऱ्या अर्थाने जनपाठिंबा मिळू लागला. १९७४ साली स्व.इंदिरा गांधी यांनी जेव्हा पहिल्यांदा
अणुस्फोट केला
तेव्हा त्याचे समर्थन करणाऱ्यांत वाजपेयी आघाडीवर होते. एके काळी ज्या इंदिरा गांधींचे वर्णन वाजपेयी यांनी ‘गूंगी गुडिया’ असे केले होते, त्याच वाजपेयी यांनी बांगलादेश युद्धातील कामगिरी पाहून त्यांना दुर्गेची
उपमा दिली. पंतप्रधानपदी असताना
काँग्रेसशासित राज्यांना मदत देण्याची भूमिका त्यांनी घेतली.
अशा संवेदनशील राजकारण
नको, असा पोक्त सल्ला
स्वपक्षीयांना त्यांनी दिला. कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नरसिंह राव पंतप्रधानपदी असताना संयुक्त
राष्ट्र संघात भारताची भूमिका मांडण्यासाठी त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना पाठवले होते. आणि आपल्या देशातील
सरकारविरोधात परदेशी भूमीत वाजपेयी यांनी टीकेचा एक शब्ददेखील काढला नव्हता. परराष्ट्र धोरण
कसे हाताळावे, हे वाजपेयी
यांना अवगत होते. पंतप्रधानपदाच्या
कारकीर्दीत शरद पवार यांच्या क्षमतांचा आदर ठेवत त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी
देण्याचे औदार्य वाजपेयी यांच्या ठायी होते. आणीबाणीत अन्य अनेक
नेत्यांप्रमाणे त्यांनाही तुरुंगवास भोगावा लागला. पण पुढच्या राजकारणात इंदिरा गांधी
यांचा त्यांनी कधीही दुस्वास
केला नाही. त्यांनी भाजपच्या
विस्तारासाठी जिवाचे रान केले.
यावेळी अटलजींचे सहकारी
लालकृष्ण अडवाणी यांची मोठी मदत झाली. अटलबिहारी यांच्या सहिष्णू प्रतिमेमुळे त्यांना राजकीय क्षेत्रात मोठा यशाचा टप्पा पार करता
आला. त्यामुळेच आज त्यांच्याविषयी
सर्वत्र प्रेम आणि आदर आहे. वाजपेयी प्रतिभावान कवी होते आणि त्यांची कविता खऱ्या
राष्ट्रभक्ताची होती.
कविता मुझे
विरासत में मिली, असे
ते म्हणत. काव्यशास्त्रविनोदाचा आस्वाद घेणे ही त्यांची वृत्ती होती. त्यांच्या स्वभावात एक उमदेपणा होता. छोटे मन से कोई बडा नहीं होता, असे ते एका कवितेत म्हणतात, तेव्हा ती केवळ कवितेतील ओळ नसते. तर ते त्यांचे जीवनविषयक पक्के तत्त्वज्ञान होते. हे प्रभु.. मुझे
इतनी उँचाई कभी मत देना, गैरों
को गले न लगा सकूँ हे त्यांचे प्रामाणिक मत होते. त्यांच्या कवितेत राष्ट्रउभारणीचा आशावाद दिसतो. आओ फिर से दिया जलाए.. ही कविता आशादायी आहे. त्यांच्या कविता उत्कट आणि जीवनविषयक
तत्वज्ञान मांडणाऱ्या आहेत, त्या अमर आहेत. कारण त्यातील तत्वज्ञान फक्त तत्वज्ञान
नाही तर तो जनमानसाचा आरसा आहे. वाजपेयींची भाषणे म्हणजे
एका योग्याची संस्कारक्षम प्रवचने ऐकणे होय. त्यातून कुणाला अध्यात्मिक अनुभूती
मिळेल तर कुणाला जीवनविषयक तत्वज्ञान सापडेल. वाजपेयी यांचे प्रत्येक भाषण हा एक प्रतिभासंपन्न आविष्कार असे. त्यांचे दुसरे
वैशिष्ठ्य म्हणजे माणसांवर, मानवतेवर आणि त्यांच्या आयुष्यावर प्रेम असलेली त्यांची रसरशीत, अध्यात्मिक आणि
सुसंस्कारित आशयगर्भ वाणी !
२०१५ साली अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले. ते
त्यांचे शेवटचे
दर्शन. नंतर प्रकृती अस्वास्थामुळे ते आपल्या मठीतून बाहेर पडले नाहीत. मृत्यूला आव्हान
देणारा उमदा राजकारणी नेता आज आपल्यात राहिलेला नाही, यावर विश्वास बसत नाही;
परंतु आपण त्यांच्या प्रखर राष्ट्रीय विचारांतून जीवनाचे तत्वज्ञान शिकले पाहिजे.
अटलबिहारी वाजपेयींना कोटी कोटी प्रणाम.

No comments:
Post a Comment