Wednesday, 9 November 2022

रानटी विकृती

रानटी विकृती ashoksutar1973@gmail.com
नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणारे शिंदे मंत्रीमंडळातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा प्रकार एका मुलाखतीदरम्यान घडला आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला असता सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंना कॅमेरासमोरच शिवी घातल्याचे दिसून आले. अब्दुल सत्तार हे गावठी पुढार्‍यासारखे बोलू लागले आहेत. त्यांच्या शब्दांत वैचारीक रानटीपणा वाढलेला दिसुन येत आहे. महाराष्ट्राने स्त्रियांबद्दल गलिच्छ भाषा वापरलेले नेते पाहिलेले नाहीत. सध्या राजकारण हीन पातळीवर सुरू झाले आहे, त्याचीच ही झलक म्हटली पाहिजे. महाराष्ट्राला सांस्कृतिक परंपरा आहे, राज्यातील वातावरण पुरोगामी आहे. स्त्रियांचा आदर करावा हे आपल्याला भारतीय संस्कृतीत शिकवले गेले आहे. लोकप्रतिनिधी तर जनतेचा प्रतिनिधी म्हणुन, त्याची वाणी शुद्ध, शीलवान असावी अशी अपेक्षा असताना अब्दुल सत्तारांनी, जिजाऊ, सावित्रीबाई फुलेंच्या सुसंस्कारीत महाराष्ट्रात ही नवीन आणलेली विकृती पोसली जाणार तर नाही ना, याचीच भीती वाटत आहे. औरंगाबादमध्ये लोकशाही वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी, तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असे म्हटले आहे. यावर काय सांगाल असे सत्तार यांना विचारण्यात आले. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ, असे उत्तर देताना अब्दुल सत्तार दिसत आहेत. महाराष्ट्रात नेत्यांची एकमेकांवर टिका सुरू असते, परंतु कोणी एवढे खालच्या पातळीवर येत नाही. परंतु सत्तार स्वभावाप्रमाणे खालच्या पातळीवर आले. स्त्रियांना हीन मानणे ही देशाची संस्कृती नाही. अब्दुल सत्तार हे किती कोडगे, वैचारीक दिवाळखोर आहेत, हेच त्यांच्या विधानातून दिसुन आले आहे. सत्तेची मस्ती काही लोकांच्या डोक्यातून जात नाही. तसाच प्रकार सत्तार यांच्याबाबत दिसुन येतो. सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांच्या नावाने असलेल्या ट्वीटर हॅण्डलवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या महिलाविरोधी नेत्यांकडून सुप्रियाबद्दल आणि पर्यायाने सर्व महिलांबद्दल वादग्रस्त विधाने सुरुच आहे. पुरुषार्थ सांगणारे हे लोक त्यांच्या वर्तुवणुकीमुळे आणि क्षमतेमुळे उघडे पडले आहेत, असे सदानंद सुळे यांच्या नावाने असलेल्या अकाऊंटवरुन ट्वीट करण्यात आले आहे. हे अकाऊंट व्हेरिफाइड नाही. म्हणुन सत्तार यांच्या विधानातील तीव्रता कमी होत नाही. स्त्रियांबद्दल यापुर्वी आत्तापर्यंत अनेक नेत्यांनी विचित्र विधाने केली आहेत. परंतु थेट महिलेला शिवी देणे हा प्रकार रानटी युगाकडे नेणारा आहे. आधी स्वयंपाकघरात जा किंवा इतर कुठेतरी असे म्हटले गेले आणि आता कॅबिनेटमध्ये असलेल्या मंत्र्याने केलेले हे विधान योग्य नव्हे. अशा विकृत नेत्यांना स्वत:बद्दल सोडून त्यांना इतरांबद्दल आणि महिलांबद्दल काहीही वाटत नाही. सुप्रिया सुळे या संसदेतील राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार आहेत. त्यांच्याबद्दल सार्वजंक ठिकाणी विकृत विधान करणे अब्दुल सत्त्तार यांना भोवणार आहे, असेच दिसते. महाराष्ट्रात नवनिर्वाचित सरकार स्थापन झाले आहे. अब्दुल सत्तार हे राज्याचे कृषीमंत्री आहेत. किमान या पदाचा दर्जा त्यांनी राखावा, असे वाटते. यापूर्वीही जिल्हाधिकाऱ्यांना मद्यपानासंदर्भात कॅमेरासमोर विचारलेल्या प्रश्नामुळे सत्तार अडचणीत आले होते. शिंदे सरकारच्या बंडखोर गटातील नेते ना. अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आल्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीने अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन केले. यावेळी अब्दुल सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सत्तारांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी सत्तार यांच्यासहीत तीन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील सुषमा अंधारेंना नटी वगैरे म्हणतात, रविंद्र चव्हाण बलात्काऱ्यांना सोडण्यासाठी भायखळा तुरुंगात बसून आहे. तर अब्दुल सत्तार सुसंस्कृत खासदाराबद्दल बोलतात, हे निंदनीय आहे, असे म्हणत विद्या चव्हाण यांनी निशेष नोंदवला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी या मुद्द्यावरुन आमने-सामने आल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्यांनीही या विधानावर आक्षेप नोंदवला आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या संस्कृतीचा उल्लेख करत सत्तार यांना सुनावले आहे. सत्तार यांनी सुप्रिया सुळेंविरोधात वापरलेल्या अपशब्दांच्या मुद्द्यावरुन कोल्हेंनी दोन ट्वीट केले आहेत. कृषिमंत्री अब्दुलजी सत्तार, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी प्रेरित करणाऱ्या माँ जिजाऊ एक महिलाच होत्या, ज्योतिबांना स्त्री शिक्षणासाठी साथ देणाऱ्या सावित्रीमाई एक महिलाच होत्या, लोककल्याणकारी राजकारणाचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या अहिल्यादेवी एक महिलाच होत्या, अशी आठवण अमोल कोल्हेंनी सत्तार यांना करुन दिली आहे. अन्य एका ट्वीटमध्ये, इतिहासात डोकावून पाहिले तर अशा अनेक महिलांनी राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला आहे, त्यामुळे मंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तींनी अशी विधाने करणे निषेधार्ह आहे. या हीन दर्जाच्या भाषेचा व नीच मानसिकतेचा मी तीव्र निषेध करतो, असे म्हणत अमोल कोल्हेंनी सुप्रिया सुळे यांना टॅग करत अब्दुल सत्तार यांच्या नावाचा हॅशटॅग वापरला आहे. लोकप्रतिनिधीने महिलांबाबत अपशब्द बोलणे योग्य नाही. तसेच हा अधिकार कुणालाही नाही. एका बाजुला पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून महिला समानतेचा जयघोष करतात, तर दुसर्‍या बाजूला देशातील काही लोकप्रतिनिधी महिलांबाबत अर्वाच्च भाषा वापरतात. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत कोणीही समर्थन करू शकत नाही. त्यांची बाजू घेणे कुणालाच राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. अब्दुल सत्तार यांच्या शिव्यांमुळे राज्य सरकार तोंडावर पडले आहे. राज्य सरकारला अडचणीत आणणारे सत्तार आपल्या विकृत वाणीला आळा घालणार की पुन्हा तोच सिलसिला सुरू ठेवणार आहेत ? सद्यस्थितीतील राजकारण किती हीन पातळीवर सुरू आहे, याचे उदाहरणच अब्दुल सत्तार झाले आहेत. असे विकृत, रानटी लोकप्रतिनिधी मंत्रीमंडळात असणे राज्य सरकारच्या प्रतिमेसाठी धोकादायक आहे, असेच म्हणता येईल.

No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर