Monday, 30 September 2019

अभ्यासू युवकांनी राजकारणात येण्याची अपेक्षा



                     अभ्यासू युवकांनी राजकारणात येण्याची अपेक्षा 
  


सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. आता भाजपकडे एवढी गर्दी आहे की, नेमकी कुणाला संधी द्यावी, असा गोंधळ भाजप नेतृत्वाचा झाला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत महागळती सुरु आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे बडे नेते भाजप व शिवसेनेत जात आहेत. काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून कॉंग्रेसला महाराष्ट्रात गळती लागली आहे, ती अजून सुरु आहे. कॉंग्रेसच्या बरोबरीने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  साताऱ्यातील खासदार उदयनराजे  भोसले यांनी दिल्ली दरबारी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला. उदयनराजे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर म्हटले आहे की, राष्ट्रवादीत लोकांची कामे होत नव्हती, परंतु भाजपच्या सरकारने आपल्या फाईली मार्गी लावल्या. मग जुन्या पक्षात राहून काय उपयोग होता ?  परंतु एक बाब खरी की, खा. उदयनराजेंनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश का केला नाही ? म्हणजे आता पुन्हा खासदारकीची निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीनंतर होणार आहे, ते टळले असते. असो. राष्ट्रवादीच्या सर्व कार्यालयात आता शांतता पसरली आहे. परंतु शरद पवार स्वस्थ बसलेले नाहीत. ते राज्यभर सभा घेत आहेत. गत लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी ७८ सभा घेतल्या होत्या. पवार यांचे व्याही ७८ आहे, परंतु तरुणाच्या जोमाने ते आज कार्य करत आहेत. कराड येथे भाजपच्या महाजनादेश यात्रेनंतर अनेकजण भाजपमध्ये जाण्याचे ठरवत आहेत. सातारा येथे काल शरद पवारांची सभा झाली. पवार यांच्या सभेत गर्दी हाउसफुल्ल होती. पवार तरुणाईला आघाडीकडे कसे आकर्षित करणार, हे पाहिले पाहिजे. भाजपने सातारा जिल्ह्यात केलेल्या राजकीय खेळीमुळे कराड उत्तर व कराड दक्षिणेतील राजकीय समीकरणे आगामी विधानसभा निवडणुकीत बदलणार आहेत. ही समीकरणे जिल्ह्यातील राजकारण बदलतील, असे दिसते. कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचे व नेतृत्वाचे नेमके काय चुकले ? या पक्षांतील कुरघोडी, गटबाजी, स्वार्थीपणा कुणी पोसला ? त्याला वेळीच का आळा घातला नाही, असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्ष औषधाला शिल्लक ठेवायचा नाही, अशी वल्गना भाजपचे काही नेते करीत आहेत, ते योग्य नव्हे. कारण विरोधी पक्ष अस्तित्वात ठेवायचा नाही, ही भाजप नेतृत्वाची मानसिकता एकाधिकारशाही व हुकुमशाहीकडे घेऊन जाते. म्हणजेच लोकशाही मान्य नाही, असा या विधानातून एक नवीन अर्थ ध्वनित होत आहे. भारतात अजून तरी लोकशाही अस्तित्वात आहे, त्यामुळे सत्ताधारी पक्षांनी जबाबदारीतून वक्तव्ये करणे अपेक्षित आहे. राजकारणात सर्व काही माफ असते. असा चुकीचा अर्थ राजकारण्यांनी आपल्या सोयीसाठी काढला असावा. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील, स्व. बाळासाहेब देसाई, स्व. राजारामबापू पाटील, स्व. शंकरराव चव्हाण, स्व. बाळासाहेब भारदे, स्व. पी.डी. पाटील यांच्या विचारांची पिढी कुठे हरवली ? तडजोडीचे राजकारण,स्वार्थी महत्वाकांक्षा जोपर्यंत राजकारण्यांच्या वृत्तीत राहणार आहे तोपर्यंत राजकारणाचा हा तमाशा सुरूच राहणार आहे. त्यातून सर्वांनी बोध घ्यावा, ही अपेक्षा आहे. अभ्यासू तरुण पिढीने राजकारणात येण्याची आज गरज निर्माण झाली आहे.                                                                                                                 विधानसभेच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत महागळती सुरु झाली आहे. राजकीय वातावरण आपल्या बाजूला आहे असे वाटत असल्याने विधानसभा लवकर घ्यावी, या मानसिकतेत भाजप आहे. तर काही जणांनी ही निवडणूक पुढे ढकलावी, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सध्या शिवसेनेत असलेले व लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना टक्कर दिलेले माथाडी नेते नरेंद्र आण्णासाहेब पाटील हे नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटले आहेत. ते राष्ट्रवादीत जाऊन लोकसभेच्या तिकिटावर नव्याने लढणार की काय, अशी चर्चा आहे. कारण उदयनराजेंनी नुकताच खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक होणार आहे. मतदार आता वेगळ्या विचारात असल्याचे दिसते. तसे असेल तर राजकीय समीकरणे बदलणार आहेत. कॉंग्रेसवर नाराज असलेले आणि आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे पूर्वीचे समर्थक आनंदराव पाटील नाना यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे अजून संकेत दिलेले नाहीत. राजकारणात स्पष्ट भूमिका घेतली तरच निभाव लागतो, हे त्यांना माहित नाही काय ? कॉंग्रेसच्या बरोबरीने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आघाडीतील पक्षांची सुंदोपसंदी युतीच्या पथ्यावर पडणार असे दिसते. हे राजकारण आहे.
