अजूनही स्त्री असुरक्षित
देशात महिलांवरील
अत्याचार, विनयभंगाच्या घटना वाढत आहेत. मुंबई व
उपनगरात दाट लोकवस्ती आहे, रात्रीच्या वेळी छेडछाडीचे प्राण वाढले
असून मुली, महिला असुरक्षित आहेत. मुंबईत
रेल्वे लोकल गाडयांमध्ये जास्त प्रमाणात छेडछाडीचे प्रकार घडतात तर रिक्षांमधून प्रवास
करताना अनेक महिलांना अत्याचाराला सामोरे जावे लागल्याचे दिसत आहेत. समाजात अजुनही स्त्रीयांना हीन मानले जाते, असे विविध
घटनांवरून दिसत आहे. काळ बदलला, परंतु लोकांच्या
मन आणि मेंदूतील जुनाट रूढी, स्त्रीयांबद्दलची हीन भावना नष्ट
झालेल्या नाहीत. या रानटी मानसिक अवस्थेचे काय करायचे,
हा समाज विवेकवादाकडे कसा वळवायचा असा मोठा प्रश्न मानसोपचार तज्ज्ञांना
पडला आहे. न्याय व्यवस्था व संरक्षण व्यवस्थेने याबाबतीत कडक धोरण ठेवले तर या घटनां
रोखता येतील. समाजात लोक शिक्षित झाले, परंतु सुसंस्कारीत झाले नाहीत तर तो समाज मृतवत व आंधळा आहे, असे समजले जाते. आम्ही हे सर्व उघडया डोळयांनी पाहतो,
वर्तमानपत्रांत वाचतो, परंतु संवेदनशिलता आमच्या
अंतरी तसूभरही शिल्लक राहिली नाही काय, असा प्रश्न सतावत आहे. काही
दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये स्वत:च्या १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
करणाऱ्या नराधम पित्याने अटकेच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला होता आणि यानंतर महिलेने पतीविरोधात
पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम
पित्याचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे
नराधमाला समजले होते. त्याने घरातून पळ काढला होता. पोलिसांचे पथक घटनास्थळी
पोहोचली असता नराधमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. तीन दिवसांपूर्वी सायन रुग्णालयात एका विवाहितेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी मुंबईतील सायन पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. सायन रुग्णालयात
महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक २४ तास तैनात असतात. तरीही या
रुग्णालयात बलात्काराची घटना घडल्यामुळे पोलीस चक्रावून गेले आहेत. रुग्णालयातील
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली. या प्रकरणी त्या नराधमास अटक झाली, न्यायदेवतेकडून
शिक्षाही होईल. परंतु समाजात ही चाललेली अधोगती थांबविण्यासाठी
सामाजिक संघटना, पोलीस दल, समाजातील जागरूक
नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरण
गाजले होते, त्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात
आली होती. त्यावेळी दिल्लीत मोठया संख्येने या प्रकारचा निषेध
करण्यासाठी असंख्य निर्भया एकत्र आल्या होत्या. कोपर्डी येथे
एका बालिकेवर काही नराधमांनी अत्याचार केला, त्यावेळी सर्व नागरीकांनी
भव्य मोर्चा काढून निषेध नोंदवला होता. समाज सुसंस्कारित होण्यासाठी
आम्ही कुठे कमी पडत आहोत की टीव्ही, वेबसाईटचे आक्रमण आम्ही रोखण्यास
कमी पडत आहोत काय, असा प्रश्न पडतो. जेव्हा लोकांना राहणे, खाणे, रोजगाराची भीति व जगणे असुरक्षित वाटते, तेव्हा
लोकांचे वर्तन व स्वभाव बदलत असतो. या बदलाला सर्वजण सामोरे जात
नाहीत. काही जणांवर त्याचा विकृत परीणाम होतो. अत्याचार करण्यामागे व्यक्तीच्या मनातील दुषित भाव उफाळून येणे हे एक मानसिक
कारण असते. काही जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात. स्वत:च्या चंगळवादासाठी काहीही करण्याच्या हट्टापायी अशी नीच कृत्ये घडली जातात.
मुंबईमध्ये लोकलच्या डब्यात रात्रीच्या वेळी काही जण महिलांशी गैरवर्तन
करतात, अशावेळी काही महिला मुलींनी चालत्या लोकल ट्रेनबाहेर उडया
मारल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. सद्यस्थितीत काही
बेरोजगार टवाळखोर तरूण एकत्र येतात. निराश मनोवस्थेत ते एखादी
मुलगी किंवा महिलेला लक्ष्य करतात. अशाप्रकारे समुहाने अत्याचार
करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे विश्वास नेमका कुणावर ठेवायचा, असा प्रश्न लोकांना सतावत आहे. विकृत माणसांची फौज नाक्यानाक्यांवर,
बस स्टँडवर, रेल्वे स्थानकांवर, प्रवासात, नातेवाईकांच्या गराडयात, अनेक कार्यालयांत छुप्या पद्धतीने तैनात आहे. अशा नराधमांपासून
मुली, महिलांनी सुरक्षित राहण्याकरिता अशा विकृत लोकांची मानसिक
स्थिती, वागण्यातील बदल ओळखला पाहिजे. मुलींना
तशा प्रकारचे प्रशिक्षण लहाणपणापासून देणे गरजेचे आहे. व्यक्तीच्या
वागण्यातील बदल,त्याची मनोवस्था याचा मनोकायिक अभ्यास अर्थात्
मानसशास्त्र विषय त्या दृष्टीने अभ्यासात आणणे गरजेचे आहे. मानवातील
रानटीपणाची कारणे अनेक जुन्या विकृत ग्रंथांत आहेत. कारण मनूस्मृतीसारखे
ग्रंथ, ज्यामध्ये सुमती भार्गव नावाच्या मनूने तत्कालिन समाजासाठी
इ.स. पूर्व १९५ या काळात कायदा म्हणजेच
जगण्याची आचारसंहिता व ती न राबवल्यास होणारी शिक्षेची तरतूद यांवर बरेच काही लिहून
ठेवले आहे. स्त्रीया व शूद्र यांना समाजात हीन वागणूक द्यावी,
त्यांना समाजातील कोणत्याही कार्यक्रमात अथवा कार्यात सहभागी करून घेऊ
नये, अशा प्रकारचे मनूचे विचार होते. त्यामुळे
समाजात पुरुषप्रधान संस्कृतीची वाढ निवडुंगाच्या रोपाप्रमाणे फोफावली आहे. आज समाज बदलला आहे, परंतु हा बदल मनोकायिक नाही तो बेगडी
स्वरूपाचा आहे. म्हणजे समाजात विविध डिजिटल यंत्रणेचा वापर वाढला
आहे, परंतु मनोवस्था पूर्वीसारखीच रानटी राहिली आहे. मानवाच्या मन, मेंदूतून जातीवादी, स्त्रीपुरूषांतील लैंगिक भेदभाव हा अजुनही जिवंत आहे, तोपर्यंत समाजात समता व प्रगती येणार नाही. या बाबीच
मानवाच्या अधोगतीला कारणीभूत आहेत. या डिजिटल युगात २० टक्के
स्त्रीया स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागल्या आहेत. बाकी स्त्रीया
अशिक्षित राहिल्यामुळे त्या पुरूषांच्या निर्णयाबाहेर जाऊ शकत नाहीत, अशी अवस्था आहे. काही प्रसारमाध्यमे स्त्रीयांबद्दल विकृत
दर्शन दाखवतात, याचाच परिणाम नव्या पिढीवर हळूहळू विष भिनावे
त्याप्रमाणे होत आहे. आम्हाला छत्रपती शिवरायांच्या काळातील जिजाऊ
व इतर स्त्रीयांकडून प्रेरणा घेण्याची का गरज वाटत नाही, याचा
समस्त स्त्री वर्गाने गांभीर्याने विचार करावा. समाजातील सर्व
बदलांचा सर्वांनी अभ्यास करावा व भावी पिढीला या विकृत व चंगळवादाची झळ लागू नये,
यासाठी समाजातील प्रत्येकाने
प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अशोक सुतार ८६००३१६७९८

No comments:
Post a Comment