Tuesday, 26 July 2022

गडकरींचे बोल

गडकरींचे बोल अशोक सुतार / ashoksutar1973@gmail.com
भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणाबाबत केलेल्या वक्तव्यावर खुप चर्चा होत आहे. राजकारणात चर्चेला कोणताही विषय वर्ज्य नसतो. गडकरींनी, मला खूप वेळा राजकारण सोडावेसे वाटते, अशी उद्विग्न भावना व्यक्त केली. त्यावर अनेकांनी हे खरे असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या राजकारणाचा घसरलेला दर्जा पाहुन गडकरींनी असे वक्तव्य केले आहे की काय, हे कळायला मार्ग नाही. त्यांना महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेले राजकारण पटलेले दिसत नाही असे वाटते. असे बरेच अर्थ गडकरींच्या वक्तव्यातून ध्वनित होतात. असो. राजकारणात सध्या सूडबुद्धी वापरणे, वैयक्तीक चिखलफेक करणे, सरकार पाडणे, गटबाजी करणे असे धंदे सुरू झाले आहेत. म्हणून गडकरींनी, मला खूप वेळा राजकारण सोडावेसे वाट्ते, असे म्हटले असावे. कदाचित गडकरींचा रोख विद्यमान उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असावा, असेही वाटते. राजकारणात प्रामाणिकपणा हा गुणधर्म बर्‍यापैकी नष्ट होत चालला आहे. पक्षाला आव्हान देणे हाही नवीन प्रकार राजकारणात आला आहे. त्याला पक्षश्रेष्ठी गद्दारी म्हणतात तर बंडखोरी करणारे त्याला पक्षातील बहुमताचा विषय म्हणतात. राजकारणाकडे पाहण्याचा नागरिकांचा म्हणजे मतदारांचा दृष्टीकोनही बदलत आहे. जनतेला अशा गोष्टींचे काहीच वाटत नाही. कारण राजकारण्यांबद्दल जनतेला विश्वास राहिलेला नाही आणि कोणी सत्तेवर आला तर महागाई, बेरोजगारी आणि भरमसाठ करभरणा सुरूच राहणार, हे त्या मतदाराला माहीत झाले आहे. गडकरी म्हणत आहेत त्यात काहीतरी तथ्य आहे, असे वाटते. परंतु काही राजकारण्यांना षडयंत्र करायला खुप आवडते. षडयंत्र रचणे म्हणजेच राजकारण असा गोड गैरसमज अनेकांचा झाला आहे. जनतेला विकासाची गंगा उपलब्ध करून देण्यापेक्षा स्वत:ची खळगी भरणे अनेकांना महत्वाचे वाटते. आता गडकरींसारखे अनेकांना, राजकारणात रस न वाटणे हे जमणार आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो. मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसे सत्तेशिवाय काही राजकारणी राहू शकत नाही. असो. राजकारणात स्व. गणपतराव देशमुखांसारखी माणसे मिळणे दुर्मिळ झाले आहे. राजकारण हा श्रीमंतांचा एक व्यवहार झाला आहे काय, असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. ना.नितीन गडकरींनी काही दिवसांपुर्वी त्यांच्या भाषणात, राजकारण्यांचा व राजकारणाचा कंटाळा यायला लागला आहे , असे म्हटले होते. त्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, आता फक्त सत्ताकारणाचे राजकारण होते. गडकरी म्हणाले ते बरोबर आहे. सत्ता हा लोकशाही, कल्याणकारी राज्याचा मार्ग दाखवते. त्यात लोककल्याणाची भाषा असली पाहिजे. सत्ता सत्तेसाठी नसावी. नितीन गडकरी म्हणाले होते की, राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? हे समजून घेतले पाहिजे. महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झाले त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते. पण आता १०० टक्के सत्ताकारण झाले आहे. नितीन गडकरी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. भाजपा हा देशाच्या सत्तेतील महत्वाचा पक्ष आहे. देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे त्यांचे म्हणण्याची दखल घेणे गरजेचे वाटते. गडकरी यांनी नेमके कशामुळे असे म्हटले, हे मात्र समजलेले नाही. त्यांनी एखादे उदाहरण दिले असते तर समजायला सोपे झाले असते. नितीन गडकरी यांनी असेही म्हटले आहे की, मला खूप वेळा राजकारण सोडावेसे वाटते, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. गडकरी यांनी राजकीय क्षेत्राकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, आपले सामाजिक आणि राजकीय जीवन समृद्ध व्हावे, त्यात दर्जात्मक बदल व्हावेत यासाठी व्यक्ती आणि नेतृत्वात गुणात्मक बदल झाला पाहिजे. गुणात्मक परिवर्तन ही एक प्रक्रिया आहे. विचारांमधून, थोर पुरुषांपासून आपल्याला प्रेरणा मिळत असते. सगळ्या विश्वाचे कल्याण व्हावे, अशी आपली संस्कृती आहे. माझे कल्याण व्हावे असे आपल्या संस्कृतीत लिहिलेले नाही. गडकरींनी खंत व्यक्त केली आहे की, माणसाच्या मोठेपणाचा, कर्तृत्वाचा आणि गुणवत्तेचा त्याच्या निवडून येण्याच्या गुणवत्तेशी काही संबंध नाही. जो निवडून येतो तोच सिकंदर अशी आपल्या समाजात भावना आहे. निवडून येणाऱ्या लोकांबद्दल फार काही बोलायचे नाही. वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येत असतात. राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते असे म्हटले जाते, असेही गडकरी म्हणाले होते. म्हणजेच राजकारण हा क्रिकेटसारखाच नशिबाचा खेळ झाला आहे, असे गडकरींना म्हणायचे असेल. म्हणजेच गेम ऑफ चान्स असे गडकरींना म्हणायचे आहे, असे दिसते. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांना राजकारण कधी सोडतोय असे वाटत आहे. गडकरी यांनी, आज राजकारण म्हणजे १०० टक्के सत्ताकारण झाले आहे अशी खंतही व्यक्त केली आहे. नितीन गडकरींच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. नागपुरातील ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात नितीन गडकरींनी हे वक्तव्य केले होते. ना. गडकरी हे भाजपाचे असे नेते आहेत की, ते कुठल्याही कुटील कार्यक्रमात दिसत नाहीत. ते नेहमीच आपले काम सुरू ठेवतात. आपल्या कामात व्यग्र असतात. स्पष्टवक्तेपणामुळे ते प्रसिद्ध आहेत, परंतु सर्व राजकीय पक्षांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. विरोधकही गडकरींना संपर्क करीत असतात. गडकरींना स्वपक्षाबद्दल बोलायचे असेल तर ते मोघम बोलतात. परंतु लेकी बोले, सुने लागे असे त्यांचे वक्तव्य असते. त्यांचे बोल कुणाकुणाला लागले, ते लवकर समजणार नाही. परंतु काही खास माणसांसाठी ते बोल असावेत, असे वाटते. गडकरींचे स्पष्ट बोलणे जाणकार नागरिकांना पटेल असे आहे. म्हणुनच त्यांच्या वक्तव्याची सकारात्मक चर्चा होते, त्यांचे वक्तव्य दखल घेण्याजोगे असते.

No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर