Tuesday, 2 April 2019

कॉंग्रेसमुक्त भारताची अफवा


              कॉंग्रेसमुक्त भारताची अफवा



कॉंग्रेसमुक्त भारत करण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. परंतु कॉंग्रेस सव्वाशे वर्ष जुनी असून ती नष्ट करता येणे अशक्य आहे. कॉंग्रेसला गाडू असे म्हणणारे आज पुन्हा कॉंग्रेसमधील जल्लोष पहात आहेत. सर्व जाती- धर्मांना पुढे घेऊन जाणारा पक्ष म्हणून कॉंग्रेसकडे पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसमुक्त भारताची घोषणा ३ वर्षांपूर्वी केली होती, अजूनही ते करत आहेत. परंतु दिवसेंदिवस कॉंग्रेसमध्ये चैतन्य येत आहे. भाजपचा सहपक्ष शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच विधान केले आहे. त्यांचे विधान वस्तुस्थिती समजावून सांगणारे आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की, मी काँग्रेसमुक्त देश असे बोलतच नाही. मी काँग्रेस नष्ट करा असे कधी बोलत नाही. कारण विरोधी पक्ष राहिलाच पाहिजे. नष्ट करा किंवा काँग्रेसमुक्त, हे मुक्त, ते मुक्त या अशा फालतू कल्पना माझ्याकडे नाहीत, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॉंग्रेसमुक्त भारत या संकल्पनेवर टीका केल्याने आश्चर्य वाटायला नको. त्यांनी भाजपला वास्तवतेचे भान दिले आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना आणि पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे आठ दिवस उरलेले असतानाच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमुक्त भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेची खिल्ली उडवली आहे. आजही देशात बेकारीचा प्रश्न तसाच आहे. किंबहुना गेल्या चार वर्षांत बेरोजगारी सर्वात जास्त वाढली. ४५ टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. बेरोजगारी हा सगळय़ात ज्वलंत प्रश्न आहे व तो सोडवावाच लागेल, असे सांगत उद्धव यांनी केंद्र सरकारच्या कारभारावरही उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढले. सगळ्याच राजकीय पक्षांनी अवाजवी बोलू नये, अवाजवी आश्वासने देऊ नयेत, जेणेकरून लोकांच्या स्वप्नांना उगाचच कुठेतरी धुमारे फुटतील, असे भान ठाकरे यांनी दिले आहे. आज लोकशाहीत अशी परिस्थिती आहे की, जुमलेबाजीवर निवडणुका जिंकल्या जातात. जुमलेबाजीची गरज राजकारणात खरोखरच पडते का ? सर्वसामान्य माणूस प्रामाणिकपणे आपले काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता मै भी चौकीदार अभियान सुरु केले आहे. प्रत्येकजण आपापले काम प्रामाणिकपणे करत असताना लोकांनी वेगळे चौकीदार व्हायची गरज नाही. आज लोकांची सत्ताधाऱ्यांकडून फार मोठी अपेक्षा नाही. पण एखादी अवाजवी गोष्ट लोकांना सांगितली आणि आश्वासने देणारे ती पूर्ण करू शकले नाही तर लोकांचा असंतोष वाढत जातो. हाच असंतोष आश्वासने देणाऱ्या, जुमलेबाजी करणाऱ्या राजकारण्यांना घरी बसवतो, असे अनेकवेळा राजकारणात घडले आहे. आज देशातील वातावरण बिघडले आहे. ते आजच बिघडले असे नाही तर याची प्रक्रिया गेल्या काही वर्षांत सुरु झाली. देशात कट्टर धार्मिकता निर्माण झाली आहे. पुरोगामी लोकांची हत्या करून त्यांना नष्ट केले जात आहे. गाईच्या नावावर अल्पसंख्यकांना त्रास दिला जात आहे. धर्म व जातीमध्ये राजकारण वाटले गेले आहे. प्रत्येकाचा सवतासुभा सुरु असल्याचा फटका देशाला येत्या काही काळात बसेल, असे वाटते. त्यामुळे राजकारण्यांनी आपण काय बोलतो, दुहीचे बीज पेरत आहोत का, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. अन्यथा ज्या क्रांतिकारक, समाजसेवकांनी देशाला एकत्र आणले, विविध जाती- धर्माच्या लोकांना एकत्र करत विकास केला, तो देश या विघातक शक्तींच्या जाळ्यात अडकेल आणि देशाचा विकास रखडेल. देशात दर ५ वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात, ते चांगले लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी. परंतु लोकप्रतिनिधी जर देशाच्या संस्कृतीला, बंधुभावाला नख लावत असतील तर देशाचे भवितव्य ते काय राहणार ? नवीन पिढीने यातून कोणता आदर्श घ्यायचा, असे अनेक प्रश्न आज निर्माण होत आहेत. राजकारणी आपापसांत वाद खेळत असतात. परंतु वैयक्तिक हेवेदावे, दुसऱ्याचे चारित्र्यहनन करणे, खोटी आश्वासने देणे, अचानक मतांच्या बेगमीसाठी कोणती मोठी घटना घडवणे, लोकांना भावनिक आवाहन करणे या गोष्टी देशाला घातक आहेत. शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारण केले, त्यांनी सभांमधून विरोधकांवर जोरदार टीका केली. परंतु ते असे कधीच म्हणाले नाहीत की, विरोधकांना संपवा. तसेच देशात अनेक बडे नेते होऊन गेले. परंतु त्यांनी विरोधी पक्षाला नेस्तनाबूत करण्याची वारंवार घोषणा केली नाही किंवा लोकांना तसे आवाहनही केले नाही.विरोधकांना संपवून सत्ताधारी जर देशाच्या सत्तासिंहासनावर बसले तर त्यांच्या सत्तास्थानाला हुकूमशाहीची झालर असणार आहे. पंतप्रधान सातत्याने कॉंग्रेसमुक्त भारतचा नारा लावत आहेत. त्यांना विरोधकांना संपवून देशात हुकूमशाही आणायची आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. मोदींनी भाजपमध्ये जसा एककल्ली कार्यक्रम गेली पाच वर्ष राबवला, तशीच त्यांना देशात हुकूमशाही किंवा एकाधिकारशाही आणायची आहे, असे दिसते. मोदींचे छुपे अजेंडे आता लोकांच्या लक्षात येत आहेत. परंतु जनतेला काहीच समजत नाही, असे सत्ताधाऱ्यांनी समजण्याची गरज नाही. लोकांना सर्व काही समजते. कारण याच जनता जनार्दनाने बडे बडे नेते आणि राजकीय पक्षांना घरी बसवले आहे. देशातील लोकशाहीमध्ये सर्व मतदारांना मतदानाचा समान अधिकार आहे. अजूनही देशात भारतीय राज्यघटनेशिवाय कोणाचे पानही हालत नाही, हे मोदींनी लक्षात घेतले पाहिजे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या कॉंग्रेसमुक्त भारताची शक्यता साफ फेटाळून लावली आहे. कारण आपण लोकशाहीप्रणीत देशात राहतो. इथे कोणा एकाची एकाधिकारशाही चालत नाही, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

                                                                                                   अशोक सुतार 


                                                               




No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर