नाराज, बंडखोरांचे संमेलन
कोणत्याही परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणूक जिंकायची, या उद्देशाने सर्व राजकीय पक्षांनी मतदारांना भुलवण्यासाठी विविध आश्वासनांची
खैरात सुरू केली आहे. लोकसभा निवडणूक
जेमतेम एक महिन्यावर आली असून नाराज कार्यकर्ते, नेते व बंडखोरांना ऊत आला आहे. अशा परिस्थितीत
या लोकांची समजूत काढण्यात राजकीय पक्षांचा वेळ जात आहे. सध्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील
मोदी लाट दिसून येत नाही. तसेच विद्यमान सरकारचा पराभव करण्याची मानसिकता विरोधी पक्षात दिसत नाही, हे विशेष होय. काँग्रेस व राष्ट्रवादी तसेच शिवसेना व
भाजपा या दोन्ही विरोधी पक्षांमध्ये एकसमान मुद्दा आढळतो. तो म्हणजे, पक्षांतर्गत बंडखोर व नाराजांची संख्या वाढू लागली आहे. निवडणुका जशा जवळ येत आहेत तसे आयाराम, गयारामांचे प्रस्थ वाढू लागले आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला
स्पष्ट बहुमत मिळेल, असे वाटत नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व पक्षांचा संभ्रम दिसून येत आहे.
लोकसभा निवडणूक २०१९ ची घोषणा निवडणूक आयोगाने केली. त्यानंतर विविध
राजकीय पक्ष जागृत झाले आहेत. तसेच शिवसेना व
भाजप यांच्यातून विस्तवही जात नव्हता, ते दोन्ही पक्ष
एकत्र आले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये हीच स्थिती आहे. आघाडीच्या निमित्ताने काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आले, त्यांचे जागावाटपही झाले आहे. परंतु पूर्वी एकमेकांच्या विरोधात स्थानिक
पातळीवर राजकारण करणारे कार्यकर्ते यांच्यात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आपल्या राजकीय विरोधकांचा प्रचार कसा करायचा, याच गुंत्यात
कार्यकर्ते अडकले आहेत तर काही अतिमहत्वकांक्षी नेत्यांनी आपल्याला पक्षात संधी
मिळत नाही, असे पाहून बाहेरच्या पक्षांचा रस्ता धरला
आहे. या परिस्थितीचा फायदा महाराष्ट्रातील विद्यमान
सत्ताधारी असलेल्या भाजपने घेतला नसला तर नवलच. कारण भाजपने आता नवी निवडणूक रणनीति राबविण्याचे
धोरण स्वीकारले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांतील नाराज
व बंडखोरांना आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील आहेत. नगर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय
विखे पाटील यांना भाजपमध्ये आणण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले. खरे तर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्यामुळे राधाकृष्ण विखे
पाटील यांच्या मुलाची म्हणजे सुजय विखे पाटलांची उमेदवारी ते देऊ शकत नव्हते. तशी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे विनंती केली होती. परंतु ही विनंती पवार यांनी फेटाळून लावली. त्यामुळे आघाडीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने सुजय विखे पाटील यांनी भाजपचा रस्ता धरला. नगरमधून भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे
चिरंजीव अपक्ष निवडणूक लढवणार आहेत म्हणे. यामुळे नगर लोकसभा मतदारसंघात मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून सुरुवातीला शरद पवार यांची
उमेदवारी असल्याचे म्हटले जात होते. या मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटील यांचे वर्चस्व आहे, परंतु पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते
पाटील यांना उमेदवारी देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या मदतीने भाजपात
प्रवेश केला. माढा लोकसभा
मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय
शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यातच सातारा जिल्ह्यातील फलटणचे युवा नेते व
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश
केला आहे. रणजितसिंह निंबाळकर हे माजी खासदार हिंदुराव
नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव आहेत. निंबाळकर यांचे
म्हणणे असे की, सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच सर्व
कामांचे श्रेय घेत असून काँग्रेसला दुटप्पीपणाची वागणूक देत आहे. त्यामुळे काँग्रेसमधून काम करण्यात काही अर्थ नाही. अशाप्रकारे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, वाई परिसरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी
खासदार प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव मदन भोसले यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश
केला. गेली कित्येक वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ
असलेले प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव मदनराव भोसले यांनी भाजपमध्ये जाण्याचा
पर्याय का निवडला असावा, या चर्चेला मोठा ऊत आला आहे. असे म्हटले जाते की, मदन भोसले ज्या कारखान्याचे चेअरमन आहेत, त्या कारखान्याच्या प्रश्नावरून
भाजपवाल्यांनी त्यांच्यावर दडपण आणले होते. असो काही असो. परंतु काँग्रेसचा तंबू सोडून भाजपमध्ये प्रवेश करणे हे शहाणपणाचे लक्षण नव्हते. सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीने खासदार उदयनराजे भोसले यांच्या
उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. परंतु हा
मतदारसंघ युतीमधून शिवसेनेच्या वाट्याला आला असल्यामुळे पुरुषोत्तम जाधव यांनी
शिवसेनेतून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले. पुरुषोत्तम जाधव यांनी दोन वेळा सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली
आहे. ही लढत उदयनराजे भोसले व पुरुषोत्तम जाधव
यांच्यात असल्याचे मानण्यात येत होते. परंतु सातारा
लोकसभा मतदारसंघात या लढतीला आता वेगळेच वळण
मिळाले आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सुरुवातीला
भाजपमधून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेचे
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट मुंबई येथे नुकतीच घेतली आहे. कोल्हापूर येथे रविवारी होत असलेल्या युतीच्या प्रचारसभेत नरेंद्र पाटील
यांची उमेदवारी शिवसेनेतर्फे जाहीर होत आहे. नरेंद्र पाटील
यांचा सातारा जिल्ह्यात जास्त संपर्क नसला तरी सातारा जिल्ह्यात माथाडी कामगारांची
संख्या वाई, सातारा, जावली, कोरेगाव, पाटण व कराडमध्ये जास्त प्रमाणात आहे. त्यातच खासदार
उदयनराजे भोसले यांना खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस मधून उमेदवारीसाठी विरोध होता. राष्ट्रवादीच्या
अनेक नेत्यांनी उदयनराजेंना
तिकीट मिळू नये यासाठी प्रयत्न केले होते. परंतु खा. उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदारसंघातील एक खणखणीत नाणे असल्यामुळे शरद
पवार यांनी त्यांच्या राजकीय पद्धतीने ही परिस्थिती हाताळून व नेत्यांची समजूत काढून उदयनराजे यांना उमेदवारी दिली. खा. उदयनराजे भोसले यांना कोणत्याही परिस्थितीत
सातारा लोकसभा मतदारसंघातील दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात प्रचार करावयाचा आहे. कारण त्यांच्या प्रचाराची संपूर्ण भिस्त दक्षिण पट्ट्यावर अवलंबून आहे. खा. उदयनराजे भोसले हे त्यानिमित्ताने अनेक नेते
व कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. परवाच त्यांनी
सातारा येथे राष्ट्रवादी भवनात रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली. काही महिन्यांपूर्वी खा. उदयनराजे भोसले
व विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या वाक्युद्ध सुरू होते. परंतु ना. रामराजे निंबाळकर यांनी आता स्पष्ट केले आहे
की, पवारांकडे बघून मी
उदयनराजेंचे काम
करेन. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये
प्रवेश केल्यानंतर माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे
भाजपच्या संपर्कात असल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. आ. गोरे यांची
चर्चा सुरू असतानाच कराड येथे त्यांनी पत्रकार परिषदेत
परिषद घेऊन सांगितले की, मी काँग्रेसमध्येच आहे आणि काँग्रेसमध्येच
राहणार. काँग्रेस- राष्ट्रवादी व भाजपा- शिवसेना
यांच्यात लोकसभा निवडणुकीनिमित्त अनेक कार्यकर्ते व नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. काहीजण
येत आहेत ही
वस्तुस्थिती आहे. थोडक्यात आगामी लोकसभा २०१९ मध्ये अनेक नेते सैरभैर झाल्याचे दिसत आहे. पक्षनिष्ठा, जनतेचे प्रश्न, विकासकामे यांची चर्चा हे सर्व मागे पडले असून कोण कोणत्या
पक्षात जात आहेत याचीच चर्चा अधिक आहे. लोकशाहीसाठी हे चित्र योग्य वाटत नाही. त्यामुळे
राजकीय पक्षांनी गोंधळून न जाता जनतेसमोर आपले ठाम मत मांडावे व जनतेला आश्वस्त
करावे. अजूनही शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळग्रस्तांचे प्रश्न तसेच वाढती महागाई असे अनेक प्रश्न जनतेसमोर आहेत. या प्रश्नांची
चर्चा न करता राजकीय पक्षांमध्ये आयाराम गयाराम यांची चर्चा होणे हे निकोप
लोकशाहीचे लक्षण दिसत नाही. यावर जनतेनेच
योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे. -अशोक सुतार

No comments:
Post a Comment