Thursday, 8 March 2018

वसंताचे गीत ….


वसंताचे गीत



थंडीचे दिवस संपले आहेत. शिशिर ॠतू कोरडा ठक्क गेला. झाडांची पानगळ सुरु झाली, हळूहळू झाडे ओकीबोकी दिसू लागली. पर्णहीन झाडांमध्येही सौंदर्य अफाट आहे. झाडांच्या नुसत्या फांदया पहावयास मिळतात. तुम्ही झाडांकडे किती सौंदर्यदृष्टीने पाहता त्यावर ते अवलंबून आहे. पर्णहीन झाडांचे सौंदर्य केव्हाही न्याहाळावे, चित्रकारांनाही त्याचा मोह होतो. पर्णहीन झाडांचे सकाळी, दुपारी , संध्याकाळी सौंदर्य न्याहाळावे. छायाचित्रकार मंडळींसाठी ती मोठी पर्वणीच म्हटली पाहिजे. झाडांच्या फांदयांची मूळ नैसर्गिक रचना, आकारांची गुंतागुंत, त्यातील मोहकता अनुभवली पाहिजे. मानवाची शरीररचना ज्याप्राणे चित्रकार रेखाटतात, त्याचप्राणे झाडांचे शरीरशास्त्र पाहिले पाहिजे. पानगळ होते, त्यावेळी झाडांच्या आसपास वाळलेली पाने इतस्तत। पहुडलेली असतात. त्या पानांवरून चालत जाण्यात वेगळीच मजा असते. निसर्गातील प्रक्रिया सुरु राहते. वसंत सुरु होतो, तेव्हा झाडे, वेलींना धुमारे फुटायला सुरुवात होते. सृष्टीत अनोखे चैतन्य भारलेले असते. कुसुमाकर वसुंधरेला भेटण्यास उत्सुक असतो आणि वसुंधरा नटूनथटून त्याच्या स्वागताची तयारी करत असते. कुसुमाकर म्हणजे वसंत ॠतू...                                               पानगळ झाली, आता झाडे कात टाकून पुन्हा बहरणार... झाडांना कोवळी पालवी फुटते, गुलाबी पोपटी पानांचे थवे झाडावर जमा होतात. प्रत्येक फांदी अन् फांदींवर ते सृष्टीचे अनोखे रुप उधळत असतात. होळीच्या उत्सवात सर्वांनी धमाल केली, निसर्ग तरी कसा मागे राहिल ? वसंताच्या आगमनापूर्वी लज्जेने वसुंधरेच्या गालावर लालिमा पसरण्यास सुरुवात होते. जंगलातील पळस बहरतो आणि सुरु होते लाल-केशरी रंगांची उधळण ! पानझडीनंतर पळसाला फुलांचे धुमारे फुटतात. मला आठवते, माझ्या लहानपणी आमच्या छोटयाशा गावाबाहेर गावदर्याकडे पळसाची अनेक झाडे असत. आम्ही धूलिवंदनादिवशी कोवळया पळस फुलांचा वापर करून तयार झालेला लाल रंग एकमेकांच्या अंगावर उधळण्यासाठी वापरत असू. ते दिवस आता राहिले नाहीत. ती पळसाची झाडेही कालौघात नष्ट होऊ लागली आहेत. आता माणसांनी आपल्या जगण्याचे चोचले वाढवून ठेवले आहेत. सिमेंटची जंगले बहरू लागली आहेत. पण त्यात जीव गुदमरतो आणि माणुसकी, आपुलकी एका कोपर्यात रडत, कुढत पडलेली असते. माणसे बदलली पण निसर्गाने निसर्गत्व कायम ठेवले आहे. खरे तर माणसाची निसर्गाशी कधीच तुलना होऊ शकत नाही. वसंत ॠतू म्हणजे निसर्गाने मानवाच्या मनशांतीसाठी अखंड वाहत ठेवलेला चैतन्याचा झरा होय. वसंताच्या आगमनाने, सारी सृष्टी न्हाली फुल अन् पानांनी. कोवळी पाने, सुगंधी फुले आणि झाडावर विसावणारे पक्षी. मला भावते, झाडांच्या विविधाकारांची नक्षी. कुसुमाकर भेटण्या येतो प्रियेला, घेऊन रंग भावनांचे.                                                         सृष्टीत नवे चैतन्य आणि उल्हासाचे वातावरण पसरले आहे. वसंत ॠतूचा काळ म्हणजे कुसुमाकराशी झालेल्या वसुंधरा भेटीचा स्वागत सोहळाच, सृष्टीतील चैतन्याचे नवे पर्वच जणू ! विविध रंग आणि गंधांचे संमेलन जणू भरले आहे आणि तळयाकाठचे पक्षी किलबिल करीत आहेत. वसुंधरा कुसुमाकराची वाट पहात आहे. एवढेच नव्हे पानापानांतून सळसळते तारूण्य ओसंडते आहे. दूर मंदिरात घंटांचा नाद किणकिणत आहे. रामजन्मोत्सव साजरा होत आहे. मंदिराला लागून असलेला औदुंबर जटा सोडून ध्यानस्थ बसला आहे. रामनामाची त्याला गोडी लागली असून ध्यानावस्थेत तो ईश्वररूपाशी एकदत्त झाला आहे. ही सृष्टी सदैव चैतन्याने भारलेली असावी म्हणून निसर्गातील प्रत्येक घटक प्रयत्नरत आहे. वसंताचे गीत घुमाया लागले, पक्ष्यांचे थवे येथे फिराया लागले, प्रेमिकांचे प्रेम बहराया लागले, मनीच्या गुजगोष्टी सांगाया लागले, भावनांचे बंध फुलाया लागले, सृष्टीचे चैतन्य खुलाया लागले. वसंताचे गीत घुमाया लागले.

                                                - अशोक सुतार 

No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर