मोदींची विधाने आणि चर्चाच चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विनोदी बोलू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीला ते कॉंग्रेस व
विरोधकांवर तावातावाने तोंडसुख घेत असत. नंतर त्यांनी कॉंग्रेस पक्षातील जुन्या व
दिवंगत नेत्यांच्या कामगिरीवर टीका करण्यास सुरुवात केली. स्व. पंडीत नेहरू,
इंदिरा गांधी, राजीव गांधी या माजी पंतप्रधानांवर त्यांनी सडकून टिका केली.
त्यानंतर मोदी म्हणाले की, जे आम्ही पाच वर्षांत निर्णय घेतले व काम केले ते
कॉंग्रेसने गेल्या ६० वर्षांत केले नाही. जे काही भारतात प्रगतीचे पर्व सुरु झाले
आहे ते आमच्या कारकिर्दीत सुरु झाले, असा मोदींचा वादा आहे. मोदींनी गेल्या पाच
वर्षांत नोटबंदी, जीएसटीसारखे ऐतिहासिक निर्णय घेतले, असे मोदी व भक्तगणांचे लाडके
मत आहे.असो. स्वत:चे समर्थन करणे काही गैर नाही, परंतु आपण खरेच एवढे उत्तुंग
कार्य केले आहे का, याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा. अन्यथा बाष्कळ गप्पा
मारण्यात अर्थ नाही आणि पंतप्रधानपदाच्या प्रतिमेला ते साजेसे नाही, असे म्हणता
येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका
वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी असे वाटत होते की, प्रश्नही मोदींचेच
आणि उत्तरेही त्यांचीच आहेत की काय ? नंतर सिनेस्टार अक्षयकमार यांनी मोदींची
रसभरीत मुलाखत घेतली. ते आंबा कसे खातात, कोणता आंबा त्यांना आवडतो यावर अक्षयने
मोदींना विचारलेले आंब्यावरील प्रश्न पाहून लोकांची घटकाभर करमणूकही झाली. नुकतेच
मोदींनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमधील प्रश्नांची उत्तरे ट्विटरसहित इतर सोशल
मीडिया साइट्सवर शेअर केली आहेत. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
बालाकोट एअर स्ट्राइकदरम्यान तज्ञांना ढगाळ वातावरण असल्याने मोहीम रद्द करण्यात
येऊ नये, असा सल्ला दिल्याचे सांगितले होते. कारण ढगाळ व पावसाचे वातावरण असेल तर पाकिस्तानी रडारांना भारताची विमाने
दिसणार नाहीत किंवा लक्षात येणार नाहीत, असे तारे मोदींनी तोडले आहेत. मोदी यांचे
हे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे असेलही, परंतु त्यांच्या या मतामुळे भक्तगणांना
कितीतरी आनंद झाला. मोदी म्हणतात म्हणजे खरे असेल ते, असे काही जणांना वाटले.
वैज्ञानिक बिचारे यावर काहीच बोलले नाहीत. नरेंद्र मोदी यांनी असे म्हटल्यामुळे सोशल मीडियावर विरोधकांनी त्यांना ट्रोल केले. काहीजण मोदींच्या
समर्थनार्थ उभे राहिले. हे कमी आहे की काय म्हणून मोदींचा त्यांच्या त्या व्हिडीओतील दुसरी गोष्ट समोर आली आहे. यामध्ये नरेंद्र मोदी
सांगत आहेत की, भाजपाचे ज्येष्ठ नेते
लालकृष्ण अडवाणी यांचा रंगीत फोटो काढण्यासाठी आपण १९८७-१९८८ च्या सुमारास डिजिटल
कॅमेऱ्याचा वापर केला होता. तसेच हा फोटो ईमेलच्या सहाय्याने पाठवला होता. पंतप्रधान नरेंद्र
मोदींच्या या दाव्यावर अनेकांनी आक्षेप घेतला असून १९९५ च्या आधी ईमेल सेवाच
उपलब्ध नव्हती, असे विरोधकांचे मत आहे. ११९५ मध्ये अधिकृतपणे लॉन्च होण्याआधीच पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी भारतात १९८८ मध्ये याचा वापर केला होता, असे एका युजरने ट्विटमध्ये
म्हटले आहे. न्यूज नेशनला दिलेल्या
मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, १९८७-८८ दरम्यान मी पहिल्यांदा
डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केला होता. त्यावेळी फार कमी लोक ईमेलचा वापर करत होते.
आडवाणी यांची रॅली होती. त्यावेळी डिजिटल कॅमेऱ्याची साइज मोठी असायची. माझ्याकडे
डिजिटल कॅमेरा होता. मी आडवणी यांचा फोटो काढला आणि दिल्लीला पाठवला. रंगीत फोटो प्रसिद्ध झाल्याचे पाहून लालकृष्ण आडवाणी
यांना आश्चर्य वाटले होते. मोदींच्या या दाव्यावर
सोशल मीडिया युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. युजर्सने म्हटले आहे की, पहिला डिजिटल कॅमेरा निकॉन कंपनीने १९८७ रोजी विकला
होता आणि कमर्शिअल ईमेल सेवा १९९०-९५ दरम्यान सुरु झाली होती. माजी राज्यसभा खासदार
शाहिद सिद्दीकी यांनी उपहासाने ट्विट करत म्हटले आहे की, मोदी यांनी नाल्यातून गॅस
तयार करण्याचे आणि रडारपासून वाचवणाऱ्या ढगांप्रमाणे डिजिटल कॅमेरा आणि ईमेलची निर्मिती केली
आहे. काँग्रेस नेत्या दिव्या
स्पंदना यांनी ट्विट केले आहे की, प्रश्न हा आहे की, १९८८ मध्ये जगात
कोणाकडेही नसता यांचा ईमेल आयडी होता. अशावेळी यांना ईमेल पाठवत तरी कोण होते ? याच मुलाखतीत नरेंद्र
मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राइकसंबंधी विधान केले होते. हल्ल्याआधीच्या ढगाळ
वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय
विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला मी दिला
होता, अशाप्रकारचे विधान मोदींनी केले होते. यावरुन त्यांना सोशल
मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले. मोदी निवडणुकीच्या काळात अशी वक्तव्ये का करीत आहेत, असा प्रश्न अनेकांना
पडणे साहजिकच आहे. त्यांची विधाने खरी की खोटी याबद्दल अजून सत्यता पडताळली गेलेली
नाही. परंतु मोदींची उत्तरे सहज पटण्यासारखी वाटत नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी
लोकांना रुचेल एवढे बोलावे, अशी माफक अपेक्षा करण्यास हरकत नसावी. सध्या तरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर जोरदार चर्चा सुरु आहे आणि ती थांबेल
असे वाटत नाही.

No comments:
Post a Comment