Monday, 20 January 2020

पृथ्वीराज चव्हाणांचे चुकीचे टायमिंग


पृथ्वीराज चव्हाणांचे चुकीचे टायमिंग
 
 राजकारणात केव्हा कोणती गोष्ट बाहेर पडेल हे सांगता येत नाही. शिवसेनेने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापण्याचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मात्र, मी तातडीने हा प्रस्ताव फेटाळला. आम्ही निवडणूक हरल्याने विरोधात बसणार हे स्पष्ट केले होते. आताही शिवसेनेसोबत सत्ता स्थापण्यास कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उत्सुक नव्हत्या. मात्र, चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांनी अनुकूल भूमिका घेतली, असे कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे की, शिवसेनेने याबाबत स्पष्टीकरण द्यावे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे स्पष्टवक्ते असून त्यांनी गौफ्यस्फोट केला आहे की, २०१४ साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळपास ४० आमदारांना पक्ष बदलण्यासाठी धमक्या किंवा आमिषे दाखविण्यात आली होती. परंतु २०१४ च्या  विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरुवातीला विरोधी बाकावर बसलेली शिवसेना भाजपसोबत सत्तेत आली होती. त्यावेळी राष्ट्रवादीने विधानसभेच्या सभागृहात भाजपला आवाजी मतदानाने पाठिंबा दिला होता आणि भाजप सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले होते, हे त्यातील वास्तव आहे. त्यानंतर शिवसनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांशी संपर्क केला असेल तर ती तत्कालीन राजकीय रणनीती असू शकते. खरे तर भाजप- शिवसेना यांच्यातील तात्विक युती त्यावेळीच संपुष्टात आली होती, हे भाजप व शिवसेनेने आता स्पष्ट करण्याची गरज आहे. प्रत्येक राजकीय पक्ष तत्कालीन परिस्थितीनुसार राजकीय रणनीती अवलंबतो. राजकारण सातत्याने बदलत असते.शिवसेनेने २०१४ साली नेमके तेच केले होते. त्याचा विरोधकांनी बाऊ करण्यात अर्थ नाही. कारण विरोधकांची राजकीय नीती सर्वश्रुत आहे.                                                                          कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांची विचारधारा वेगळी आणि शिवसेनेची विचारधारा वेगळी असताना हे विरोधाभासातील विचारांचे पक्ष नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नेमके एकत्र कशामुळे आले, हे सर्वज्ञात आहे. परंतु २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने, भाजपचा प्रादेशिक पक्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि भाजपच्या राजकारणाचा कावा ओळखून गनिमी कावा करण्यास सुरुवात केली होती, असे दिसते. विरोधी विचारसरणी असतानाही शिवसेनेशी आघाडी करावी, असे काँग्रेसला का वाटले ?  असे पृथ्वीराज चव्हाण यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले. त्यावेळी त्यांनी २०१४ मधील राजकीय स्थितीचा दाखल दिला. शिवसेना २०१४ मध्ये काँग्रेससोबत आघाडी करणार होती, हे पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान गांभीर्याने घ्यावे लागणार असून यानिमित्ताने शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे जबाबदार नेते असून त्यांनी शिवसेनेबाबत केलेले विधान आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे. यावर शिवसेनेला उत्तर द्यावे लागेल, असे आव्हानच फडणवीस यांनी शिवसेनेला दिले आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला दावा खरा आहे, असे म्हणत त्यास दुजोरा दिला आहे. २०१४ मध्ये तसा काही प्रस्ताव दिल्याचे आपल्याला माहिती नसल्याचे शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी म्हटले आहे. पृथ्वीराज यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसनेही इन्कार केला आहे. शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नव्हता असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक म्हणाले आहेत. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपचे अल्पमतातील सरकार विराजमान झाले होते. शिवसेना तेव्हा विरोधी बाकांवर बसली होती. तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझ्याकडे आघाडीचा प्रस्ताव आला होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी स्थापन करू व भाजपला सत्तेतून दूर करू, असा हा प्रस्ताव होता. मात्र, हा प्रस्ताव मी लगेचच फेटाळून लावला होता, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. परंतु हे वातावरण लवकरच निवळेल, असे दिसते.                 विधानसभा निवडणूक २०१९ चा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप-सेनेतील वाद पुन्हा विकोपाला गेले. दोन्ही पक्षांत मुख्यमंत्रीपद कोणाला याचे एकमत होत नव्हते. अडीच वर्ष प्रत्येक पक्षाला मुख्यमंत्रीपद हे गणितही भाजपला पटत नव्हते. भाजप हा राज्यात सर्वात जास्त जागा मिळवणारा (१०५ जागा) पक्ष आहे. शिवसेनेला एकूण ५६ जागा मिळाल्या आहेत. तसेच बाकीचे अपक्ष आमदार मिळून युतीचे सरकार आले असते. परंतु भाजपचाच मुख्यमंत्री होणार या महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या भाजपला शिवसेनेने जी धोबीपछाड मारली ती राज्यातील काही नेत्यांमुळेच ! त्यातील एक नेते पृथ्वीराज चव्हाण हे होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींचे मन वळवत महाविकास आघाडी आकारात आणण्यासाठी प्रयत्न केले. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय परिस्थिती पाहता यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीनेही आपली भूमिका बदलण्याचे ठरविले आणि पर्यायी सरकारबाबत विचार सुरु केला. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील सत्ताबदलाचे समीकरण अस्तित्वात आणण्यासाठी पुढाकार घेतला, त्यानंतर महा विकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले आहे. राज्यात महा विकास आघाडीचे सरकार सुरळीत सुरु आहे. नाही म्हणायला थोडीफार धुसफूस सुरु राहणार, हे ओघाने आलेच. भाजप आता सत्ताधारी पक्षांत फूट पाडण्यासाठी नेहमीच लक्ष ठेवून आहे. महा विकास आघाडीचे सरकार राज्यात पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार का, याबाबत पूर्ण हमी कोणीच देऊ शकणार नाही. मात्र, भाजपने विरोधकांना संपविण्याचा केलेला प्रयत्न आणि शिवसेनेचा केलेला विश्वासघात यामुळे आम्ही एकत्र आल्याचे, पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसने शिवसेना व राष्ट्रवादीच्या आघाडीला सुरुवातीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. राज्यात सत्ता आपल्याच पक्षांची असल्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीला पक्षवाढ करण्याची मोठी संधी आहे. या दोन्ही पक्षांनी आता नेहमी जनतेच्या संपर्कात राहून आपला जनाधार वाढवला पाहिजे. तीनही पक्षांचे आमदार आपापसांत हेवेदावे न करता सत्तेवर एकत्र राहिले तर महाराष्ट्राचा निश्चित विकास साध्य होईल. विरोधक जर विरोधासाठी विरोध करत असतील तर त्यांना आपल्या विकासकार्याने उत्तर देणे हाच नवीन सरकारसमोर एक योग्य पर्याय आहे. महा विकास आघाडीचे राज्य सरकार त्याच दिशेने मार्गक्रमण करत आहे, ही सकारात्मक बाब आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र शिवसेनेबाबत आक्षेपार्ह विधान करण्यासाठी आत्ताच वेळ का साधली आणि शिवसेनेला कोंडीत पकडून विरोधकांच्या हातात कोलीत का दिले, यावर आता चर्चा सुरु झाली आहे.   
                                                  ashok sutar            

No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर