ज्येष्ठ पत्रकार अशोक सुतार यांचे परखड लेख. दै. पुण्यनगरी, दै. देशोन्नती. दै. संचार, दै. वार्ताहर,दै. जनशक्ती, दै. प्रभात, सा. मार्मिक, दै. लोकमंथन, दै. महाराष्ट्र सम्राट, दै. सागर, दै. जनमुद्रा, दै. कर्नाळा, दै. महानायक इ.दैनिकांत राजकीय, सामाजिक विषयांवर अनेक लेख प्रसिद्ध.
Wednesday, 20 April 2022
द्वेषपूर्ण भाषणे लोकशाहीसाठी घातक
द्वेषपूर्ण भाषणे लोकशाहीसाठी घातक
अशोकसुतार/८६००३१६७९८
गेल्या काही वर्षांत देशात हेट स्पीच म्हणजेच द्वेषपूर्ण भाषण वाढले असल्याचे दिसत आहे. सर्वत्र भडकावू भाषणे, आपापसांत वाद- विवाद वाढत आहेत. द्वेषपूर्ण भाषणांमुळे देशात विभाजन होण्याची शक्यता आहे. देशात नवीन कायदे आणले जात असताना त्याला विरोध होत आहे. अशा कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे ते देशद्रोही असा संदेश सर्वत्र सोशल मिडीयावर पसरवला जात आहे. देशात कट्टर धर्मवादाचे स्तोम माजले आहे. त्यामुळे या लोकशाहीप्रणित देशात सर्वधर्म समभावाची भावना बाळगणे गैर तर नाही ना, अशी शंका सर्वसामान्यांना सतावत आहे. तर देशात सध्या दोन गट तयार होत आहेत, ही एक विभाजनाची प्रक्रिया असून आपण लोकशाहीपासून दूर जात आहोत का, हा विचार द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्यांनी करणे आवश्यक आहे. सध्या मशिदीचे भोंगे आणि महाआरती, हनुमान चालिसा यांच्या पठणांचे एक प्रकारे युद्धच सुरू होत आहे काय, अशी गंभीर परिस्थिती दिसत आहे. राजकीय नेत्यांची द्वेषपुर्ण भाषणे समाजात हिंसा घडवतील, अशी शंका वाटू लागली आहे. केंद्र सरकारने याबाबत मुग गिळून गप्प न बसता ठोस कारवाई करण्याची अपेक्षा आहे. न्यायालयांनीही अशा द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर अंकुश ठेवणे महत्वाचे वाटते. द्वेषपूर्ण भाषण म्हणजेच हेट स्पीचचा वापर प्रामुख्याने भेद निर्माण करण्यासाठी केला वापरला जातो. जेव्हा एका समुदायाला दुसऱ्या समुदायावर किंवा व्यक्तीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर हेट स्पीच वापरले जाते. सोशल मिडीयावर एखाद्या व्यक्तीला ट्रोलिंग केले जाते. त्याद्वारे हेट स्पीचचा वापर करण्याचा नवीन पायंडा आला आहे. देशात विचारांचे दोन गट पडले आहेत. त्यामुळे सत्ताधारी समर्थक आणि विरोधक यांच्यात आपापसांत शरसंधान सुरु असल्याचे दिसते. एवढेच नाही तर टीका करताना काही तारतम्य असावे, याचे भानही ठेवले नाही. जे लोक सत्ताधाऱ्यांच्या धोरणांना विरोध करतात, त्यांना देशातून हाकलून दिले पाहिजे, ते राष्ट्रद्रोही असून त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, अशी भाषा सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहे. जे लोक सत्ताधाऱ्यांच्या धोरणांना विरोध करीत आहेत, ते देशद्रोही असल्याची भाषा सत्ताधारी समर्थकांनी वापरण्यास सुरुवात केली. याचा परिणाम होऊन देश दोन्ही गटांत विभागला गेला. देशात दोन्ही विचारांचे लोक एकमेकांवर खालच्या भाषेत आरोप करू लागले. त्यातून हेट स्पीच संस्कृती तयार झाली. हिटलरच्या काळात जर्मनीमध्ये हेट स्पीचचा वापर जास्त प्रमाणात केला जात असे. तिथे नाझींनी ज्यू लोकांचा छळ करून त्यांच्या कतली केल्या. हे सांगायचा हेतू असा आहे की, हेट स्पीचनंतर जर्मनीत मोठा नरसंहार झाला. द्वेषपूर्ण शब्दांनी निरपराध लोकांचा बळी घेतला, एवढे मोठे सामर्थ्य शब्दांच्या वापरात आहे. हेट स्पीच हे समाजासाठी घातक आहे.
