मै भी चौकीदार...
भाजप आणि कॉंग्रेस
यांच्यात आरोप –प्रत्यारोप सुरु आहेत. हे निवडणुकीपर्यंत सुरूच राहणार.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरून भाजप सरकारवर टीका करताना मोदींचे नाव न घेता चौकीदारही चोर है, अशी सातत्याने टीका केली होती. राफेल प्रश्नावरून मोदी व भाजपला
अडचणीत आले होते. कॉंग्रेसच्या सातत्याने होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी व चौकीदाराचा मुद्दा निकालात
काढण्यासाठी नरेंद्र मोदींनी नामी शक्कल लढवत मै भी चौकीदार असा हॅशटॅग वापरत ट्विटरवर नवे अभियान सुरु
केले आहे. निवडणुकीच्या प्रचारात कॉंग्रेसचा हा मुद्दा लोक विसरावेत यासाठी
मोदींनी ही रणनीती अवलंबली आहे. मोदींच्या प्रयत्नाला कितपत यश मिळणार, हे अजून ठरायचे आहे.परंतु मोदींच्या मै भी चौकीदार या अभियानावर
सोशल मिडियातून जोरदार टिका होऊ लागली आहे. २०१४ ला चायवाला असे अभियान होते आणि
आता चौकीदार असे अभियान सुरु झाले आहे. चायावाला, चौकीदार ही विशेषणे स्वत:ला
लावून घेणे आजच्या पिढीला आवडत नाहीत. लोक प्रगती करत असताना त्यांना खालच्या
पातळीवर का नेले जात आहेत, अशी टिका मोदींच्या अभियानावर होत आहे. २०१४
मध्ये झालेल्या लोकसभेच्या
निवडणुकांच्या प्रचारामध्ये मोदी यांनी म्हटले होते की, चौकीदार बनून देशाचे संरक्षण करेन. राफेल प्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींचा हाच मुद्दा
पकडून चौकीदार चोर है, अशी नवी घोषणा आणली व मोदींवर टिका केली. राफेलचा मुद्दा काढताच मोदी व
भाजपवासी अस्वस्थ होतात, हे राहुल गांधीनी हेरले. नंतर मोदींचा चौकीदार हाच शब्द वापरून राहुल यांनी मोदींवर अनेकवेळा
शाब्दिक हल्ला केला. पंतप्रधान मोदी हे अंबानींचे चौकीदार आहेत, अशी टीकाही राहुल यांनी केली तर
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदी हे जगनमोहन रेड्डीसारख्या भ्रष्ट माणसाचे
चौकीदार आहेत, अशी टीका नुकतीच केली आहे. त्यामुळे चौकीदार शब्द सर्वत्र व्हायरल झाला. भाजपने व अन्य राजकीय पक्षांनी आत्तापर्यंत अनेक घोषणा जाहीर केल्या. परंतु
चौकीदार चोर है, ही घोषणा मोदींवर जोरदार टीका करणारी ठरली आहे. राहुल गांधी यांना
पप्पू संबोधणारे भाजपवाले राहुल गांधींच्या चौकीदार चोर है या टीकेमुळे व्यथित
झाले. मै भी चौकीदार या अनोख्या प्रचार घोषणेमुळे लोक मोदींवरील कॉंग्रेसने केलेली
टिका विसरतील, असे भाजपवाल्यांना वाटते. त्यामुळे मै भी चौकीदार या प्रचार घोषणेची
सुरुवात मोठ्या कौतुकाने नरेंद्र मोदी यांनी केली आहे. भाजप आणि इतर राजकीय पक्षांनी १९९१ नंतर निवडणुकांच्या कार्यकाळात
दिलेल्या विविध घोषणा लोकांच्या आजही स्मरणात आहेत. राम मंदिर आंदोलनाच्या काळामध्ये मंदिर वही बनायेंगे, गर्व से कहो हम हिंदू है, अशा घोषणा धार्मिक, सामाजिक संघटनांकडून
देण्यात आल्या होत्या. या घोषणांचा प्रचारात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या उपयोग केला गेला. बारी बारी सबकी बारी, अगली बारी अटलबिहारी, अशा काव्यात्मक घोषणांनंतर २००४ साली शायनिंग इंडिया या घोषणेच्या
मदतीने भाजपने प्रचार केला. २००९ साली लालकृष्ण अडवाणी यांना लोहपुरुष असे
संबोधून प्रचार करण्यात आला. लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीमध्ये लोहपुरुष या शब्दाभोवती प्रचार फिरत राहिला. मात्र २०१४ साली चायवाला या शब्दाने निवडणुकीच्या प्रचारात खळबळ माजवली. चहावाला माणूस पंतप्रधान
होऊ शकतो, याचा उच्चार नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी प्रचारात वारंवार
केला होता आणि या घोषणेला अमाप प्रसिद्धीही मिळाली.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार, मोदी सरकार अशीही घोषणा टीव्ही, सोशल मिडिया व जनतेत सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अच्छे दिन आयेंगे ही
लोकप्रिय घोषणा ठरली. आता ही घोषणा म्हणजे भाजपचा प्रसिद्धीचा स्टंट होता, हे
लोकांना समजत आहे. असो. घोषणा आणि अंमलबजावणी यांचा काहीही संबंध नसतो, असलाच तर
तो जनतेची दिशाभूल करण्यासाठी असतो, हे सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात असे अनेक शब्द, अनेक घोषणा रूढ झाल्या. छप्पन इंच की छाती, चौकीदार इ. शब्दप्रयोगांचा भाजपकडून वापर करण्यात आला. भाजपने राहुल गांधी यांच्यावर पप्पू
म्हणून जोरदार टिका केली. या काळात राहुल गांधी
यांनी चौकीदार चोर है, नरेंद्र मोदी यांचे
सरकार सूटबूटकी सरकार आहे असे प्रत्युत्तर भाजपला दिले. राफेल प्रकरणावर राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर चौकीदार चोर है अशी टीका
केल्यामुळे भाजपमध्ये व खुद्द मोदीच अस्वस्थ झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत आठवड्यात लोकांना उद्देशून एक ट्वीट केले. त्यात ते म्हणतात, तुमचा चौकीदार
देशाच्या रक्षणासाठी ठामपणे उभा राहिला आहे. पण मी एकटाच नाही. भ्रष्टाचार,
अस्वच्छता आणि सामाजिक दुष्प्रवृत्तीविरोधात लढणारा प्रत्येक जण
चौकीदार आहे. भारताच्या प्रगतीसाठी कष्ट करणारा प्रत्येकजण चौकीदार आहे. मै भी चौकीदार असे आता सर्वजण म्हणत आहेत. मोदींनी स्वतःच्या नावाआधी ट्विटरवर चौकीदार हा शब्द वापरल्यानंतर इतर
केंद्रीय मंत्र्यांनीही त्यांचे अनुकरण केले. राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर है या विधानाचा लोकांमध्ये बराच मोठा परिणाम झाला. यामुळे मोदींकडे राफेलप्रकरणी संशयी नजरेने लोक पाहू लागले. मोदींनी यावर एक
उपाय काढला, प्रत्येकजण स्वत:ला देशाचा चौकीदार समजू लागला तर राहुल गांधी यांना
उत्तर देता येईल की, प्रत्येकजण चोर कसा असू शकतो ? परंतु यावर कॉंग्रेसच्या
सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे की, गरीब नाही तर श्रीमंत लोक चौकीदार
ठेवतात. प्रियांका गांधी यांच्या म्हणण्याचा अर्थ हा की, मोदी गरीब नाहीत आणि ते
चौकीदार कसे ? असो. यानिमित्ताने लोकसभा निवडणुकीत मतदारांचे मनोरंजन होणार आहे.
त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि चौकीदाराप्रमाणे बारीक लक्ष ठेऊन लोकप्रतिनिधी
पारखून घ्यावेत, हे बरे.

No comments:
Post a Comment