www.hasyanand.blogspot.com Ashok Sutar
अडवाणी आणि भाजपचे सार...
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अखेर
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांचे मौन सोडले आहे. अडवाणी गेली पाच वर्ष शांत होते. ज्या अडवाणींनी भाजपसाठी
मोठे कष्ट घेतले, देशात ते सर्वत्र फिरले, त्याचं अडवाणींना मोदी सत्तेवर येताच
घरी बसावे लागले. ज्येष्ठ लोकांनी फक्त मार्गदर्शन करावे असे म्हणत मोदींनी
आसवांनी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा यांना घराचा रस्ता दाखवला. यामुळे
भाजपमधील ज्येष्ठ नेते मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. भाजपमध्ये सबकुछ मोदी-
शाह असे वातावरण दिसते. भाजपच्या स्थापनादिनी अडवाणी यांनी एका ब्लॉगमधून स्वतःची भूमिका मांडली आहे. इंग्रजीत लिहिलेल्या या ब्लॉगचे शीर्षक आहे नेशन फर्स्ट, पार्टी नेक्स्ट, सेल्फ लास्ट. म्हणजे आधी देश, मग पक्ष, शेवटी स्वतः अडवाणी, अशा शीर्षकाचा लेख अडवाणींना का लिहावासा वाटला ? याचे
कारण भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांना दिलेली वागणूक आणि मोदी- शाह यांची असलेली
पक्षातील एकाधिकारशाही होय. अडवाणी यांनी हा लेख लिहिला, परंतु शीर्षकातच त्यांनी
भाजपचा लेखाजोगा मांडल्याचे दिसत आहे. मोदी हे प्रथम स्वतः, मग देश, शेवटी पक्ष अस
वर्तन करत असावेत, असे अडवाणींना म्हणायचे आहे काय ? काहीजण म्हणतील की, हे
वक्तव्य म्हणजे वादाची साल पिंपळाला लावण्याचा प्रकार दिसतो; पण असे नाही. ज्यांना
असे वाटते, त्यांनी मोदी सरकारच्या वर्तनाचा, मोदी- शाह यांच्या धोरणांचा गेल्या
पाच वर्षांचा अभ्यास नीट करावा. अडवाणी यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून यावेळी भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा
निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शहा यांच्या उमेदवारीनंतर अडवाणी यांनी पहिल्यांदा
सार्वजनिक भाष्य केले आहे. अडवाणी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधून त्यांनी हा
ब्लॉग लिहिला आहे. ६ एप्रिलला भाजपचा पक्ष स्थापना दिवस होता, त्यापूर्वी हा लेख लिहिलेला आहे. भाजप नेतृत्वाने कसे वागावे, काय निर्णय घ्यावे, कशा
प्रकारचे वर्तन करावे, आत्मचिंतन करावे, असे अडवाणी यांना वाटते. राजकारणातील एका ज्येष्ठ नेत्याची ही खंत आहे, असेही वाटते. भाजप नेतृत्वाने याचा गांभीर्याने
विचार करावा. अडवाणी आपल्या
ब्लॉगवरील लेखात लिहितात की, भाजपमध्ये आपल्या सर्वांसाठी मागे वळून पाहण्याची, पुढे पाहण्याची आणि स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याची ही एक संधी आहे. भाजप संस्थापकांपैकी
एक या नात्याने मी मानतो की, माझे प्रतिबिंब भारतीयांपुढे विशेषतः माझ्या पक्ष कार्यकर्त्यांसमोर सादर करावे, हे माझे कर्तव्य आहे. माझे विचार मांडण्यापूर्वी मी गांधीनगरच्या
जनतेप्रति आभार व्यक्त करतो, ज्यांनी १९९१ नंतर सहा वेळा मला लोकसभेसाठी निवडून दिले. त्यांचे प्रेम आणि पाठिंब्याने मी नेहमीच भारावलो आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडला गेलो. तेव्हापासून मातृभूमीची सेवा
करणे, हेच माझे ध्येय आणि मिशन राहिले आहे. माझे राजकीय जीवन गेल्या सत्तर वर्षांपासून माझ्या पक्षाशी अविभाज्यपणे जोडून आहे. आधी भारतीय जनसंघासोबत आणि
त्यानंतर भारतीय जनता पक्षाशी. मी दोन्ही पक्षांच्या संस्थापक सदस्यांमध्ये होतो. पंडित दीनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी आणि इतर अनेक महान, निस्वार्थी आणि प्रेरणादायी नेत्यांसोबत काम करणे, हे माझे भाग्य होते. माझ्या जीवनाचा मार्गदर्शक सिद्धांत आधी देश, मग पक्ष आणि शेवटी मी हा नेहमीच राहिला आहे आणि परिस्थिती कशीही असली तरी मी या सिद्धांताचे पालन करण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही करेन. भारतीय लोकशाहीचे सार, अभिव्यक्तीचा आदर आणि यातील विविधता आहे. स्थापनेनंतर भाजपने कधीही त्यांना आपला शत्रू मानले नाही जे राजकीय पातळीवर आमच्या विचारांशी असहमत होते. उलट आम्ही त्यांना आमचे सल्लागारच मानले. तसेच भारतीय राष्ट्रवादाच्या आमच्या व्याख्येत आम्ही कधीही त्यांना राष्ट्रविरोधी म्हटले नाही, जे राजकीय स्तरावर आमच्याशी सहमत नव्हते. पक्ष वैयक्तिक आणि राजकीय स्तरावर प्रत्येक व्यक्तीच्या अभिव्यक्ती
स्वातंत्र्याप्रती प्रतिबद्ध आहे. देशात आणि पक्षात भारतीय लोकशाही आणि
लोकशाहीच्या परंपरांचं रक्षण भारतासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळेच भाजप नेहमीच मीडियासह लोकशाहीतील आपल्या सर्व संस्थांचे स्वातंत्र्य, अखंडता, निष्पक्षता राखणे आणि त्यांना मजबूत करण्याची मागणी करण्यात सर्वांत पुढे राहिला आहे. भ्रष्टाचारमुक्त राजकारणासाठी निवडणूक सुधारणा, राजकीय आणि निवडणुकीतील फंडिंगमध्ये पारदर्शकतेवर विशेष
लक्ष देणे, याला पक्षाने प्राधान्य दिले आहे. थोडक्यात, सत्य, राष्ट्रनिष्ठा आणि लोकशाहीने माझ्या
पक्षाच्या संघर्षाच्या विकासाला अधोरेखित केले आहे. ही सर्व मूल्ये मिळून सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि सुराज्य (गुड गवर्नंस) घडतो, ज्यावर माझा पक्ष नेहमीच आधारला आहे. आणीबाणीविरोधातील ऐतिहासिक संघर्षदेखील
हीच मूल्ये टिकवण्यासाठी होता. आपल्या सर्वांनाच एकत्रितपणे भारताच्या लोकशाही
धोरणाला मजबूत करण्याचा प्रयत्न करायला हवा, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. निवडणूक
लोकशाहीचा उत्सव आहे, हे खरेच आहे. मात्र ते
भारतीय लोकशाहीच्या सर्व हितचिंतकांना - राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे, निवडणूक प्रक्रियेशी निगडित अधिकारी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मतदारांसाठी प्रामाणिकपणे
आत्मपरीक्षणाची एक संधी आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी लेखाच्या शेवटी सर्वांना शुभेच्छा
दिल्या आहेत. लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये भाजपचा
सार सांगितला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे. अडवाणींचा मंत्र ,प्रथम देश, मग पक्ष आणि शेवटी स्वत: असा असल्याचा पंतप्रधान मोदींनी उच्चार
केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अडवाणी यांनी पक्षासाठी दिलेल्या
योगदानाचे कौतुक केले आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या लेखात भाजपचे सार
सांगितल्याचे मोदी यांनी मान्य केले आहे. त्यावर त्यांनी आता चिंतन करण्याची वेळ
आली आहे. लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून त्यांचा सल्ला पक्षाचे
कार्यकर्ते व नेते लक्षात घेतील, असे वाटते.

No comments:
Post a Comment