धर्म अथवा जातीच्या आधारावर प्रक्षोभक भाषण करणे आजकाल फॅशन बनली आहे. पोलीसदेखील याप्रकारच्या घटनांना आवर घालण्यासाठी असहाय्य दिसत आहेत. या प्रकारच्या घटना वास्तवात आपल्या देशाच्या धर्मनिरपेक्ष चौकटीला बिघडवून टाकत आहेत आणि संविधानाच्या भावनेलाच ठेच पोहोचवत आहेत. त्यांनी निपराध लोकांचे संरक्षण करणे आणि विद्वेषी भाषण करणाऱ्यांना कायद्याने शिक्षा करणे किंवा अटकाव करणे, ही पोलिसांची जबाबदारी आहे. पोलीसच या आपल्या कर्तव्यापासून पळ काढत असल्याचे दिसते. जे लोक याप्रकारचे विद्वेषी आणि प्रक्षोभक भाषण देतात आणि समाजात अशांतता निर्माण करतात, ते कोरोनासारख्या एखाद्या महासाथीपेक्षा काही कमी नाहीत. याप्रकारचे लोक जे सामान्य लोकांमध्ये द्वेष आणि वितंड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, वास्तवात ते देशाला कोरोना महासाथीपेक्षाही अधिक नुकसान पोहोचवत आहेत. त्यामुळेच अनेक संकटांसोबत द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तींशीही लढण्याची वेळ लोकशाहीप्रणीत देशात आली आहे. ही एक गंभीर गोष्ट म्हटली पाहिजे. तसेच भवितव्यात असेच सुरु राहिले तर द्वेषाच्या महामारीत देशातील कित्येक निरपराधांचे बळी जाण्याची शक्यता अधिक आहे. सध्या आम्हीच धर्माचे खरे ठेकेदार म्हणुन अनेक राजकीय पक्ष समोर येत आहेत. भारतातील ठराविक समाजाला खुश करण्यासाठी काही राजकीय पक्षांनी संकुचित भुमिका घेतली आहे, ती गैर आहे. समाजात ज्या गैर गोष्टी घडतात, त्यावर पोलीस (सुरक्षा यंत्रणा), न्यायालय (न्याय यंत्रणा ) यांचा अंकुश असला पाहिजे. लोकशाहीप्रणीत देशात अतिरेकी घटना, द्वेषपूर्ण भाषण, आक्षेपार्ह वागणूक, मनमानी, एकाधिकारशाहीला स्थान नाही. परंतु देशात वाढत असलेली द्वेषपूर्ण भाषणाची (हेट स्पीच) सवय भारतीय राज्यघटनेची संहिता मोडीत काढू पहात आहे. आपल्या समाजाला विकासाची गरज आहे की द्वेष पसरवणाऱ्या लोकांची गरज आहे, जे आपल्या धर्मद्वेषाच्या जोरावर निर्दोषांचा जीव घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. द्वेषपूर्ण भाषणात एक हुकुमशाही, मनमानी करण्याची रानटी वृत्ती लपली आहे, जी वृत्ती लोकशाहीतील आदर्श विचार- आचारांना नष्ट करू पहात आहे. त्यामुळे न्यायालयासमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. द्वेषपूर्ण भाषणांमुळे देशात नवीन विकृती वाढीस लागणे म्हणजे देशात फुट पडण्याचे कारस्थान करण्यासारखे आहे. हे जर वेळीच रोखले गेले नाही तर देशात अनेक विचारांचे गट निर्माण होऊन देशाचे विभाजन होण्याची भीती नाकारता येत नाही. द्वेषपूर्ण भाषणाचे अनेक पैलू आहेत. त्यात धर्म, लिंग, व्यक्तीची कमकुवत स्थाने, विचार यांच्यावर हल्ले केले जातात. म्हणजेच लोकशाहीच्या संहितेनुसार लोकांनी न जगता काही लोकांच्या एकाधिकारशाहीप्रमाणेच जगले पाहिजे, अशी घटनाविरोधी रानटी भूमिका घेतली जाते. द्वेषपूर्ण भाषणाचे परिणाम कित्येक दशके निरपराध नागरिकांना भोगावे लागतील. म्हणूनच हेट स्पीच अर्थात द्वेषपूर्ण भाषण हे समाजासाठी घातक वाटते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
व्याघ्रसंरक्षण काळाची गरज देशातील वाघांच्या मृत्यूंची वाढती संख्या चिंताजनक आहे. देशभरात २०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या काल...
-
Ashok Sutar www.hasyanand.blogspot.com नोटाबंदी आणि बेरोजगारी केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीनंतर गेल्या दोन वर्षांत सु...

No comments:
Post a Comment