 विधानसभा निवडणूक आता जाहीर झाली असून आचारसंहिता सुरु झाली आहे. सर्वच पक्षांनी उमेदवारांचा शोध सुरु केला आहे. मनसेचे अजून ठरलेले नाही. परंतु १०० उमेदवार उभे करण्याचे राज यांनी निश्चित केले आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादीतील काही  नेत्यांनी सत्ताधारी पक्षांत जाण्याचे निर्णय घेतले आहेत. याचे नक्की कारण काय आहे, हे मतदारांना समजेनासे झाले आहे. पक्षफुटीची लागण कधी झाली आणि कॉंग्रेस- राष्ट्रवादीत नेत्यांना का राहू वाटत नाही, हा प्रश्न लोकांना पडला आहे. अस्थिर असलेले नेते लोकांसाठी विकासकामे करणार काय, स्वहित साधणार की जनहित असे प्रश्न आता निर्माण होऊ लागले आहेत. कॉंग्रेस- राष्ट्रवादीत सध्या सामसूम असली तरी सत्ताधारी पक्षांत गेलेल्या सर्व शिलेदारांना भाजप व शिवसेनेवाले न्याय देतील असे नाही. कारण हे पक्ष आता हाउसफुल्ल झाले आहेत. सध्या एक बाब मात्र लक्षणीय आहे. ती म्हणजे, कॉंग्रेस- राष्ट्रवादीत प्रामाणिक राजकीय आकांक्षा असणाऱ्या तरुणांना जाण्यासाठी व भवितव्य घडवण्यासाठी वाव आहे. नवीन दमाचे युवा कार्यकर्ते बराच बदल घडवू शकतात. कॉंग्रेसमध्ये सध्या हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी आहेत. २०१४ पूर्वी सलग दोन टर्म कॉंग्रेस केंद्रात सत्तारूढ होती. त्यावेळी सत्तेचा उपभोग सर्वांनी आनंदाने घेतला. त्यावेळी कॉंग्रेसचे काही नेते एवढे मस्तवाल झाले होते की, ते आपल्याच पक्षातील जिल्हा परिषदेचे सदस्य यांनाही जास्त विचारत नव्हते. अनेक पदाधिकाऱ्यांची नेत्यांसमोर डाळ शिजत नव्हती, जनतेची कामे खोळंबली होती. अनेक दलाल राजकारणात आणि सत्तेत निर्माण झाले होते. काही नेत्यांनी आपल्या मतदार संघापुरतेच काम केले, ते आपल्या कक्षेच्या बाहेर कधीही गेले नाहीत. पक्ष वाढवण्यासाठी सांघिक भावनेची गरज असण्याऐवजी एकमेकांवर कुरघोडी करणे, गटबाजी करणे हे काही नेत्यांचे ध्येय होते. राष्ट्रवादीतही काही अपवाद वगळता तीच परिस्थिती होती. ज्या भाजपला उच्चभ्रूंचा व शहरी पक्ष म्हणून पूर्वी ओळखत होते, त्या भाजपमध्ये आज खेडेगावातील शेतकऱ्यांची पोरंही जात आहेत, हे वास्तव आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला हा बदल कधीच लक्षात आला नसेल का ? याची नोंद कुणीच कशी घेतली नाही ? यातून कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काहीच धडा का घेतला नाही ? विरोधी पक्षात काम करणे हा गुन्हा असावा असे काही नेत्यांना वाटत आहे की काय ? आता पुन्हा आघाडीचे सरकार कधीच येणार नाही आणि भाजपमध्ये गेल्यावर मोठी प्रतिष्ठा मिळून मोठी उलाढाल देशात होणार आहे काय, असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. लोकशाहीतील वैचारिक अध:पतनाची ही सुरुवातच आहे, असे आम्हास तरी वाटत आहे.                                                                                                         कॉंग्रेस- राष्ट्रवादीत थंड वातावरण पाहून वंचित बहुजन आघाडीला कमालीचा आत्मविश्वास आला आहे. एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील आघाडीची बिघाडी झाली आहे. संधिसाधुपणा करणारे राजकारणी सत्तेवर आले की लोकांचे प्रश्न आपोआप बाजूला होतील आणि राजकीय कुरघोड्या, आरोप- प्रत्यारोपाचे हीन राजकारण सुरु होण्याची शक्यता वाटते. निकोप लोकशाहीसाठी हीच मोठी खंत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातले अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पक्षाची साथ सोडून भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्याचा फटका आघाडीला  विधानसभा निवडणुकीत बसण्याची चिन्हे आहेत. जरी संकट समोर दिसले तरी खचायचे नसते आणि पुन्हा ताठ मानेने उभे राहायचे असते, हे आलेल्या राजकीय परिस्थितीने दाखवून दिले आहे. जेत्ता केव्हाच मनाने हरत नसतो, तशी जिद्द आघाडीतील पक्षांनी बाळगणे इष्ट ठरेल. शरद पवारांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून कॉंग्रेसने आपल्या पक्षात चैतन्य निर्माण करावे व सत्ताधाऱ्यांनी दिलेले आव्हान स्वीकारावे, ही अपेक्षा. अभ्यासू युवकांनी राजकारणात आले तर आजची जशी राजकीय अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे, तशी भवितव्यात होणार नाही.

                                                                                                          अशोक सुतार 
                                                                                                       ८६००३१६७९८ 





No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर